सांगोला तालुक्यात रब्बी हंगामातील ३५ हजार हेक्टरवर ज्वारीची पेरणी

सध्याचा अवकाळी पाऊस डाळिंब, द्राक्षासाठी हानीकारक

Spread the love

थिंक टँक न्यूज नेटवर्क : डॉ. नाना हालंगडे
सांगोला तालुक्यात रब्बीच्या सरासरी 46 हजार 95 हेक्टर क्षेत्रापैकी 41 हजार 463 हेक्टर क्षेत्रावर (89 95 टक्के) पेरणी झाली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी दिली. सध्याचा अवकाळी पाऊस रब्बीच्या काही पिकांना लाभदायक असला तरी द्राक्ष, डाळिंब बागांना हानिकारक ठरला आहे.

सांगोला तालुक्यात रब्बी ज्वारी, गहू, मका, हरभरा असे तृणधान्य व कडधान्याबरोबरच सूर्यफूल या गळीत धान्याची पेरणी केली जाते. तालुक्यात सर्वाधिक रब्बी ज्वारीची 39 हजार 321 हेक्‍टर क्षेत्रापैकी 34 हजार 676 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ज्वारीबरोबरच 5 हजार हेक्टर क्षेत्रावर मका व 946 हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली आहे. तालुक्यात ज्वारी, गहू, मका अशा एकूण सरासरी 45 हजार 460 हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी 40 हजार 673 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तसेच कडधान्याच्या 623 सरासरी हेक्टर क्षेत्र असुन यावर्षी 790 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

द्राक्षे, डाळिंब बागांना अवकाळीचा फटका
तालुक्यात गेले दोन-तीन दिवस झाले अवकाळी हलक्या पावसाच्या सरी येत आहेत. या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील द्राक्षांबरोबरच डाळिंब बागांना मोठा फटका बसला आहे सतत पडणारा हलक्या पावसाच्या सरीमुळे द्राक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात घडतकुज होत असल्याने द्राक्ष बागांची मोठी हानी होत आहे. काही बागा संपूर्णपणे या अवकाळी पावसामुळे फेल जाणार आहेत. द्राक्षबरोबरच बहार धरलेल्या डाळिंबावर कुजवा, कळीगळ व यापुढे पडणाऱ्या उन्हामुळे तेल्या रोगाच्या प्रमाणात वाढ होणार आहे.

पिकाचे नाव – पेरणी क्षेत्र हेक्टरमध्ये व कंसात टक्केवारी : रब्बी ज्वारी – 34,676 (88.19), गहू – 946.60 (144.64), मका – 5,051 (96.06), हरभरा – 790 (130.36). एकुण रब्बीच्या सरासरी 46 हजार 95 हेक्टर क्षेत्रापैकी 41 हजार 463 हेक्टर क्षेत्रावर (89 95 टक्के) पेरणी झाली आहे.

सध्याच्या अवकाळी पावसामुळे आमच्या बहार धरलेल्या द्राक्षबागांवर मोठ्या प्रमाणात घडकूज झाली आहे. डाळिंब बागांवरही रोगराईत वाढ होणार आहे – संतोष खंडागळे, द्राक्ष उत्पादक.

ऋतुचक्र बदलाने शेतकरी हवालदिल
सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे नैसर्गिक ऋतुचक्रही बदलत चालले आहे. ऐन उन्हाळ्यात, हिवाळ्यात अवकाळी पाऊस पडत असल्याने या ऋतुचक्र बदलामुळे याचा थेट परिणाम पिकांवर व फळबागांवर होत आहे. फळबागांवर मोठ्या प्रमाणात रोगराई वाढत असून पिकांचे उत्पादन कमी होत आहे. या ऋतु चक्र बदलाने शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी होत असुन एकूण खर्चात मात्र मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका