सरकार आपल्या दारी, पण विकासनिधी कोणाच्या घरी?
रस्त्याची चाळण, ठेकेदार, अधिकाऱ्यांची दिवाळी
सांगोला तालुक्यात लोकप्रतिनिधींचा धाक नाही. त्यामुळे जो तो अधिकारी हात ओले करण्यात दंग आहे. यांना तालुक्याच्या विकासकामांचे काही देणेघेणे नाही. पण प्रबळ विरोधक असलेलेही “हाताची घडी अन् तोंडावर बोट” ठेवून गप्प आहेत. आता हे असे किती दिवस चालणार?
सांगोला / नाना हालंगडे
सांगोल्यात सार्वजनिक बांधकाम विभाग दगड-गोट्यासारखा निगरगट्ट झाला आहे. विशेष म्हणजे या विभागातील काही अधिकाऱ्यांना कोणते रस्ते कुठे आहेत हेही माहित नाही. असे सर्व प्रकार होत असताना तालुकावासियांना मात्र नाहक त्रास सोसावा लागत आहे. त्यामुळे या उपअभियंत्याला कोणाचा राजाश्रय आहे ? हा सवाल उपस्थित होत आहे.
अख्खा सांगोला तालुका खड्ड्यात घालणारा सार्वजनिक बांधकाम विभागाचा उपअभियंता तालुक्यात कोणालाच जुमानत नाही, हे सध्या पहावयास मिळत आहे. तालुकाभर रस्त्याची चाळण झाली आहे. सध्या या विभागाकडून जी खड्डे बुजविण्याचे मोहीम सुरू आहे, ती ही “लाव लिजाव टिमकी बजाव” याप्रमाणेच आहे. त्यामुळे ठेकेदार मंडळीही हे खड्ड्यातील रस्ते मातीत घालत आहेत. याबाबत उपअभियंत्याला वारंवार विचारले पण हा मनमोजी अधिकारी नुसते ऐकून घेवून, आपल्या मनमानीप्रमाणे काम करीत आहे.
डिकसळ ते घेरडी, घेरडी ते शिरसी हद्द, घेरडी ते जवळा, जवळा ते कडलास , सांगोला ते महूद, सांगोला ते हलदहिवडी, जवळा ते डिकसळ, अकोला ते निजामपूर, जवळा ते मानेगाव, सांगोला ते अचकदाणी, जुनोनी ते बुद्धेहाळ, मेडशिंगी ते वाकीघेरडी, सोनंद ते डोंगरगाव यासह अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. यातील काही ठिकाणी खड्डे बुजविण्यास ठेका दिला आहे. पण हे ठेकेदारही खड्डे व्यवस्थित बुजवित नाहीत. सध्या सांगोला तालुक्याला कोणीच वाली नाही. अधिकारीही मनमानीप्रमाणे वागत आहेत.
कडलास गावामध्ये जो मुख्य रस्त्यावर मुरूम वजा दगड टाकले आहेत, ते 15 दिवसापासून तसेच रस्त्यावर आहेत. हे नेत्यांना दिसत नाही का? यासर्व बाबीवरून असे दिसते की सरकार आपल्या दारी, पण विकासनिधी सरकारी चोरांच्या घरी? पण हे असे किती दिवस चालणार?
विरोधकही गप्प
सांगोला तालुक्यात लोकप्रतिनिधींचा धाक नाही. त्यामुळे जो तो अधिकारी हात ओले करण्यात दंग आहे. यांना तालुक्याच्या विकासकामांचे काही देणेघेणे नाही. पण प्रबळ विरोधक असलेलेही “हाताची घडी अन् तोंडावर बोट” ठेवून गप्प आहेत. आता हे असे किती दिवस चालणार?
पुन्हा रस्ते खड्ड्यात
तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाने मागील आठ दिवसापूर्वी यांनी तालुक्यातील काही भागात खड्डे बुजविण्याची मोहीम आखली. पण जे खड्डे बुजविले ते आताही पुन्हा खड्ड्यात गेले आहेत. अशी ही परिस्थिती डिकसळ ते घेरडी रोड दरम्यान पहावयास मिळाली आहे. ठेकेदारांनीही वरवरची कामे करून त्रास देण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकामचा तालुक्यात कारभारही मनमानीच चालला आहे.