सर अलेक्झांडर कनिंगहॅम : भारतीय पुरातत्त्वशास्त्राचे जनक

जयंती विशेष : अतुल मुरलीधर भोसेकर यांची स्पेशल स्टोरी

Spread the love

Archaeological Survey of India चे पहिले डायरेक्टर जनरल, भारतीय पुरातत्त्वशास्त्राचे जनक, उत्खननाद्वारे प्राचिन बौद्ध संस्कृतीला जगासमोर आणण्याचे महत्तम कार्य करणारे सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांची आज २०७ वी जयंती आहे. त्यानिमित्त सुप्रसिद्ध लेखक अतुल भोसेकर यांची ही स्पेशल स्टोरी खास ‘थिंक टँक लाईव्ह’च्या वाचकांसाठी देत आहोत.
– संपादक

————————————————————————-

सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांचा जन्म २३ जानेवारी १८१४ रोजी लंडन मध्ये झाला. वयाच्या १९व्या वर्षी ते बेंगाल इंजिनियर्स मध्ये रुजू झाले आणि २८ वर्षे ब्रिटिश सैन्यात काम करत मेजर जनरल म्हणून निवृत्त झाले. १८३४ मध्ये भारतात आल्यानंतर त्यांची भेट जेम्स प्रिन्सेपबरोबर झाली जिचे रूपांतर जिवलग मैत्रीत झाले. प्रिन्सेप त्यावेळेस अनेक शिलालेखांवर काम करत होते व लिपीचा शोध घेत होता. कनिंगहॅम यांनादेखील भारतीय इतिहासाची आवड निर्माण झाली.

ब्रिटिश सैन्यातील त्यांची कामगिरी जरी वाखण्याजोगी होती तरी इतिहासात त्यांचे नाव कोरले गेले ते त्यांच्या उत्खननातील अनेक शोधांमुळे. वयाच्या २१व्या वर्षी, वाराणसीमध्ये सैन्यात काम करताना त्यांचे लक्ष सारनाथ येथील मातीत गाडलेल्या काही अवशेषांकडे गेले. एखादा प्राचीन महाल असावा म्हणून त्यांनी वरिष्ठांकडे उत्खननासाठी परवानगी व निधी मागितला. परवानगी मिळाली; पण निधी नाही. कनिंगहॅम यांनी स्वतःचा पगार या उत्खननासाठी दिला. त्यात सापडलेला शिलालेख प्रिन्सेपने लिप्यांतरित करून हा धम्मेक स्तूप असून भ.बुद्धांनी येथे पहिले प्रवचन दिल्याचा उल्लेख असल्याचे सांगितले. १४५ फूट उंचीचा स्तूप पाहून कनिंगहॅम नतमस्तक झाले.

नंतर त्यांनी सांची येथील स्तूप, त्याची चारही तोरण, अनेक शिल्पाकृती उत्खननातून बाहेर काढल्या. भ.बुद्धांच्या तसेच सारीपुत्त व मोग्गलान यांच्या अस्थी शोधून काढल्या. येथील सर्व स्तूप पुनर्जीवित केले. हुयान त्सांग या चिनी बौद्ध भिक्खूच्या प्रवास वर्णनातून कन्नीन्घमने अनेक बौद्धस्थळे शोधण्याचा प्रयत्न केला.

त्यांनी कुशीनारा येथील बुद्धांचे महापरिनिर्वाण स्थळ शोधून काढले व तेथील १५०० वर्षे जुनी भ.बुद्धांची महापरिनिर्वाण मुद्रेतील मूर्ती उत्खननातून शोधून काढली. १८४६ मध्ये सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी त्यावेळेसच्या गव्हर्नर जनरल लॉर्ड कँनिंग यांना प्रस्ताव पाठवून भारतात पुरातत्त्व सर्वेक्षण सुरु करण्याचा आग्रह धरला.

 

त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि १८६१ साली Archaeological Survey of India ची स्थापना करण्यात आली आणि त्याचे पहिले डायरेक्टर जनरल म्हणून सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांनी भारतात उत्खननास खूप चालना दिली. १८८१ मध्ये त्यांनी बोधगयेतील उत्खननास प्रारंभ केला. तेथे सम्राट अशोक यांनी बांधलेले वज्रासन व बुद्धांच्या अस्थी त्यांनी शोधून काढल्या. सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांना प्रचंड आनंद झाला. नालंदा येथील उत्खनन जरी फ्रान्सिस बुकानन यांनी केले असले तरी ही वास्तू नालंदा विश्वविद्यालय असल्याचा शोध कनिंगहॅम यांनी लावला. तक्षशिला हे सर्वात प्राचीन बौद्ध विद्यापीठ त्यांनी शोधून काढले व उत्खननास प्रारंभ केला जे पुढे वीस वर्षे चालले. कनिंगहॅम यांनी अयोध्या येथे उत्खनन केले व हे पूर्वीचे बौद्ध विहार असल्याचा दाखला दिला.

नंतरच्या काळात झालेल्या उत्खननात सापडलेल्या कसौटी स्तंभ व त्यावरची शिल्पकाम याला पुष्टी देते. कनिंगहॅम यांनी अनेक प्राचीन बौद्ध स्थळांचा शोध घेतला व ते जगासमोर आणले. त्यांनी संपूर्ण भारतात उत्खनन केले व अनेक प्राचीन वास्तूंचा शोध लावला. १८८५ मध्ये सर अलेक्झांडर कनिंगहॅम Archaeological Survey of India मधून निवृत्त झाले, मात्र त्यांनी जे आदर्श घालून दिलेत ते आजही आधुनिक पुरातत्त्व शास्त्रज्ञांना मार्गदर्शक ठरत आहेत. प्राचीन भारतातील अनेक शहरे व तेथील पुरातत्त्व त्यांनी शोधले. त्यांनी उत्खनन केलेल्या प्रत्येक वास्तूचे त्यांनी सुंदर स्केचेस काढले तेही संपूर्ण बारीक तपशीलासहित. आजही त्यांचे स्केचेस जगभर अभ्यासले जातात.

सम्राट अशोक यांचे संपूर्ण शिलालेख, स्तंभलेख सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी तंतोतंत उतरवून काढले. शिलालेख कसे लिहून घ्यावेत याचे ते मूर्तिमंत उदाहरण आहे. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले मात्र त्यांनी सुरु केलेल्या Corpus inscriptionum indicarum ही ग्रंथ मालिका भारतीय इतिहास आणि पुरातत्त्वाचे मानदंड समजले जाते. सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांची २०७ वी जयंती आहे. त्यांना मनापासून त्रिवार वंदन.

– अतुल मुरलीधर भोसेकर
(संपर्क-9545277410)
—-

लेखक अतुल भोसेकर हे बौद्ध संस्कृतीचे अभ्यासक आहेत. याशिवाय बुद्ध लेण्यांचे अभ्यासक, प्रचारक, लेखक, भाषांतरकार आणि संपादक अशीही त्यांची ओळख आहे. ते बौद्ध साहित्य प्रसारक मंडळाचे अध्यक्षही आहेत. भोसेकर यांचे असंख्य लेख विविध माध्यमांत प्रसिद्ध झाले आहेत.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका