सांगोला सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर पुन्हा पेटणार!
धाराशिव साखर कारखान्याने चालविण्यास घेतला भाडेतत्वावर
सांगोला (विशेष प्रतिनिधी) : तालुक्यातील एकमेव असलेल्या सांगोला तालुका सहकारी साखर कारखान्याचा (Sangola Taluka Sahkari Sakhar Karkhana) बॉयलर यंदाच्या हंगामात पेटणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. राज्य शिखर बँकेने सांगोला सहकारी साखर कारखाना हा लाँगलीज भाडेतत्त्वावर धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांना चालविण्यास दिला आहे. धाराशिव साखर कारखान्याकडून रविवारी सांगोला साखर कारखान्यातील स्वच्छता, साफसफाईसह मशीनरीची दुरुस्ती कामे करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या हंगामात सांगोला साखर कारखान्याच्या मशिनरी प्रदिर्घ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा धडाडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
2500 टन गाळप क्षमतेचा सांगोला तालुका सहकारी साखर कारखाना गेली अनेक वर्षे बंद अवस्थेत होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील (NCP ex. MLA Deepakaba Salunkhe-Patil) यांच्या ताब्यात हा कारखाना आहे. या कारखान्यावर मोठे कर्ज आहे. राज्य सहकारी बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न करता थकबाकीदार ठरलेल्या सोलापूर जिल्ह्य़ातील सांगोला शेतकरी सहकारी साखर कारखाना व अक्कलकोटच्या स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव होणार असल्याची घोषणा जून २०१६ मध्ये राज्य बँकेचे अध्यक्ष डॉ. एम. एल. सुखदेवे यांनी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आयोजिलेल्या एका बैठकीत केली होती. मधल्या काळात राज्य शिखर बँकेने आजारी असलेल्या साखर कारखान्यांच्या हिताचा विचार करून धोरणात्मक निर्णय घेतले. त्यातूनच हा निर्णय झाल्याचे दिसून येत आहे.
- हेही वाचा : ज्वारीपासून बनवा पास्ता, बिस्कीट; केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर योजनेतून मिळेल कर्ज
- प्रियांका चोप्राच्या नवऱ्याला सोलापूरी चादरीची भूरळ
- राजू शेट्टींच्या जागी सुरेखा पुणेकरांना विधान परिषदेची संधी?
- सोलापूर विद्यापीठात अहिल्यादेवींचा शिवलिंग हाती घेतलेला पुतळाच योग्य : माजी मंत्री अण्णा डांगे
- आकाश ठोसरने जिंकली सोलापूरकरांची मने
- शहाजीबापू व दीपकआबांचा लोटेवाडीत भरपावसात सत्कार
चालू हंगामात बॉयलर धडाडणार!
धाराशिव (जि. उस्मानाद) येथील साखर कारखाना यशस्वीपणे सुरू आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने हा कारखाना फायद्यात आहे. परिणामी तेथील कारखाना परिसराचा विकास होण्यास मदत होत आहे. अशा यशस्वी व अनुभवी कारखान्यास सांगोला साखर कारखाना भाडेतत्वावर चालविण्यास दिल्याने आगामी अनेक हंगाम यशस्वीपणे पार पडण्याची आशा आहे. येत्या गळीत हंगामापासून सांगोला साखर कारखान्याच्या गळीत हंगामास सुरुवात होणार आहे. त्यामुळे सांगोला तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.
राज्य शिखर बँकेचे धोरणात्मक निर्णय
महाराष्ट्र राज्य शिखर बँकेकडून ५ ऑगस्ट रोजी सांगोला सहकारी साखर कारखाना लाँगलीज भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यासाठी निविदा प्रसिद्ध झाल्या होत्या. उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajeet Pawar), सहकार मंत्री बाळासाहेब पाटील (Co-Operation Minister Balasaheb Patio), शिखर बँकेचे चेअरमन अनासकर, एम.डी. देशमुख, धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, सांगोला साखर कारखाना चेअरमन दीपकआबा साळुंखे-पाटील यांची मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक होऊन सांगोला कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचा निर्णय झाला. ही बातमी समजताच तालुक्यातील शेतकऱ्यांत उत्साह संचारला आहे.
सांगोल्यातील ऊस लागवड क्षेत्र वाढणार!
सांगोला साखर कारखाना मागील वीसहून अधिक वर्षे बंद होता. परिणामी येथे उत्पादित होणारा ऊस इतर कारखान्यांना घालावा लागत होता. तालुक्यातील कारखाना बंद असल्याने तसेच इतर ठिकाणी ऊस नेण्यातील जादा खर्च व गैरसोईमुळे ऊस लागवड करण्यास शेतकरी धजावत नव्हते. याच परिस्थितीमुळे तालुक्यात डाळिंबाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली. आता हा कारखाना सुरू होत असल्यामुळे शेतकऱ्यांची ही अडचण दूर होणार आहे.