सांगोला ब्रेकिंग, “संगायो”चे 1 कोटी 85 लाख केले वसूल
तहसीलदार अभिजीत पाटील यांची माहिती
सांगोला/नाना हालंगडे
संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा सांगोला तालुक्यात सुमारे १२ हजार ९०० लाभार्थ्यांना लाभ मिळतो. परंतु यातील काही लाभार्थी मयत झाले आहेत, किंवा अनेक जण या योजनेचा लाभ मिळविण्यास अपात्र आहेत. ही बाब समोर आल्यानंतर अपात्र लाभार्थी शोध मोहीम हाती घेऊन या योजनेचे बँकेकडे अनेक वर्षे पडून असलेले तब्बल १ कोटी ८५ लाख रुपये इतके अनुदान पुन्हा शासनाला जमा केले असल्याची माहिती तहसीलदार अभिजीत पाटील यांनी दिली.
ज्या वृद्ध स्त्री किंवा पुरुषाला कोणाचाही आधार नाही त्यांना केंद्र व राज्य शासनाच्या वतीने संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत प्रतिमाह १००० रु. इतके अनुदान दिले जाते. सांगोला शहर व तालुक्यातील १२ हजार ९०० लोकांना या योजनेचा आधार आहे. परंतु, पात्र लाभार्थ्यांपैकी अनेक लाभार्थी मयत झाले आहेत, तर कित्येक जण या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र नाहीत. ही बाब महसूल प्रशासनाने हाती घेतलेल्या अपात्र लाभार्थी शोध मोहिमेत समोर आली.
तब्बल ४ हजार ५०० मयत व अपात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर १ कोटी ८५ लाख रु. इतकी अनुदानाची रक्कम पडून असल्याचे सर्व बँकेच्या अधिकाऱ्यांशी समन्वय केल्यानंतर समोर आले. अर्थात शासनाचे हे पैसे अनेक दिवसापासून पडून असल्याने कागदोपत्री बाबींची पूर्तता करून शासकीय अनुदानाचे हे पैसे पुन्हा शासनाला जमा केले असल्याची माहिती तहसीलदार अभिजीत पाटील यांनी दिली.
संजय गांधी निराधार अनुदान योजनेत असलेले मयत आणि अपात्र लाभार्थी यातून शोधून बाजूला काढल्याने आता खरोखर जे गरजू आणि पात्र आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळवणे आणखी सोपे होईल. सांगोला तालुक्यातील जे निराधार लोक या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत त्यांनी आवश्यक कागदपत्र घेऊन तहसील कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहनही शेवटी तहसीलदार पाटील यांनी केले.
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचे अनुदानही केले होते शासनजमा
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतही अनेक अपात्र लाभार्थी असल्याची बाब शोधून तहसीलदार अभिजीत पाटील यांनी शेकडो अपात्र शेतकरी या योजनेतून बाहेर काढले होते. तसेच त्यांच्याकडून तब्बल १ कोटी ४० लाखहून अधिक अनुदान पुन्हा शासनाला जमा केले होते. लगेच संजय गांधी निराधार अनुदान योजनेतही लक्ष घालून कोट्यावधीचे शासकीय अनुदान पुन्हा शासनाला जमा केल्याने त्यांच्या कार्याचे जनतेतून कौतुक होत आहे.