सांगोला तालुक्याचे रांगडे नेतृत्व, लोकनेते दीपकआबा
वाढदिवस विशेष लेख
कार्यतपस्वी आम.काकासाहेब साळुंखे-पाटील यांनी सांगोला तालुका हा सहकारातून नंदनवन कसा होईल, माळरानांचे रुपांतर बागायती क्षेत्रात कसे होईल, सर्वसामान्यांना रोजगाराच्या संधी कशा प्राप्त होतील, दीन-दलित जनतेला सन्मान कसा प्राप्त होईल हे ध्येय उराशी बाळगून समाजकारण, राजकारण केले. त्यांच्याच विचारांचा वारसा पुढे चालविण्याचे काम लोकनेते दीपकआबा करीत आहेत. दीपकआबा यांचा आज ६० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त हा विशेष लेख.
सांगोला / नाना हालंगडे
निसर्गचक्र अविरत गतिमान असते. वेगवेगळे ऋतू नवनवीन रुप धारण करुन येतात व धरणीमातेची जडणघडण करतात. यामधील एखादा ऋतू आपल्या मनाला भावतो व आपण त्याची आतुरतेने वाट पहातो. तसेच आपण आपल्या जीवनामध्ये काही आवडत्या दिवसाची आतुरतेने वाट पहात असतो. त्या दिवसाची ओढ आपल्या एकल्या मनाला खुणावत असते. जवळेकरच काय सोलापूर जिल्ह्यातील तमाम कार्यकर्ते 7 जानेवारीची प्रतिक्षा करीत असतात. हा सुदिन म्हणजे लोकनेते, माजी आम. दिपकरावजी साळुंखे-पाटील यांचा जन्मदिवस.
या दिवशी जन्मगावी व तालुकाभर आगळ्या-वेगळ्या विधायक कार्यक्रमाची, समारंभाची रेलचेल असते. असंख्य चाहते, आबालवृध्द लाडक्या नेत्याला मनोमन शुभेच्छा देऊन त्यांच्या प्रगतिची कामना व्यक्त करीत असतात. मा.दिपकआबांच्या कार्यकर्तृत्चाचा प्रभाव व्यापक क्षेत्रावर पसरला आहे. किंबहुना त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या प्रभावाने अनेकांची मने जीवन प्रभावित झाले आहे. म्हणून सर्वजण त्यांच्या सहवासासाठी आतुर झालेले आढळतात.
7 जानेवारी 1962 रोजी नाझरा येथे आबांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण जवळे येथे घेतल्यानंतर सांगोला, पंढरपूर, सोलापूर, कोल्हापूर या ठिकाणी त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण घेऊन उच्च पदवी प्राप्त केली.
घरंदाज राजकारणी
दीपकआबांना मोठा राजकीय वारसा आहे. स्व. आमदार काकासाहेब साळुंखे-पाटील यांच्या विचारांवर आधारित राजकारण करण्याचा प्रयत्न दीपकआबा करीत असतात. दीपकआबांनी अडचणीवर मात करीत पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. यामुळे त्यांची वैचारिक बैठक व्यापक झाली. त्यामुळे योग्य विचार व नेमकी कल्पना करण्याची क्षमता निर्माण झाली. या प्रगल्भ विचाराने कृतीशी संवाद साधण्यासाठी त्यांचे मन उतावीळ झाले होते. सर्वसामान्याबद्दलचे प्रेम, जिव्हाळा आपुलकीची संवेदना दुसऱ्याच्या दु:खाने व्यथित होणारे मन असे अभावाने आढळणारे गुण त्यांच्या ठायी विकसित होऊ लागले.
कॉलेज जीवनातच राजकीय पायाभरणी
दीपकआबांनी सुरुवातीला विद्यार्थी प्रतिनिधी पदाची निवडणूक जिंकली व मनामध्ये केलेल्या संकल्पानुसार दृढनिश्चयाने वाटचाल सुरु करुन निरनिराळ्या क्षेत्रात एक एक पाऊल पुढे टाकायला सुरुवात केली. पहाता-पहाता अनेक महत्वाची पदे काबीज करीत करीत विधान परिषदेचे सदस्यत्व निवडणूकीव्दारे प्राप्त केले. जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्याशी संबंध असल्याने त्यांना मानणारा मोठा वर्ग जिल्हाभर पसरलेला आहे.
