सांगोल्यातील ‘कोण’ किरीट सोमय्यांच्या रडारवर?
श्रीकांत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली रविवारी सांगोला दौरा
सांगोला : विशेष प्रतिनिधी
भ्रष्टाचारी नेत्यांच्या विरोधात रान उडवणारे भाजप नेते किरीट सोमय्या हे रविवारी सांगोल्याच्या दौऱ्यावर येत आहेत. सांगोल्यातील कोणती गैरव्यवहाराची प्रकरणे ते बाहेर काढणार?, भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख त्यांना कोणती गुप्त माहिती पुरवणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब, ना. हसन मुश्रीफ, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे, व्यवहारातील अनियमिततेचे आरोप करून सळो की पळो करून सोडणारे भाजप नेते किरीट सोमय्या हे सांगोला दौऱ्यावर येत असल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. किरीट सोमय्या यांना झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
श्रीकांत देशमुख यांची रणनिती
भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख हे जिल्हाध्यक्ष पद मिळाल्यापासून खूपच सक्रिय झाले आहेत. आंदोलनांचा त्यांनी सपाटा लावला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांना सांगोल्यात आणून त्यांनी वातावरण तापवून सोडले आहे.
कोण रडारवर?
सांगोला तालुका तसा शांतताप्रिय, सुसंस्कृत असला तरी मधल्या काळात जनतेला शांत करून व अंधारात ठेवून अनेकांनी कारनामे केल्याची चर्चा आहे. याबाबत श्रीकांत देशमुख यांनी वारंवार आवाजही उठवला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष पद मिळाल्याने देशमुख यांच्या कार्याला ताकद आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या माध्यमातून ते कोणावर निशाणा साधणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
असा आहे दौरा
भाजप नेते किरीट सोमय्या यांचे दुपारी चार वाजता सांगोल्यात आगमन होईल. एसटी स्टँड जवळील हॉटेल अ अम्बेसिडर येथे कार्यकर्ता चर्चासत्रात सहभागी होऊन ते मार्गदर्शन करतील. तेथेच पाच वाजता ते पत्रकार परिषद घेऊन महत्वाच्या गोष्टींवर आपले भाष्य करतील. रात्री 8 वाजता ते रेल्वेने मुंबईकडे रवाना होतील.