सांगोला साखर कारखान्याच्या निवडणुकीत मटण, पैसे दिले, 57 लाख खर्च केले

आ. शहाजीबापू पाटलांनी सांगितले जळजळीत सत्य

Spread the love

सांगोला (विशेष प्रतिनिधी) : सांगोला सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मटण, पैसे दिले, 57 लाख खर्च केले. सभासद मतदारांना विमान प्रवास घडविला. तरीही निवडणूक हरलो, असा गौप्यस्फोट सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केला. त्यांनी राजकारणातील सांगितलेले जळजळीत सत्य खळबळ उडवणारे आहे.

सांगोला तालुका सहकारी साखर कारखाना तथा धाराशिव साखर कारखाना युनिट 4 चा प्रथम गळीत हंगाम मोळी पूजन कार्यक्रम रविवारी राज्याचे सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी आमदार शहाजी पाटील बोलत होते.

या मोळी पूजन समारंभास धाराशिवचे खासदार ओमप्रकाश निंबाळकर, आमदार कैलास पाटील, आमदार शहाजीबापू पाटील, सांगोला तालुका सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.आम.दिपकआबा साळुंखे पाटील शेतकरी कामगार पक्षाचे चंद्रकांत देशमुख, अनिकेत देशमुख, धाराशिव उद्योग समूहाचे प्रमुख अभिजीत पाटील, मनसेचे राज्याचे नेते दिलीप धोत्रे, तानाजीकाका पाटील, विजय पवार आदींसह सांगोला तालुका सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक तसेच धाराशीव उद्योग समूहाचे सर्व संचालक तसेच सभासद शेतकरी उपस्थित होते.

आ. शहाजीबापू पाटील म्हणाले की, सांगोला सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली होती. मी त्यावेळचे आमदार गणपतराव देशमुख यांच्याकडे गेलो. माझे काही उमेदवार बिनविरोध करा अशी विनंती केली. आता वेळ निघून गेल्याचे त्यांनी सांगितले. मी त्यांना हिसका दाखविण्याचा निश्चय केला.

कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांना पैसे वाटून आणि त्यांना मटण खायला घालून कारखान्याच्या निवडणुकीत गणपतराव देशमुख गटाला कसा हिसका दाखवला , हे सांगताना त्यांनी कारखान्याच्या निवडणुकीत आपण कसा प्रताप केला, हे देखील सांगून टाकले. कारखान्याच्या दुरवस्थेला माझ्यासह सर्वच नेते जबाबदार आहेत. मी देखील तितकाच पापी असल्याची कबुली देत, त्यांनी याच जाहीर कार्यक्रमात शेतकऱ्यांची माफी देखील मागितली. आमदार पाटील यांच्या या गौप्यस्फोटामुळे कारखाना का बंद पडला, याचे उत्तरही उपस्थितांना मिळाले. सांगोला साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून माजी आमदार ( कै . ) गणपतराव देशमुख यांच्याकडे माझे काही संचालक घ्या , असा प्रस्ताव ठेवला होता . त्यावेळी गणपतराव देशमुख यांनी वेळ निघून गेल्याचे सांगितले . त्यानंतर दिल्ली , हरियाणा , लुधियाना येथून विमानाने सभासदांना आणले . एवढेच नाही तर सभासदांना तीन तीन हजार रुपये वाटप केले . निवडणुकी दरम्यान 1700 सभासदांना कोल्हापुरात ठेवले. त्या ठिकाणी त्यांच्या खाण्यापिण्याची व पत्ते खेळण्यासाठी लागणारे पैसेही दिले , असेही आमदार पाटील यांनी या वेळी सांगितले.
आमदार शहाजीबापू पाटील यांनी आपल्या खास शैलीत यावेळी फटकेबाजी करत सांगोला तालुका सहकारी साखर कारखाना तथा धाराशिव साखर कारखाना चालविताना आपण अजिबात त्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही हा कारखाना चालविताना आपणास अजिबात राजकीय अडचण येणार नाही व प्रशासनाने बोलावल्याशिवाय आपण कारखाना परिसरात पायही ठेवणार नाही असे सांगितले.