जिद्द, चिकाटी आणि यश
दीपकआबांच्या अंगी असणाऱ्या सर्व गुणांना आपण गवसणी घालू शकणार नाही. परंतु जीवनात येणाऱ्या अनुकूल, प्रतिकूल घटनामधून त्यांचे काही गुण प्रकर्षाने जाणवतात. जीवनांतील विविध पैलू प्रकाशित होतात. मध्यंतरीच्या काळात त्यांच्या राजकीय वाटचालीत मनाला क्लेशदायक, निराश करणाऱ्या घटना घडून गेल्या. परंतु त्यावेळी त्यांनी नकारात्मक भावना मनातून काढून टाकली व सकारात्मक विचार करुन प्रसंगी चार पावले मागे सरकून संघर्ष व नुकसान टाळून प्रसंगी मोठी झेप घेण्याची शिकवण आपल्या कार्यकर्त्यांना दिली. विस्कटणारी घडी जपून ठेवली. अशा तऱ्हेने प्रगल्भ राजकारणी व्यक्तिच्या ठायी असणाऱ्या गुणांचे दर्शन कार्यकर्त्यांना झाले. जर समजा एखादे काम आता झाले नाही तर नंतर ते होणार हा आशावाद त्यांनी आपल्या मनामध्ये सदोदित जपून ठेवला आहे.
अविरत संघर्ष
अस्तित्वासाठी झगडणे, परिस्थितीशी झगडून यश प्राप्त करणे हा त्यांचा स्वभाव बनला आहे. हौसलोंसे उडान होती हैं । हे त्यांच्या जीवनाचे सूत्र आहे. काळाचा प्रवाह वाहतोच आहे. त्यात पोहावे लागते. नको असलेले पाणी बाजूला सारावे लागते. पट्टीच्या पोहणाऱ्याप्रमाणे न बुडता तरंगायचे असते. असा खिलाडुपणा त्यांच्या अंगी निर्माण झाला आहे.
वाढदिवस जणू लोकोत्सव
त्यांच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित झालेले त्यांचे जिवलग त्यांचा वाढदिवस वेगवेगळया विधायक उपक्रमानी साजरा करतात. हे प्राप्त होणारे प्रेम म्हणजे सुसंस्कृत समाजाच्या भलेपणाचा प्रतिसादच आहे.
राजकारणाचे बाळकडू
खरं तर ते वय आबांचे उच्च शिक्षण घेण्याचे होते. शालेय शिक्षण पूर्ण होता होता मायेचे पितृछत्र हरपले. प्रतीकूल परिस्थितीत महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. परंतु संकटातून जावे लागत होते. महाविद्यालयीन शिक्षणासाठी आक्कांचा उमदा पाठिंबा होता. राजकारणाचे बाळकडू घरातच मिळाले असल्याने शाळा, कॉलेजातून नेतृत्व गुण दिसत होते आणि धाडस केले. विद्यापीठ प्रतिनिधी पदाची निवडणूक लढविली. एक अनुभव मिळविला तो म्हणजे छत्रपती शिवाजीराजांना स्वराज्याच्या स्थापणेमध्ये स्वकियांपासून खूप त्रास झाला. तोच अनुभव कॉलेज जीवनात घेतला. परंतू जिद्दीने आणिं धाडसाने आबांनी यश प्राप्त केले.
समाजसेवा आणि राजकारण हिच दिशा
आबांना राजकीय व समाजसेवेचा वारसा घरातून लाभलेला होता. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर शासकीय सेवेत जाऊन अधिकारी होता आले असते आणि तशी गरज देखील होती. परंतू अंतर्मनाने समाजसेवा आणि राजकारण ही दिशा निश्चित केलेली असल्याने जवळे गावात आल्यानंतर पहिल्यांदा गावची विस्कटलेली घडी व्यवस्थित बसविण्याचा निर्धार केला. यासाठी आप्तस्वकीयांचा विरोध डावलला. ग्रामपंचायतीची निवडणूक मोठ्या जिद्दीने जिंकली. आशातच आक्कासाहेबांनी आबांना मोठ्या विश्वासाने जवळे गावची शाळा चालविण्यास सांगितली. अनेक संकटे आली परंतू आक्कांचा विश्वास ढळू द्यायचा नाही या जिद्दीने एका शाळेच्या या इवल्याश्या रोपटयाचे रुपांतर आबांनी विद्याविकास मंडळ जवळे या संस्थेच्या १० माध्यमिक, ५ कनिष्ठ महाविद्यालय, एक कृषीविद्यालय व एक महाविद्यालय सुरु करुन शिक्षणक्षेत्रात बाजी मारली. महाविद्यालय तेही विनाअनुदानित गेली २२ वर्षे निर्विवादपणे चालू आहे.
वटवृक्ष वाढविला
हे सगळे सहजासहजी प्राप्त झाले नाही. अनेकांनी वेगवेगळ्या प्रकाराने अडचणीत टाकण्याचा प्रयत्न केला. परंतू मोठ्या धाडसाने आबांनी हा वटवृक्ष सांभाळलेला दिसतो.
