सांगोला तालुक्यातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करा
ॲड. सचिन देशमुखांनी मुंबईत घेतली पालकमंत्र्यांची भेट
चालू वर्षीही पावसाला सुरू झाल्यापासून मोठी अतिवृष्टी झाली. रब्बी हंगामही उशीरानेच साधला. हंगाम साधल्यानंतर मात्र सतत खराब हवामान, अवकाळी पाऊस याने पिकांचे व फळबागांचे मोठे नुकसान केले. रब्बी हंगामातील पिकांचे, डाळिंब व द्राक्षांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्वारीची पिके भूईसपाट झाली आहेत. द्राक्षांचा बहार पाऊसाने सत्यानाश झाला आहे.
थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
सांगोला तालुक्यात 1 डिसेंबर रोजी आणि सलग दोन दिवस मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडल्याने, फळबागा व रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पण जिल्हा प्रशासन याचे पंचनामे करीत नाही. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करावेत म्हणून जि. प. सदस्य ॲड. सचिन देशमुख यांनी मंत्रालयात सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेवून निवेदन दिले.
सांगोला तालुक्यात गतवर्षापासून पावसाने कहर माजविला असून रब्बी हंगामातील पिके आणि फळबागांचे या अवकाळीमुळे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत प्रशासनाला विचारले असता 65 मिलिमीटर पावसाची अट घातली. मात्र शेजारच्या सांगली जिल्ह्यात हेच पंचनामे तिथल्या लोकप्रतिनिधींनी केले. मग आपल्या जिल्ह्यात का नाहीत? असे हे निवेदन त्यांनी सोलापूरचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांना मुंबईत दिले. यावेळी सोनंदचे सरपंच समाधान पाटील, उद्योगपती आनंदराव पाटील यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
सांगोला तालुक्यात मोठे नुकसान
सांगोला तालुक्यात अवकाळी पवसामुळे अक्षरशः मोठे नुकसान झाले असून, रब्बी हंगामातील 41 हजार हेक्टरला याचा फटका बसला आहे. तर डाळिंब व द्राक्ष बागांचेही मोठे नुकसान झाले आहे. यासर्वांचे तातडीने पंचनामे करावेत अशी मागणी पुरोगामी युवक संघटनेचे राज्य अध्यक्ष भाई डॉ.बाबासाहेब देशमुख यांनीही त्याचवेळी केली आहे.
सांगोला तालुक्यात गेली दोन वर्षापासून अतिवृष्टी होत असून मोठे नुकसान झाले आहे. गतवेळच्या नुकसानीची भरपाई काही जणांना मिळाली नाही. त्यामुळे बळीराजा हैराण झाला आहे. खरीप हंगामही पूर्णपणे वायाच गेला. त्यातच कोरोना महामारीमुळे उपलब्ध मालाला व फळांना योग्य भाव मिळाला नाही.
चालू वर्षीही पावसाला सुरू झाल्यापासून मोठी अतिवृष्टी झाली. रब्बी हंगामही उशीरानेच साधला. हंगाम साधल्यानंतर मात्र सतत खराब हवामान, अवकाळी पाऊस याने पिकांचे व फळबागांचे मोठे नुकसान केले. रब्बी हंगामातील पिकांचे, डाळिंब व द्राक्षांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्वारीची पिके भूईसपाट झाली आहेत. द्राक्षांचा बहार पाऊसाने सत्यानाश झाला आहे.
सांगोला : ३५ हजार हेक्टरवर ज्वारी पेरणी
सांगोला तालुक्यात रब्बीच्या सरासरी 46 हजार 95 हेक्टर क्षेत्रापैकी 41 हजार 463 हेक्टर क्षेत्रावर (89 95 टक्के) पेरणी झाली आहे. सध्याचा अवकाळी पाऊस रब्बीच्या काही पिकांना लाभदायक असला तरी द्राक्ष, डाळिंब बागांना हानिकारक ठरला आहे. सांगोला तालुक्यात रब्बी ज्वारी, गहू, मका, हरभरा असे तृणधान्य व कडधान्याबरोबरच सूर्यफूल या गळीत धान्याची पेरणी केली जाते. तालुक्यात सर्वाधिक रब्बी ज्वारीची 39 हजार 321 हेक्टर क्षेत्रापैकी 34 हजार 676 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ज्वारीबरोबरच 5 हजार हेक्टर क्षेत्रावर मका व 946 हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली आहे. तालुक्यात ज्वारी, गहू, मका अशा एकूण सरासरी 45 हजार 460 हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी 40 हजार 673 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तसेच कडधान्याच्या 623 सरासरी हेक्टर क्षेत्र असुन यावर्षी 790 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
द्राक्षे, डाळिंब बागांना अवकाळीचा फटका
अवकाळी पावसामुळे तालुक्यातील द्राक्षांबरोबरच डाळिंब बागांना मोठा फटका बसला आहे सतत पडणारा हलक्या पावसाच्या सरीमुळे द्राक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात घड कुजत असल्याने द्राक्ष बागांची मोठी हानी होत आहे. काही बागा संपूर्णपणे या अवकाळी पावसामुळे फेल जाणार आहेत. द्राक्षबरोबरच बहार धरलेल्या डाळिंबावर कुजवा, कळीगळ व यापुढे पडणाऱ्या उन्हामुळे तेल्या रोगाच्या प्रमाणात वाढ होणार आहे.
पिकाचे नाव – पेरणी क्षेत्र हेक्टरमध्ये व कंसात टक्केवारी : रब्बी ज्वारी – 34,676 (88.19), गहू – 946.60 (144.64), मका – 5,051 (96.06), हरभरा – 790 (130.36). एकुण रब्बीच्या सरासरी 46 हजार 95 हेक्टर क्षेत्रापैकी 41 हजार 463 हेक्टर क्षेत्रावर (89 95 टक्के) पेरणी झाली आहे.