सांगोला तालुक्यात गणेशोत्सवास चैतन्यमय वातावरणात प्रारंभ
सांगोला/ नाना हालंगडे
मराठमोळ्या संस्कृतीतील महत्त्वाचा सण म्हणून गणेशोत्सवाला महत्त्व आहे. यामुळे विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनाची प्रतीक्षा आबालवृद्धांना वर्षभर असते. यंदा ही प्रतीक्षा संपली असून चैतन्यदायी पर्वास ३१ ऑगस्ट २०२२ बुधवारपासून प्रारंभ झाला आहे. सांगोला तालुक्यात अनेक ठिकाणी गणपतीची मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
कोरोना संकटाचे विघ्न दूर झाले असून विघ्नहर्त्यामुळे दोन वर्षांनंतर यंदा निर्बंधमुक्त वातावरणात गणेशोत्सवाचा मनमुराद आनंद सर्वांनाच घेता येणार आहे.
गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला बुधवारी दिवसभर गणेशमूर्तीचे आगमन सुरूच होते. घरगुती मूर्तींप्रमाणेच अनेक सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्ती वाजत-गाजत रवाना झाल्या. दिवसभराचे ढगाळ वातावरण आणि उकाड्यातही लोकांचा उत्साह कायम होता. सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरू झाला.
हेही वाचा
- गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी धुक्याची झालर
- गणपतीच्या आख्यायिकांचे गूढ
- गणपतीबाप्पांचे १२ अवतार
- गणेश संपूर्ण आरती आणि बरंच काही
रात्री उशिरापर्यंत गणेश आगमनाच्या उत्साही मिरवणुका सुरूच होत्या. गणेशोत्सवासाठी आवश्यक पूजा साहित्य खरेदीसाठीही बाजारपेठांमध्ये बुधवारी दिवसभर मोठी गर्दी होती.
एक गाव एक गणपती ही संकलापणा जरी विसरी पडली असली तरी,गावोगावी ,वड्यावस्त्यावर अनेक मंडळे पहावयास मिळत आहेत.यंदा कोरोना कमी झाल्याने वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगळेपण जपणार्या देखाव्यांचे नियोजन मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे.काही मंडळांनी अनेक नव्यिण्यापूर्न उपक्रम ही राबविले आहेत. यात शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरणपूरक, कला-क्रीडा अशा विविध विषयांचा समावेश आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली कविता
*गणरायास आवाहन*
देवा गणराया…आलास
आनंद आहे बाबा.
एक भक्त म्हणून
तुला मी मनोभावे
हात जोडून आवाहन करतो.
विघ्नहर्त्या,सध्या देशातलं
तोडा-फोडीचं राजकारण
तू पाहतोच आहेस.
विद्वेशाचा वणवा पसरवून
सामान्य जनतेची होणारी
छुपी होळी तू सोसतोच आहेस.
या आग लावणाऱ्या मेंदूंना
थोडा विवेक दे बुद्धीदेवा
धर्म,जात,आरक्षण,मंदिर,
मस्जिद,ग्रंथ यांचा हत्यार
म्हणून वापर करणाऱ्या
प्रवृत्तींना थोडा मानवतेचा
सत्संग दे विनायका.
माझ्या शेतकरी बांधवांच्या
गळ्यातला फासाचा दोर
काढून त्यांच्या अंधाऱ्या घरात
कृपा प्रकाशाचा
थोडा शिडकावा कर
दुःखहर्त्या.
बेरोजगारी,महागाई,विवंचना
यांच्याशी निकराची लढाई लढणाऱ्या सामान्यांच्या पाठीवर
आधाराचा हात ठेव सुखकर्त्या.
सत्तालालसेच्या घुशीने पोखरत चाललेला देश
सिंहासनाच्या हव्यासाने कुरतडले जाणारे संविधान
आणि लोकांच्या मनात
पेरले जाणार बॉम्ब या सर्वांना
छत्रपतींचा आदर्श लाभूदे
बाप्पा.
नजरेतल्या धारदार शस्त्रांच्या
वाती होऊन तेवूदे बंधुत्वाचे
दीप आणि मुखामधून
द्वेषाच्या ठिणग्या उडण्याऐवजी गायली जाऊदे
सबका साथ सबका विकासची
मंगलमय आरती.
बाबासाहेबांच्या समतेची
लेखणी हाती घेऊन लिहिले जाऊदे बंधुतेचे मंगलगान
सिद्धेश्वरा…
‘हर घर तिरंगा’ बरोबरच
‘हर मन सद्भाव गंगा’ चा जयघोष उठू दे मंदिर,मशीद
आणि विहारांच्या आत्म्यातून.
मिडिया,वर्तमानपत्रे,राजकीय पक्षांचे प्रवक्ते या सर्वांकडून
विणले जाऊदे एकतेचे घट्ट भारतवस्त्र एकदंता…
यंत्रणा,शासन व्यवस्था यांतले भ्रष्टाचाराचे विषाणू
नष्ट होऊ देत तुझ्या पवित्र
भक्ती लसीने लंबोदरा.
आरोग्य,शिक्षण आणि पायाभूत सुविधांचा मधुर मोदक
मिळूदे शेवटच्या रांगेतील सोललेल्या हातांना मोरेश्वरा.
डॉ.कलामांनी पाहिलेले महान
भारताचे स्वप्न जागेपणीच
राहूदे मंत्र बनून प्रत्येकाच्या
ओठांवर वक्रतुंडा..
शांतीच्या,जिव्हाळ्याच्या
गुलालाने माखूदे सर्वांचे अंतरंग.
विचारांना येऊदे सर्वांच्या
आपुलकीचा सत्वगंध विघ्नेश्वरा
तुझा उत्सव आम्ही ज्या
श्रद्धेने साजरा करतो
त्याच श्रद्धाभावाने ‘भारतीयत्वाचा’ महोत्सव सर्वांनी एकदिलाने साजरा करूदे मोरया.
मंगलमुर्ती तू आहेच
देशातले सर्व ‘अमंगल’ घालवून
सद्विचारांचा मंगल वर्षाव करून जाताना प्रत्येक मनात
‘मी लवकरच येईल’ तोपर्यंत या सद्भावाचे विसर्जन करू नका असं सांगून जा गणराजा.
देवाधिदेव तू आहेच
आम्हालाच तू….
‘सच्चे देशभक्त’ होण्याचं
वरदान देऊन जा…
कृपाघना.