सांगोला आगाराला दुसऱ्या दिवशी 13 हजारांचे उत्पन्न
शपथ घेऊनही 32 कामगार कामावर रुजू
सांगोला : नाना हालंगडे
राज्यात एसटी कामगारांचे काम बंद आंदोलन सुरच आहे. सांगोला आगारातील 90 टक्के कामगार आंदोलन करत आहेत. अशातच दुसऱ्या दिवशी बुधवारी सांगोला आगाराने तीन मार्गांवर बसच्या फेऱ्या सुरू करून 13 हजारांचे उत्पन्न कमावले. विशेष बाब म्हणजे हे 13 हजारांचे उत्पन्न कमावण्यासाठी आगाराचे 30 हजार रुपये खर्च झाले.
विविध मागण्यांसाठी राज्यभर एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. अद्यापही हे कामबंद आंदोलन मिटले नाही. सांगोला आगारातील 200 कामगारांनी मंगळवारी कामावर रुजू न होण्याची शपथ घेतली. मात्र दुसऱ्याच दिवशी 32 कामगार व अधिकारी कामावर रुजू झाले. बुधवारी सांगोला आगाराने सोलापूर, जत व आटपाडी मार्गावर बस सोडल्या होत्या. 16 फेऱ्यांमध्ये सुमारे 800 कि.मी.चा प्रवास कापत या बसेसनी 13 हजार रुपयांचे उत्पन्न कमावले. मात्र एवढे पैसे कमावण्यासाठी आगाराचे 30 हजार रुपये खर्च झाले.
परीक्षा सुरू, विद्यार्थ्यांचे हाल
ग्रामीण भागात विविध शाळा व महाविद्यालये यांच्या परीक्षा सुरू आहेत. त्यातच एसटी बस सेवा पूर्णपणे बंद असल्याने विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तातडीने बस सेवा सुरू झाली तर त्यांचा त्रास वाचणार आहे.