सभा शिवसेनेची, टीका बापूवर.. हवा मात्र शेकापची
धुरळा खाली बसल्यानंतरचं खास रिपोर्टिंग

सांगोला/नाना हालंगडे
एरव्ही शांत असलेलं सांगोल्याचं राजकीय वातावरण मागील तीन दिवसांपासून प्रचंड तापलं होतं. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांची जंगी सभा. या सभेने हजारोंची गर्दी जमाविली. अंधारे यांनी केलेल्या तुफान बॉम्बबाजीने अनेकांना झळा बसल्या. अगदी नागपूरच्या अधिवेशनापर्यंत. ही सभा राज्यभर गाजली. या सभेचं विश्लेषण एकाच ओळीत करावे लागेल. ते म्हणजे.. “सभा शिवसेनेची, टीका बापूवर.. हवा मात्र शेकापची..”
सुषमा अंधारे यांची सांगोला येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभा होणार म्हटल्यावर या सभेला मोठा विरोध होऊ लागला. अनेक हिंदुत्ववादी, वारकरी संघटनांनी या सभेला परवानगी देवू नये अशी मागणी केली. अनेकांनी ही सभा उधळून लावण्याचा इशारा दिला. मात्र बहाद्दर शिवसैनिकांनी ही सभा यशस्वी करून दाखविली.
दोन दिवस आधी सभेच्या तयारीची पत्रकार परिषद घेतानाच शिवसेनेच्या नेत्या संजना घाडी यांनी “गद्दार आमदारांचा समाचार घेण्यासाठीच ही सभा आयोजित करण्यात आली आहे” हे स्पष्ट केले होते. त्यामुळे सुषमा अंधारे ह्या विरोधकांवर शब्दरूपी बॉम्बचा वर्षाव करणार हे नक्की होते. त्यामुळे पोलिस प्रशासन तणावात होते. मात्र, अखेर कोणतेही विघ्न न येता ही सभा यशस्वी झाली. असो..
टीका बापूवर.. हवा मात्र शेकापची
शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. “शहाजीबापू हे अपघाताने निवडून आले आहेत. शेकापचे उमेदवार डॉ. अनिकेत देशमुख यांच्यापेक्षा अगदी थोडी अधिक मते मिळाल्याने शहाजीबापू पाटील यांचा निसटता विजय झाला. मुळात अनिकेत यांना उमेदवारी देण्यासाठी भाई गणपतराव देशमुख हे उत्सुक नव्हते.
लोकरेट्यामुळे त्यांनी अनिकेत यांना तिकीट दिले. अनिकेत देशमुख हे निवडून आले तर भाई गणपतराव देशमुख यांच्यासारखे ते दीर्घकाळ निवडून येतील या भीतीपोटी काहीजणांनी शहाजीबापू पाटील यांना ताकद दिल्याचा आरोप अंधारे यांनी केला.
“भाई गणपतराव देशमुख यांचे या तालुक्यावर मोठे उपकार आहेत. त्यांच्या प्रयत्नातून तालुक्यात विविध जलसिंचन योजना मार्गी लागल्या आहेत. आ. शहाजीबापू पाटील यांनी केवळ राजकारणासाठी लाचारी पत्करू नये” असा सल्ला सुषमा अंधारे यांनी यावेळी दिला.
सुषमा अंधारे यांनी आपल्या दीड तासाच्या खणखणीत भाषणात भाई गणपतराव देशमुख यांचा अनेकदा आदराने उल्लेख केला. आबासाहेब यांच्यामुळेच सांगोला तालुक्याची महाराष्ट्र राज्यात नव्हे तर देशात ओळख असल्याचे निक्षून सांगितले. आदर्शवादी राजकारणाचा वस्तुपाठ घालून देणाऱ्या सांगोला तालुक्याचे प्रतिनिधित्व शहाजीबापू करत आहेत हे लोकांचे दुर्दैव असल्याचे अंधारे म्हणाल्या. अंधारे यांनी सांगोला ते महुद रस्त्यावरूनही शहाजीबापूंना लक्ष्य केले.
शहाजीबापू पाटील यांच्यासह विरोधकांवर टिकास्त्र सोडताना अंधारे ह्या भाई गणपतराव देशमुख यांच्या आदर्शवादी राजकारणाचे उदाहरण देत होत्या. “मी पहिल्यांदा सांगोल्यात आले नाही. यापूर्वी मी अनेकदा येथे आले आहे. माझी अनेक भाषणे या भागात झाली असून येथे मी ज्या ज्या वेळेस आले तेव्हा आबासाहेब यांना भेटून मार्गदर्शन घेत होते. आबासाहेब हे अकरावेळा निवडून आले. त्यांनी कोणतीच इस्टेट उभा केली नाही. मात्र, शहाजीबापू पाटील हे शिंदे गटाची सत्ता येवून तीन महिने होत नाहीत तोवर एक एकर जागेत बंगला बांधत आहेत” असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
पंढरपूर पाण्याचं.. मंगुड दाण्याचं.. अन् सांगुलं सोन्याचं… असे या भागाला का म्हटले जाते हे सांगतानाच सांगोला भागात पिकत असलेले डाळिंब, द्राक्षे ही परदेशात निर्यात केली जात असल्याचे अंधारे यांनी सांगितले. या भागात शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्यात भाई गणपतराव देशमुख यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचे अंधारे यांनी सांगितले.
हवा शेकापचीच
सुषमा अंधारे ह्या आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर टीका करत असतानाच प्रत्येक ठिकाणी भाई गणपतराव देशमुख यांचा आदर्श मांडत होत्या. ही सभा शेकापसोबतच इतर पक्षाचे कार्यकर्तेही वेगवेगळ्या माध्यमातून पाहत, ऐकत होते. जेवढी बापुवर टीका तेवढी आपली हवा असा सूर निघत होता.
असो, सुषमा अंधारे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचाच जणू शुभारंभ या सभेतून केला आहे. येत्या दोन वर्षांत विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या निवडणूकीच्या प्रचाराच ट्रेलरच जणू अंधारे यांच्या या सभेतून दिसून आला. या भागात पुढच्या काळात अनेक सभा घेणार असल्याचे सूतोवाचही सुषमा अंधारे यांनी भाषणात दिले आहे.
हेही पाहा
One Comment