समाज माध्यमांद्वारे प्रसारित होणाऱ्या खोट्या बातम्या रोखण्यास पुढे या
शौरीनी बॅनर्जी यांचे पत्रकारितेच्या विद्यार्थांना आवाहन
सोलापूर – समाज माध्यमांद्वारे खोट्या बातम्या पसाविल्या जाण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे .पत्रकारितेचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सजग होऊन या खोट्या बातम्यांना आळा घालण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मदुराई येथील अमेरिकन महाविद्यालयातील डॉ . शौरिनी बॅनर्जी यांनी केले.
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्र संकुलातील मास कम्युनिकेशन विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘जागर पत्रकारितेचा’ या माध्यम सप्ताहात चौथ्या दिवशीच्या कार्यक्रमात डॉ.बॅनर्जी बोलत होत्या .सदर दिवशी विभागातर्फे ‘ फॅक्टशाला’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये डॉ.बॅनर्जी यांनी समाज माध्यमांद्वारे खोट्या बातम्यांचा प्रसार कसा होतो यासंदर्भातील माहिती विद्यार्थ्यांना विविध उदाहरणांसह दिली..खोट्या बातम्या ओळखण्यासाठी गुगल फॅक्ट चेक एक्स्प्लोरर तसेच इमेज रिव्हर्स रीसर्च यासारख्या गूगलने विकसित केलेल्या पद्धतींचा अवलंब करावा, असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले .
या प्रशिक्षण सत्रात बोलताना डॉ . बॅनर्जी म्हणाल्या की, समाज माध्यमांद्वारे जाणीवपूर्वक काही लोक प्रचार करण्यासाठी खोटी माहिती प्रसारित करतात. त्याचप्रमाणे सर्वसामान्य माणसाला आरोग्याच्या संदर्भात किंवा पैसे कमावण्याच्या संदर्भात प्रलोभने दाखवली जातात. अशा कुठल्याही प्रलोभनाला सर्वसामान्य माणसाने बळी पडू नये यादृष्टीने अशा बातम्यांमधील खोटेपणा अभ्यासकांनी निदर्शनास आणून देणे गरजेचे आहे. यासाठी गुगलने पुढाकार घेतलेला असून त्यासंदर्भात देशभरात तज्ज्ञांमार्फत प्रशिक्षण देण्याचे कार्य केले जात आहे, याचाच भाग म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील पत्रकारिता विभागात या प्रशिक्षणाचे आयोजन केले असल्याची माहिती डॉ.बॅनर्जी यांनी दिली.
समाज माध्यमांवर येणारा मजकूर आपण न तपासता इतरांकडे पाठवतो, असे न करता तपासूनच इतरांकडे पाठवायला हवा असे आवाहन करून डॉ. बॅनर्जी म्हणाल्या की लोक समाज माध्यमावरील मजकूर काळजीपूर्वक वाचत नाहीत त्यामुळे खोटी माहिती पसरवण्याचे व फसवणूक करण्याचे प्रकार घडत असतात. तंत्रज्ञानामुळे खोट्या गोष्टी ओळखणे सहज शक्य आहे. विद्यार्थ्यांनी या तंत्रांचा थोडा अभ्यास केला तर खोट्या बातम्या व फोटो ओळखून सर्वसामान्य माणसाला जागे करण्याचे काम विद्यार्थी करू शकतात असेही त्यांनी शेवटी सांगितले.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ.अंबादास भासके यांनी डॉ. बॅनर्जी यांचा परिचय करून दिला. या कार्यक्रमात विभाग प्रमुख डॉ .रवींद्र चिंचोलकर, तेजस्विनी कांबळे, डॉ.बाळासाहेब मागाडे, ऋषिकेश मंडलिक या अध्यापकांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .
‘जागर पत्रकारिता’ या माध्यम सप्ताहामध्ये पाचव्या दिवशी दिनांक 5 जानेवारी 2021 रोजी ‘जय महाराष्ट्र चॅनल ‘चे सहसंपादक मनोज भोयर हे टेलिव्हिजन माध्यमांसमोरील आव्हाने या विषयावर बोलणार आहेत तर दैनिक सकाळ सोलापूरचे सहयोगी संपादक अभय दिवाणजी हे क्राईम रिपोर्टिंग या विषयावर बोलणार आहेत .
—————————————————————————