सांगोला तालुक्यात धुंवाधार पाऊस
146 मिलिमीटर पावसाची नोंद, सोनंद व कोळा मंडलमध्ये सर्वाधिक पाऊस
सांगोला/नाना हालंगडे
सांगोला तालुक्यात परतीच्या अवकाळी पावसाने हाहाकार माजविला आहे. गुरुवारी दिवसभर सर्वदूर मुसळधार पाऊस कोसळत होता. सांगोला तालुक्यात 146 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सोनंद व कोळा मंडलमध्ये सर्वाधिक पाऊस पडला आहे.
एकूण २७ नक्षत्रांपैकी मृग, आर्द्रा, पुनर्वसू, उत्तरा, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त ही पावसाची नक्षत्रे मानली जातात. मात्र, बारा महिन्यातील 27 नक्षत्रे आता पावसाची ठरू लागली असून, पावसाळा अन् हिवाळा तर आता तर आपण अनुभवत आहे. काल मध्यरात्री पासून ते गुरुवार दिवसभर पावसाने हैदोस माजविला असून, तालुक्यात 146 मिलिमीटर इतका पाऊस पडलेला आहे.
गत दोन वर्षापासून जसा कोरोना वाढला तसा पाऊसही वाढला आहे. या कोरोनाने बळीराजाचे नुकसान केले अन् आता पाऊस ही नुकसानग्रस्त ठरू लागला आहे. खरिपा पाठोपाठ रब्बी हंगामही वाया गेल्यात जमा आहे. फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. या दिवसभराच्या पावसामुळे जनावरांचे हाल सुरू असून, रस्त्याचीही दाणादाण उडाली आहे. अनेकांची ज्वारीची पिके, मका, व अन्य पिके भूईसपाट झाली आहेत. डाळिंब बागायतदार, द्राक्ष उत्पादक नुकसान ग्रस्त झाले आहेत.
गुरुवारच्या या पावसाने दैना उडाविली असून, अनेक गावातील ओढे, ताली भरून वहिल्या आहेत. तालुक्यातील नऊ मंडलपैकी सोनंद व कोळा मंडलमध्ये सर्वाधिक पाऊस पडला आहे. यामध्ये सांगोल्यात 11 मिलिमीटर, हतीद मंडलमध्ये 9 मिलिमीटर, नाझरा मंडलमध्ये 10 मिलिमीटर,महूद 22 मिलिमीटर, संगेवाडी 5 मिलिमीटर, सोनंद 35 मिलिमीटर, जवळा 17 मिलिमीटर, कोळा 30 मिलिमीटर व शिवणे मंडलमध्ये 7 मिलिमीटर असा तालुक्यात 146 मिलिमीटर पाऊस पडलेला आहे. या अवकाळी पाऊसामुळे तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे.