सरकारी शाळेतील २६ विद्यार्थिनींना कोरोनाचा संसर्ग, प्रशासन हादरले
काही विद्यार्थ्यांमध्ये सर्दी आणि खोकल्याची लक्षणे
थिंक टँक न्यूज नेटवर्क : एच. नाना
ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतील २६ विद्यार्थिनी कोविड पॉझिटिव्ह आढळल्या आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ठाकूरमुंडा, मयूरभंज येथील चमकापूर आदिवासी निवासी मुलींच्या शाळेतील २६ विद्यार्थिनींना करोनाची लागण झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. तर उर्वरित १५ विद्यार्थ्यांचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
जिल्हा प्रशासन हाय अलर्टवर
बाधित विद्यार्थ्यांना सरकारी शाळेच्या आवारात विलगीकरणात ठेवण्यात आले असून अधिकाऱ्यांकडून सातत्याने संपर्क साधला जात आहे. ‘जिल्हा प्रशासन हाय अलर्टवर आहे. डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर देखरेख करत आहे. औषधे दिली जात असून रुग्णवाहिका स्टँडबाय ठेवण्यात आल्या आहेत. परिस्थिती आणखी बिघडल्यास आम्ही विद्यार्थ्यांना डीएचएच रुग्णालयात हलवू, असे करंजिया उपजिल्हा दंडाधिकारी रजनीकांत बिस्वाल म्हणाले.
काही विद्यार्थ्यांमध्ये सर्दी आणि खोकल्याची लक्षणे
हा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे आणि शाळेचा परिसर दिवसातून दोनदा स्वच्छ केला जात आहे. COVID-19 सुरक्षा प्रोटोकॉलचा भाग म्हणून सर्व विद्यार्थ्यांचे नमुने करोना व्हायरस चाचणीसाठी गोळा केले जातील. शाळेमध्ये २० कर्मचारी सदस्यांसह एकूण २५९ विद्यार्थी आहेत. काही विद्यार्थ्यांमध्ये सर्दी आणि खोकल्याची लक्षणे दिसून आली होती. त्यानंतर ते गुरुवारी आजारी पडले. यानंतर शाळा प्रशासनाने आजारी विद्यार्थ्यांची कोविड-19 चाचणी करून घेतली. करोना तपासणीत २६ विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले.
१५ विद्यार्थ्यांचे नमुने चाचणीसाठी
चाचणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी २६ विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाल्याचे आढळून आले. तर इतर १५ विद्यार्थ्यांचे नमुने बारीपाडा जिल्हा मुख्यालय रुग्णालयात चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. हे विद्यार्थी जिल्ह्यातील ठाकुरमुंडा ब्लॉकमधील चमकापूर निवासी हायस्कूलचे रहिवासी आहेत.
या पार्श्वभूमीवर करंजियाचे उपजिल्हाधिकारी रजनीकांत बिस्वाल यांनी वैद्यकीय पथकासह शनिवारी शाळेला भेट दिली. ‘आम्ही शाळेची स्वच्छता केली आहे. सर्व पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांना शाळेत वेगळे करण्यात आले असून त्यांना औषधे दिली जात आहेत. डॉक्टरांचे पथक येथे असून आम्ही विद्यार्थ्यांवर बारीक लक्ष ठेवून आहोत, असे उपजिल्हाधिकारी रजनीकांत बिस्वाल यांनी सांगितले.