सांगलीतल्या मंडपवाल्याची भंगारातील खूर्ची थेट इंग्लंडच्या कॅफेत
सोशल मीडियावर खूर्चीचीच हवा, सावळजकरांचा नादच खुळा
सोलापूर : सांगली जिल्ह्यातील सावळजच्या मंडप व्यावसायिकाने सुमारे तेरा वर्षांपूर्वी जुन्या खुर्च्या भंगारात विकल्या होत्या. ते भंगार इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर एका हॉटेल व्यावसायिकाने जुन्या खुर्च्यांची खरेदी केली. त्याच खुर्च्या सध्या मॅंचेस्टरच्या एका कॅफेत वापरल्या जातात. खुर्च्यांवरील ‘बाळू लोखंडे, सावळज’ या मराठी अक्षरांमुळे सुनंदन लेले यांनी कुतूहलापोटी हा व्हिडीओ सोशल मीडियात शेअर केला आणि या खूर्चीने देशात हवा केली. सांगलीकरांची नादच खुळा असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.
त्याचं झालं असं, क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले हे चार दिवसांपूर्वी त्यांच्या मुलीसोबत मॅंचेस्टरमध्ये गेले. फोटो काढत काढत ते एका कॅफेत पोहोचले. तेथे असलेल्या खूर्च्या खूपच जुन्या व भारतीय बनावटीसारख्या दिसत होत्या. जुन्या खुर्च्या पाहून त्यांनाही कुतूहल वाटले. खुर्च्यांच्या मागील अक्षर पाहिल्यानंतर मात्र त्यांना धक्काच बसला. एका खूर्चीवर लिहिले होते “बाळू लोखंडे, सावळज”. लेले यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्या खूर्चीचा व्हिडिओ शूट केला व तो ट्वीटरवर अपलोड केला. काही सेकंदांची हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. टीव्ही चॅनलच्या प्रतिनिधींनी बाळू लोखंडेचा शोध सुरु केला. तोवर ही बातमी महाराष्ट्रातील सर्वच वाहिन्यांवर झळकली होती.
अखेर बाळू लोखंडेचा शोध लागलाच. बाळू लोखंडे हे सावळज गावातील मंडप व्यवसायिक आहेत. वयाच्या साठीत असलेल्या या मंडप व्यवसायिकाकडे जुन्या लोखंडी खुर्च्या होत्या. तेरा वर्षांपूर्वी त्यांनी जुन्या खुर्च्या भंगारात घालण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जुन्या खुर्च्या विकून त्यांनी नव्या फायबरच्या खुर्च्या घेतल्या. योगायोगाने लोखंडे यांनी विकलेले खुर्च्यांचे भंगार इंग्लंडमधील एका व्यवसायिकाने खरेदी केले. त्या खुर्च्या इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर त्यावर एका हॉटेल व्यावसायिकाची नजर पडली. वापरण्यायोग्य असल्याने त्यांनी पंधरा खुर्च्या खरेदी केल्या. त्या खुर्च्यांवर ‘बाळू लोखंडे, सावळज’ असे मराठीत लिहिले आहे. काही खुर्च्यांवरील रंग उडाला आहे. काही अक्षरेदेखील पुसली गेली आहेत. मँचेस्टरमध्ये जुन्या वस्तू आपुलकीने सांभाळल्या जातात. त्याच भावनेतून कॅफे मालकाने भंगारातून आणलेल्या जुन्या खुर्च्या आपल्या कॅफेत वापरासाठी ठेवल्या आहेत.
सावळजकरांचा नादच खुळा
लेले यांनी बाळू लोखंडे यांचा मोबाईल नंबर मिळवून संपर्क साधला. तेरा वर्षांपूर्वी भंगारात घातलेल्या खुर्च्या थेट मॅंचेस्टरमध्ये पोहोचतील याची कल्पनाही लोखंडे यांनी केली नव्हती. भंगारात घातलेल्या खर्च्यांनी सोशल मीडिया प्रसिद्धी मिळवून दिल्यानंतर लोखंडे अचंबित झाले आहेत. आपल्या नावाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल केल्याबद्दल त्यांनी सुनंदन लेले यांना भोजनाचे निमंत्रण दिले आहे. सावळजच्या खुर्च्या थेट इंग्लंडमध्ये पोहोचल्याने सावळजकरांची कॉलर टाईट झाली आहे.