योग्य दिशा
कोणतेही हाती घेतलेले काम कमी न समजता त्यास योग्य दिशा, न्याय, खरेपणा व परिश्रम घेतले तर काम तर यशस्वी होतेच. परंतू त्यातून मिळणारे समाधान हे कितीतरी पटीने मोठे असते. हा आबांचा गुण ज्यांनी स्विकारला त्यांचे कल्याणच झाले.
आबांचा राजकीय आलेख
आबांचा राजकीय आलेख ग्रामपंचायती नंतर पंचायत समिती, जिल्हापरिषद, जिल्हा दुध संघ, जिल्हा बँक, साखर कारखाना असा वाढतच चाललेला होता. परंतू हा वाढता राजकीय आलेख अनेकांच्या लक्षात येता आबांच्या पुढे अनेक आव्हानेही उभी राहू लागली. परंतू म्हणतात ना कर नाही त्याला डर कसले. आबांनी मागे वळून पाहिलेच नाही. जिल्ह्याच्या राजकारणात वरिष्ठांच्या आर्शिवादाने त्यांच्या मांडीला मांडी लावून तालुक्यातील गोरगरीब जनता आणि शेतकरी कसा समाधानी करता येईल याकडेच आबांनी लक्ष केंद्रीत केले.
लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश
लोकसभेची निवडणूक जाहीर झाली. माढा मतदारसंघातून मा. खा. शरदचंद्रजी पवार यांचे नाव निश्चित झाले आणि संपूर्ण वातावरणच बदलून गेले. तालुक्यातील सर्वच पक्षातील नेत्यांना बरोबर घेऊन प्रसंगी एक पाऊल मागे सरकत सर्वांच्या मानमर्यादा सांभाळत मोठ्या कौशल्याने निवडणूक पार पाडली. घवघवीत यश संपादन केले. दरम्यानच्या काळात आबांचे कार्य खा. शरद पवार यांच्याबरोबरच राज्यातील अनेक नेत्यांनी पाहिले. अजितदादासारखे पाठीराखे आबांना मिळाले.
विधान परिषदेचा गड जिंकला
सोलापूर विधान परिषदेचे तिकीट आबांना मिळाले. सुरुवातीला सोपी वाटणारी निवडणूक नेहमीप्रमाणे अवघड होऊ लागली. परंतू तालुक्यातील जनतेची सेवा करीत असताना वरिष्ठांचा मान, अनेक पक्षातील मित्र मंडळी, जिव्हाळा विश्वास व काम करण्याची पध्दत या सर्व गोष्टींमुळे हाही विरोध मोडून काढत यश संपादन केले. आबांनी संपूर्ण जिल्हा पिंजला. आबा कोणासही कमी न समजणारे नेते आणि हा स्वभाव त्यांच्या कामी आला. आबा जिल्ह्याचे आमदार झाले. परंतु अजूनही कामाची तीच पध्दत ठेवली. उलट आता तर जेवण सुध्दा ते कार्यकर्त्यांच्या गराड्यात करतात. असा सर्वांना भावणारा, चटकन माणसास हेरणारा, समोरची व्यक्ती खरे बोलते आहे का? हे जाणणारा, प्रचंड स्मरणशक्ती असणारा हा नेता आहे.
स्व.काकासाहेब साळुंखे-पाटील यांचे आशीर्वाद
सहकारमहर्षी कार्यतपस्वी आम.काकासाहेब साळुंखे-पाटील यांनी सांगोला तालुका सहकारातून नंदनवन कसा होईल माळरानांचे रुपांतर बागायती क्षेत्रात कसे होईल, सर्वसामान्यांना रोजगाराच्या संधी कशा प्राप्त होतील दीन-दलित जनतेला सन्मान कसा प्राप्त होईल हे ध्येय उराशी बाळगून ते समाजकार्य करीत राहिले आणि सोलापूर जिल्ह्याच्या व सांगोला तालुक्याच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं वेगळे अस्तित्व निर्माण केले. त्यांचाच वारसा त्यांचे ज्येष्ठ पुत्र मा. आम.दिपकआबा साळुंखे-पाटील हे समर्थपणे चालवित आहेत.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच दिपकआबांनी घेतलेल्या धाडसी निर्णयातून ते जिवनाचा धडा शिकले. महाविद्यालयात त्यावेळी ग्रामिण विरुध्द शहरी असा संघर्ष होता. त्यावेळच्या महाविद्यालयीन निवडणूकीत उभा राहण्याचे धाडस दाखविले सर्व मित्राच्या सहकार्यातून निवडणूकीत यश संपादन करण्यासाठी प्रयत्न केले.
