सांगोला तालुक्यात लॉकडाऊनला परिवर्तनवादी संघटनांचा आक्षेप
हातावर पोट असणा-यांच्या जीवावर उठू नका; बापूसाहेब ठोकळे आक्रमक
सांगोला (विशेष प्रतिनिधी) : जिल्हा प्रशासनाने सांगोल्यासह पाच तालुक्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला अाहे. १३ तारखेपासून हा लॉकडाऊन असेल. या निर्णयाला पंढरपूर, मंगळवेढा या भागात विरोध होत असताना सांगोला तालुक्यातही या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची जोरदार मागणी होत आहे. बहुजनवादी, पुरोगामी संघटनांनी याबाबत तहसीलदारांना निवेदन सादर केले आहे. हातावर पोट असणा-यांच्या जीवावर उठू नका, असे म्हणत बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे आक्रमक झाले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, पंढरपूर, माळशिरस, करमाळा, माढा या पाच तालुक्यांमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर या पाच तालुक्यांमध्ये संचारबंदी लावण्याचा आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी रविवारी रात्री पारित केला. ज्या तालुक्यात रुग्ण संख्या वाढत आहे त्या भागात कठोर निर्बंध लावले जाणार आहेत. सांगोला तालुक्याचाही यात समावेश आहे.
परिवर्तनवादी संघटनांनी दिले निवेदन
सांगोल्यातील बहुजन क्रांती मोर्चाच्या पुढाकाराने आठहून अधिक संघटनांनी एकत्र येत तहसीलदारांना निवेदन सादर केले. यामध्ये संभाजी ब्रिगेडचे अरुण केदार, अस्तित्व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शहाजी गडहिरे, लिंगायत मोर्चाचे अध्यक्ष सुरेशकाका चौगुले, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे संयोजक इरफानभाई फारुकी, बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक बापूसाहेब ठोकळे, माजी नगरसेवक किशोर बनसोडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे सेक्रेटरी बाळासाहेब बनसोडे, बामसेफचे तालुकाध्यक्ष आबासाहेब शेजाळ गुरुजी, उद्योजक सुभाष काटकर, लहुजी क्रांती मोर्चाचे अध्यक्ष सिद्धेश कांबळे यांच्या सह्या आहेत.
लॉकडाऊनचा गोरगरिबांना फटका : ठोकळे
कोरोना महामारीत कोरोनो संसर्गाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदी, लॉकडाऊन या बाबी गरजेच्याच आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत हे सर्व जनतेने सहन केले. मात्र सतत लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध लादले तर कोरोनाएेवजी उपासमारीने लोक मरतील, अशी भिती सामाजिक कार्यकर्ते तथा बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक बापूसाहेब ठोकळे यांनी व्यक्त केली आहे.
ते म्हणाले की, भारतीय राज्यघटनेत अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजा प्राप्त करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकास देण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनतेचा हा मुलभूत अधिकार हिरावला जात आहे. सततच्या निर्बंधांमुळे व्यवसायांवर अाधारित बारा बलुतेदारांची अन्नसाखळी खंडित झाली आहे. हाताला काम नाही, खायला अन्न नाही अशी स्थिती कामगारांची आहे. दुकानदारही त्रस्त आहेत. कर्जाचा भार वाढत आहे. कोरोनाला रोखण्याचा नादात सर्वसामान्यांचे अधिकार हिरावले जाऊ नयेत, काही नियमांसह दैनंदिन व्यवहार पूर्ववत करून दिलासा द्यावा, अशी मागणी बापूसाहेब ठोकळे यांनी केली आहे.
यावेळी तहसीलदारांना निवेदन देताना संभाजी ब्रिगेडचे अरुण केदार, अस्तित्व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शहाजी गडहिरे, लिंगायत मोर्चाचे अध्यक्ष सुरेशकाका चौगुले, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे संयोजक इरफानभाई फारुकी, बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक बापूसाहेब ठोकळे, माजी नगरसेवक किशोर बनसोडे,बामसेफचे तालुकाध्यक्ष आबासाहेब शेजाळ गुरुजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे सेक्रेटरी बाळासाहेब बनसोडे, उद्योजक सुभाष काटकर, लहुजी क्रांती मोर्चाचे अध्यक्ष सिद्धेश कांबळे आदी उपस्थित होते.