सांगोला तालुक्यात सोन्याच्या किंमतीची मका पाण्यात
खरिपातील पिके उद्ध्वस्त; पंचनामे मात्र कागदावर
सांगोला/ नाना हालंगडे
सांगोला तालुक्यात मागील दोन वर्षापासून पाऊसमान चांगले असल्याने खरिपातील मकेचे क्षेत्र वाढले आहे. त्यातच भावही चांगला असल्याने अनेकांनी मोठ्या प्रमाणात मका केली आहे. पण याच परतीच्या पावसाने हाहाकार माजविल्याने ही मका सध्या सांगोला तालुक्यात पाण्यात तरंगत आहे. सोन्याच्या किमतीची मका पाण्यात गेली आहे. शेतकरी बांधवांवर अस्मानी संकट कोसळले आहे. आता सुलतानी संकट नको, तातडीने नुकसानीचे पंचनामे करून मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
चालू वर्षापासून मकेचे खरिपातील पीक मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यातच भावही चांगला मिळत असल्याने अनेकांनी दहा दहा एकर हे क्षेत्र केले आहे. त्यातच पशुधन मोठे असल्याने याचा भरड्यासाठी वापरही वाढला आहे. मागील महिनाभरापूर्वी ही मका 2800 रुपये क्विंटलचया दराने खरेदी केली जात होती. आता सध्या ही 2100 रुपये क्विंटल दराने विक्री केली जात आहे. पण परतीच्या पाऊसाने हाहाकार माजविल्याने मका पीक पाण्यावर तरंगू लागले आहे.
तालुक्यातील संगेवाडी, मांजरी, मेथवडे, घेरडी, जवळा, बामणी, कडलास, सोनंद, जुनोनी, आलेगाव, वाकी, पारे, डिकसळ, भोपडेवाडी यासह अन्य गावामध्ये मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
परतीच्या पावसाने सांगोला तालुक्यातील शेती पिकांची पुरती वाट लागलेली आहे. याच पावसाने दैना उडाली असून खरिपातील अनेक पिके पाण्यात आहेत. यात मका, बाजरी, सूर्यफुल यासह अन्य पिकांच्या समावेश आहे. त्यात मकेचे क्षेत्र मोठे आहे. हा पाऊस नासाड्याच ठरला आहे.
पिके पाण्यात, सण कसा करायचा?
यंदा कधी नव्हे तर मका पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. मात्र मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे तालुक्यातील पिके पाण्याखाली गेली आहेत. हाता तोंडाला आलेली पिके डोळ्यादेखत पाण्यात कुजत असल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे.
एवढे मोठे संकट समोर असल्याने दिवाळी सण कसा साजरा करायचा असा प्रश्न आहे. कारण शेतकऱ्याच्या हातात पाऊसच नाही. शेतकरी संकटात सापडला असल्याने बाजारपेठही थंड आहे.
‘मपोसे’ ते आयपीएस अधिकारी : नूतन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांचा थक्क करणारा प्रवास
सांगोला पाऊस : शहाजीबापूंच्या मंडलात पावसाचा हात आखडता, संगेवाडीत सर्वाधिक बरसात