राज्याचे सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून बंद अवस्थेत असलेला सांगोला तालुका सहकारी साखर कारखाना धाराशिव उद्योगसमूहाने भाडेतत्वावर चालविण्यास घेतला आहे. महाविकास आघाडी सरकार दुष्काळी सांगोला तालुक्यातील शेतीला पाणी देण्यास कटिबद्ध आहे. त्यामुळे आगामी काळात डी.व्ही.पी. ग्रुप धाराशिव साखर कारखाना हा सांगोला तालुक्यात कृषी क्रांती घडवून आणेल.
राज्याच्या नकाशावर सांगोला तालुक्याची ओळख जरी दुष्काळी तालुका म्हणून असली तरीही महा विकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील व मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी सातत्याने सांगोला तालुक्यातील रखडलेल्या सिंचन प्रश्नाबाबत पाठपुरावा करून तालुक्याच्या चारी बाजूंनी पाणी पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. आजपर्यंत तालुक्यात पाणी उपलब्ध नसल्याने शेतकरी डाळिंब द्राक्ष अशा फळे पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करत होते गेल्या काही वर्षांपासून सातत्याने डाळिंब फळबागा अडचणीत असल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीसाठी शाश्वत पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऊस शेतीकडे सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. कारखानदारीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी पिकवलेल्या उसाला शासनाने निश्चित केलेली आधारभूत किंमत मिळेल आणि खऱ्या अर्थाने आजपर्यंत दुष्काळाची झगडत असलेल्या सांगोला तालुक्यात यापुढील काळात कृषीक्रांती घडून येईल. यासाठी राज्याचा सहकार व पणनमंत्री म्हणून मी नेहमीच आमदार शहाजीबापू पाटील व मा.आम दिपकआबा साळुंखे-पाटील व तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू असा विश्वास शेवटी ना.बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.

यावेळी धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश निंबाळकर, आमदार कैलास पाटील, सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील, चेअरमन मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील, चंद्रकांत देशमुख, अनिकेत देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगोला तालुका सहकारी साखर कारखाना सुरू झाला त्याबद्दल आनंद व्यक्त केला. या पुढील काळात सांगोला तालुक्यातील ऊस उत्पादक आणि सभासद शेतकऱ्यांना धाराशिव उद्योगसमूहाने न्याय द्यावा यासाठी आम्ही आपणास सर्वतोपरी सहकार्य करू असेही नेतेमंडळींनी कारखाना प्रशासनास आश्वस्त केले.

अखेर तो “सोनियाचा दिस” आज उजाडला 
दुष्काळी भागात सहकारी साखर कारखाने चालविणे अत्यंत जिकिरीचे आणि आव्हानात्मक काम आहे अशा परिस्थितीत सांगोला सहकारी साखर कारखाना चालविण्याची जबाबदारी सभासद शेतकऱ्यांनी चेअरमन म्हणून माझ्यावर दिली होती उसाच्या टंचाईमुळे गेल्या काही वर्षे सांगोला साखर कारखाना बंद असला तरीही कारखाना सुरू करण्याची नैतिक जबाबदारी माझ्यावर कायम होती सभासद शेतकरी व सामान्य जनतेच्या या अपेक्षेला जागत आपण देशाचे नेते शरदचंद्रजी पवार राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व सहकार पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा हा राजमहाल चालविण्यासाठी धाराशिव उद्योग समूहाला भाडेतत्त्वावर दिला आहे गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या या कारखान्याचा बॉयलर अखेर पेटल्याने सांगोला तालुक्यातील ऊस उत्पादक व सर्व सभासद शेतकरी यांच्या स्वप्नातील “सोनियाचा दिस” खऱ्या अर्थाने आज उगवला. – मा.आम दिपकआबा साळुंखे -पाटील (चेअरमन,सां.ता.सह.साखर कारखाना)


टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका