सांगोल्याच्या डाळिंबावर तेल्याचे महासंकट

महासंकटात डाळिंब-1; 'मर' रोगही उठला जीवावर

Spread the love

वर्षानुवर्षे दुष्काळात होरपळून निघालेल्या सांगोला तालुक्यासह आसपासच्या भागाला डाळिंब पिकाने तारले. ऊसतोडीला जाणारे, शेतमजुरी करणारे लोकही डाळिंब बागायतदार बनले. डाळिंबाने सांगोल्यात समृध्दी आणली. आता कुठे चांगले दिवस येत असताना तेल्या व मर रोगामुळे हे डाळिंब महासंकटात सापडले आहे. पर्यायाने सांगोल्याचे अर्थकारण कोसळू लागले आहे. डाळिंबावरील महासंकटाचा वेध घेणारी ही विशेष वृत्तमालिका वाचत राहा. वाचल्यानंतर ही लेखाची लिंक इतरांना शेअर करायला विसरू नका. (- संपादक)

सांगोला / डॉ. नाना हालंगडे
अगोदर आलेली कोरोनाची महामारी, त्यानंतर अतिवृष्टीचे संकट व सध्या डाळिंबावर तेल्या व मर रोगाचा मोठा प्रादुर्भाव. या संकटामुळे सांगोला तालुक्यातील डाळिंब उत्पादक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. ‘आता जगायचं तर कसं?’ असा प्रश्‍न डाळिंब उत्पादकांसमोर उभा राहिला आहे.

’डाळिंबाचे कोठार’ होऊ नये उद्ध्वस्त
डाळिंब उत्पादनामुळे सांगोल्याला ‘डाळिंबाचे कोठार’ संबोधले जाते. 25 हजार हेक्टर पेक्षा जास्त डाळिंबाचे क्षेत्र सांगोला तालुक्यामध्ये आहे. डाळिंबांना योग्य असे हवामान, त्यासाठी लागणारी योग्य माती, कमी पाणी व विशेषतः शेतकर्‍यांची कष्टाची तयारी यामुळेच सांगोला तालुक्यात डाळिंबाचा क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढत गेले. परंतु सध्या याच डाळिंबाच्या कोठाराला तेल्या व मर रोगाची नजर लागल्याने डाळिंब बागा उद्ध्वस्त होऊ लागल्या आहेत. इतर रोगांना जैविक व रासायनिक औषधांची फवारणी करून आटोक्यात आणता येऊ शकते.

परंतु मर रोगाला आतापर्यंत कोणतेच औषध नसल्याने ‘मर’मुळे शेतकर्‍यांनी जिवापाड जपलेल्या बागा उदध्वस्त होऊ लागल्या आहेत. सद्यपरिस्थितीत डाळिंबाची रोपे लागवड करुन बहार धरेपर्यंत व्यवस्थित येते परंतु बहार धरल्यानंतर डाळिंबांना मर रोगाचा मोठा प्रादुर्भाव वाढत आहे. मर रोगाने जळालेल्या डाळिंब क्षेत्रामध्ये लगेच डाळिंब रोपे लावले तर तेही झाडे जळतात. यामुळे मर रोगामुळे बागाच उद्ध्वस्त होत असल्याने शेतकर्‍यांना याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे.

तेल्या रोग आहे तरी काय?
तेल्या रोगाला काही भागात बिब्या असेही संबोधले जाते. भारतात या रोगाचा प्रादुर्भाव प्रथम १९५२ साली कर्नाटक, आंध्रप्रदेश, राजस्थान या राज्यातील डाळींबावर आढळून आला. त्यानंतर १९५९ साली सखोल संशोधनाअंती हा रोग ‘झान्थोमोनास पुनिकी’ या अणुजीवामुळे होत असल्याचे डॉ. हिंगोरानी आणि सिंग यांनी सिद्ध केले.


रूबी या जातीच्या डाळींबावर सर्वप्रथम या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला. महाराष्ट्रात कर्नाटक राज्यातून २००० साली रूबी जातीची तेलकट डाग रोगग्रस्त कलमे आणली गेली आणि तेव्हापासून या रोगाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रातील डाळींब बागांवर सुरू झाला.

तेल्या रोगाची लक्षणे
भारतात या रोगाचा प्रादुर्भाव प्रथम १९५२ साली कर्नाटक, आंध्रप्रदेश आननी राजस्थान या राज्यातील डाळींबावर आढळून आला. त्यानंतर १९५९ साली सखोल संशोधनाअंती हा रोग ‘झान्थोमोनास पुनिकी’ या अणुजीवामुळे होत असल्याचे डॉ. हिंगोरानी आणि सिंग यांनी सिद्ध केले.
रूबी या जातीच्या डाळींबावर सर्वप्रथम या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला. महाराष्ट्रात कर्नाटक राज्यातून २००० साली रूबी जातीची तेलकट डाग रोगग्रस्त कलमे आणली गेली आणि तेव्हापासून या रोगाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रातील डाळींब बागांवर सुरू झाला. हा जिवाणूजाण्य रोग पाने, फुले फांद्या, खोड आणि फळांवर होती.

रोगाची लक्षणे
१) पानावरील रोगाची लक्षणे : रोगाची प्रथम सुरूवात ही पानांवर होते. अनुक्रमे कोवळ्या फुटी, फुले आणि फळे यावर रोग येतो. सुरुवातीला रोगग्रस्त पानावर लहान आकाराचे लंब गोलाकार ते आकारहीन पानथळ तेलकट डाग येतात. अनुकूल हवामानात हे डाग एकत्र येवून ते १ ते २ सेंमी. आकाराचे होतात. नंतर हे ठिपके काळपट रंगाचे होतात. ठिपक्यांच्या कडेला पिवळसर वलय दिसते, यावरून हा रोग ओळखणे सोपे जाते. हळूहळू रोगग्रस्त पाने पिवळी पडून मोठ्या प्रमाणावर पानगळ होते. फुलकळीवरील रोगांची लक्षणे पानाप्रमाणे असतात.
२) फुलावरील रोगाची लक्षणे : फुलांवर व कळ्यांवर काळपट डाग पडतात व ते फुलकळीसोबत वाढू लागतात.
३) फांदीवरील रोगाची लक्षणे : पानाप्रमाणे कोवळ्या फुटीवर रोगाचे ठिपके साधारणत: फांदीच्या पेर्‍यावर फुटीच्या बेचक्यात दिसून येतात. ठीपाक्याचे लांब गोलाकार चट्ट्यात रूपांतर होऊन ते गर्द तपकिरी व काळपट रंगाचे आणि थोडेसे खोलगट होतात. काही वेळस ठिपक्यांच्या ठिकाणी सालीस तडे जातात आणि रोगग्रस्त भागातून पुढील फांदी सुकून वाळून जाते.
४) फळावरील रोगाची लक्षणे : फळावर पानांप्रमाणे पाणथळ – तेलकट डाग पडतात. हे ठिपके हळूहळू वाढत जाऊन ते एकमेकात मिसळतात. रोगग्रस्त भाग तपकिरी ते काळसर – तेलकट होतो.
रोगाचे प्रथमावस्थेत आढळणारे तेलकट डाग, अनियमित, लंबगोलाकार आकाराचे तसेच एकमेकात मिसळत असलेले मध्यभागी काळसर पडलेले असतात. नंतर फळाला रोगग्रस्त भागावर आडवे – उभे तडे जातात व फळे सुकतात. फळावर थोडा जरी रोग आला तरी त्यांची प्रत पुर्णपणे खराब होते आणि फळांना बाजारभाव मिळत नाही. या रोगामुळे ३० ते ५० % नुकसान होते, परंतु वाढीस पोषक वातावरण असताना अतिरोगग्रस्त बागेत ८० ते १०० % नुकसान होऊ शकते.
६) खोडावरील रोगाची लक्षणे : खोडावर सुरुवातीला पानथळ तेलकट डाग दिसतात. कालांतराने हे डाग तपकिरी होतात. खोडावर या डागांचे गर्डलिंग किंवा खाच तयार होते व तेथून झाड मोडते.

(क्रमशः)


टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका