सांगोला/नाना हालंगडे
सांगोला तालुक्यातील 6 ग्रामपंचायतीपैकी चिंचोली, शिवणे, चिणके, अनकढाळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या 4 जागेसाठी तर 39 सदस्यपदाच्या जागेसाठी रविवारी मतदान झाले. यामध्ये 82.63 टक्के मतदान झाले असून 14 हजार 205 मतदारांपैकी 11 हजार 737 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
तालुक्यातील 6 ग्रामपंचायतीपैकी पाचेगाव खु॥ ग्रामपंचायतीची निवडणूक संपूर्ण बिनविरोध झाली होती. चिणके ग्रामपंचायत सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध झाली असली तरी 11 सदस्यपदासाठी 23 उमेदवारांमध्ये लढत होती. यासाठी 81.46% मतदान झाले असून 2 हजार 648 पैकी 2 हजार 157 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
बलवडी ग्रामपंचायतीच्या सदस्य पदाच्या- सर्वच्या सर्व -11 जागेसह अनकढाळ सदस्यपदाच्या 9 पैकी तीन जागा बिनविरोध झाल्या होत्या. तर उर्वरित सदस्य पदाच्या 6 जागांकरिता 15 उमेदवार रिंगणात होते तर सरपंचपदासाठी 5 उमेदवारांमध्ये लढत होती. या ग्रामपंचायतीसाठी 75.99 टक्के मतदान झाले असून 1 हजार 716 मतदारांपैकी 1 हजार 304 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
उर्वरित चिंचोली, शिवणे, चिणके, अनकढाळ या 4 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या 4 जागेसाठी 16 उमेदवार तर 4 ग्रामपंचायतीच्या सदस्य पदाच्या 39 जागेसाठी 103 उमेदवारांमध्ये लढत होती. या निवडणुकीमध्ये 6 हजार 826 महिलांपैकी 5 हजार 550 महिलांनी तर 7 हजार 379 पुरुषांपैकी 6 हजार 187 पुरुषांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
शिवणे ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी सर्वाधिक 89.73% मतदान झाले.
बलवडी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये 11 सदस्य बिनविरोध झाले आहेत, तर सरपंच पदासाठी 4 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये 3 हजार 525 मतदारांपैकी 2 हजार 687 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 76.23% मतदान झाले.
चिंचोली ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सरपंच पदासाठी 5 उमेदवार तर सदस्य पदाच्या 11 जागेसाठी 43 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. या निवडणुकीमध्ये 3 हजार 015 मतदारांपैकी 2 हजार 627 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 87.13% मतदान झाले.
शिवणे ग्रामपंचायतच्या निवडणुकीत सरपंच पदासाठी 2 तर 11 जागेच्या सदस्य पदासाठी 22 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. यामध्ये 3 हजार 301 मतदारांपैकी 2 हजार 962 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला एकूण 89.73% मतदान झाले. मतदान प्रक्रिया शांततेत व कायदा सुव्यवस्था अबाधित राखून मतदान प्रक्रिया पार पडली.
यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. निवडणूक निर्णय अधिकारी,कर्मचारी यांनी निवडणूक नियमांचे तंतोतंत पालन केले. यासह पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.