सांगोला तालुक्यात ऊस आंदोलनाची ठिणगी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस वाहतूक रोखली
सांगोला/नाना हालंगडे
सांगोला तालुक्यात ऊस आंदोलनाची ठिणगी पडली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यानी सांगोला – महूद रोडवरील ढाळेवाडी फाटा येथे सांगोला सहकारी साखर कारखाना (धाराशिव युनिट)कडे जाणारी ऊस वाहतूक रोखून धरली. यावेळी साखर कारखानदारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी माजी खा. राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते प्रताप (बाबासाहेब) देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष अर्जुन लुबाळ यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकरकमी पहिली उचल द्यावी, गत हंगामाचे दोनशे रुपये अधिक एफआरपी द्यावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. वजनकाटा ऑनलाईन करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यानी सांगोला – महूद रोडवरील ढाळेवाडी फाटा येथे धाराशिव युनिट सांगोला या कारखान्याची ऊसवाहतूक रोखून धरली. यावेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना उसाची वाहतूक करू नये, अशी विनंती केली. आम्हाला वाहनांची तोडफोड करायची नाही. आपण ऊस वाहतूक करू नये. जर ऊस वाहतूक केल्यास होणाऱ्या तीव्र आंदोलनास व नुकसानीस आपण जबाबदार असाल, असा इशारा देण्यात आला.
यावेळी धाराशिव कारखाना युनिट सांगोलाचे चेअरमन अभिजित पाटील हे याच रस्त्यावरून जात होते. त्यांना आंदोलकांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र ते थांबले नाहीत. यावेळी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
हे आंदोलन पाहून धाराशिव कारखाना युनिट सांगोलाचे तज्ञ संचालक श्री. कदम हेही आंदोलनस्थळी आले होते. त्यांनी आंदोलकांना आंदोलन थांबविण्याची विनंती केली. मात्र आंदोलकांच्या मागण्यांसंदर्भात कोणतीही चर्चा करण्यास नकार दिला.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष अर्जुन लुबाळ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते प्रताप (बाबासाहेब) देशमुख, स्वाभिमानी शेतकरी विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष समाधान माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक अध्यक्ष राजू येडगे, प्रदीप आसबे, वैभव ढेरे, प्रकाश लुबाळ, सरपंच करण लुबाळ आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
येत्या ७ तारखेला पुणे येथे साखर आयुक्त कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खा. राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत धडक मोर्चा आयोजित’ करण्यात आला आहे. या मोर्चाला सांगोला तालुक्यातून हजारो कार्यकर्ते जाणार आहेत.
तेथे पक्षाकडून ठरणाऱ्या निर्णयानुसार सांगोला तालुक्यात आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते प्रताप (बाबासाहेब) देशमुख यांनी दिला.
पुढील दोन महिन्यात जगावर भीषण संकट! बाबा वेंगा यांचे धडकी भरवणारे भाकीत | Think Tank Live
जुनोनी अपघाताची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल; दिले चौकशीचे आदेश