कॉलेज जीवनापासूनच आबांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. त्यांचे कार्य उत्कृष्टपणे पार पाडत राज्यभर ते कार्य प्रभाविपणे केले. त्यानंतर ग्रामपंचायतपासून, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य ते विधानपरिषदेचे आमदार ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राज्याचे उपाध्यक्ष अशी यशाची एक एक पायरी ते चढत गेले.
साखर कारखान्याची उभारणी
राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असतानाच सांगोला तालुका सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन या पदावरही ते विराजमान आहेत. त्याचबरोबर विद्याविकास मंडळ जवळे, या शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे २० वर्षापासून संचालक, सोलापूर जिल्हा दूध संघाचे मार्गदर्शक, जिल्हा लेबर फेडरेशन, सोलापूर जिल्हा व सांगोला तालुक्यामधील विविध सहकारी संस्थांचे मार्गदर्शक तसेच कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक इ.मध्ये सक्रिय सहभाग व या सर्वांच्या विकासाचे केंद्रबिंदू आबाच आहेत.
निश्चयाचे बळ । तुका म्हणे तेचि फळ
या संतोक्तीनुसार कोणत्याही कार्याचा निश्चय ठाम असणे हे त्या कार्याचे फळ असते. त्यानुसार आबांनी आपल्या कार्याला सुरुवात केली. प्रेरणात्मक वृत्ती व नेतृत्वशील आशय यांची सांगड घालीत वडिलांचा लौकिक कायम ठेवण्यात त्यांना पराकोटीचे यश आले. कोणताही हेतू मनामध्ये न बाळगता सामाजिक विचारांची प्रेरणा त्यांनी घेतली. त्यामुळे जनमाणसात स्वाभाविकपणे विश्वास रुढ होत गेला.
समाजकारण प्रथम
राजकारण एके राजकारण असा सुर न बाळगता समाजकारणाला जास्त महत्व देवून त्यांनी सकारात्मक राजकारण करण्यावर भर दिला. विधानपरिषदेमुळे त्यांचा संपर्क संपूर्ण जिल्ह्यामध्ये आला. जिल्ह्याचे आमदार या नात्याने पक्ष व पार्टी न बघता ते लोकांमध्ये मिसळत गेले. त्यांचा पिंड राजकारणाचा असला तरी समाजकारणाबद्दल ते नेहमी जागरुकच राहिले.चौकटीतील राजकारण करण्यास त्यांचा विरोध आहे. त्यामुळे पक्षिय सिमा त्यांना कधी बांधत नाहीत. आर्थिक, सामाजिक,सांस्कृतिक व राजकीय विकासासाठी खा. शरद पवार, ना.अजित पवार व पक्षातील इतर जेष्ठ नेते, सामाजिक संघटना व विधायक दृष्टीकोन असलेल्या जेष्ठांचे मार्गदर्शन घेतेवेळी ते आपले मत परखडपणे व्यक्त करतात.
सदैव मदतीचा हात
ना. शरदचंद्रजी पवार बहुउद्देशीय संस्था व कार्यतपस्वी आमदार काकासाहेब साळुंखे-पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तरुणांसाठी व महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ निर्माण केले. याच माध्यमातून दरवर्षी गोरगरिबांना अन्नधान्याचे वाटप, मोफत आरोग्य शिबीरे, अनाथ बालकांना कपडे व खाऊ वाटप व अनेक शिक्षणसंस्थेच्या माध्यमातून ज्ञानदानाचे उत्तम कार्य सुरुच आहे. आमदार निधीतून जिल्हयात व सांगोला तालुक्यात शेतीसाठी बंधारे, मंदिरासमोर सभामंडप,पिण्याच्या पाण्यासाठी टाक्या, बोअर, विहीरी, शेतीची औजारे, रस्ते, प्रवाशासाठी निवारा शेडची उभारणी, जि.प.शाळांच्या इमारतीसाठी निधी, विविध घरकुल योजना, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांना विविध कल्याणकारी योजना इत्यादी कामे केली.
कार्याचा गौरव
या त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून तालुक्यातून, जिल्ह्यात, राज्यातून त्यांना आदर्श राज्यस्तरीय सहकाररत्न पुरस्कार, राज्यस्तरीय सहकारभूषण पुरस्कार, बिझनेस एक्सप्रेस पुरस्कार व श्री. फौंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय श्री. सन्मान पुरस्काराने सन्मानित केले आहे.
अशा या थोर नेत्यास 60 व्या वाढदिवसाच्या लाख-लाख शुभेच्छा ! त्यांना उदंड आयुष्य लाभो व त्यांच्या हातून मोठे कार्य घडो.