सांगोला वनपरिक्षेत्र कार्यालय व पक्षीप्रेमी ग्रुपतर्फे “पक्षी सप्ताह”निमित्त चित्रकला स्पर्धा
विजेत्यांना मिळणार भरघोस बक्षिसे
सांगोला / डॉ. नाना हालंगडे
सांगोला येथील वनपरिक्षेत्र कार्यालय व पक्षीप्रेमी ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने 5 ते 12 नोव्हेंबर दरम्यान साजऱ्या होत असलेल्या “पक्षी सप्ताह” निमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सांगोला तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा होणार आहे. या चित्रकला स्पर्धेसाठी एका कागदावर चित्र काढून ते रंगवून स्पर्धेसाठी 10 नोव्हेंबर 2021 पूर्वी संबंधिताकडे जमा करून या स्पर्धेत भाग घेता येईल.
इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना “मोराचे” चित्र काढून ते रंगवायचे आहे तर आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी “चिमणी व तिचे घरटे” चित्र काढून रंगवायचे आहे. चित्र ड्रॉईंग पेपर साईझ ए-3 वर काढून ते सोमवार दि. ८ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर पर्यंत वनपरिक्षेत्र कार्यालय (नवीन कोर्टा जवळ) सांगोला येथे जमा करायचे आहे.
यशस्वी स्पर्धकांना दोन्ही गटासाठी प्रथम क्रमांक १००१/- रुपये, द्वितीय क्रमांक ७०१/- रुपये तृतीय क्रमांक ५०१/- रुपये तर उत्तेजनार्थ २०१/- रुपये अशी बक्षिसे व प्रशस्तीपत्र दिली जाणार आहेत. अधिक माहितीसाठी अमेय मस्के किंवा राजेंद्र यादव यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पक्षीप्रेमी ग्रुप व वनपरिक्षेत्र कार्यालय यांच्याकडून करण्यात आले आहे.