सनमडीत इंद्रायणी तांदळाचे विक्रमी उत्पादन
कोकणातील इंद्रायणी दुष्काळी टापूत
थिंक टँक न्यूज नेटवर्क : डॉ. नाना हालंगडे
धन धान्याचं काय आता काश्मिरातील सफरचंदही आपल्या भागात येवू लागलेत. अशातच जत तालुक्यातील सनमडी येथील हणमंत धायगुडे या शेतकऱ्याने कोकणातील इंद्रायणी भात आपल्या शेतात लागण करून विक्रमी उत्पादनही घेतले.
सध्या राज्यभर वेगवेगळ्या प्रांतात वेगळी पिके, फळे पहावयास मिळतात. पण आता शेतकरीही आधुनिक शेतीचे वेगवेगळे प्रयोग आपल्या शेतात घेत असल्याने कोणतीही पिके कुठेही येत आहेत. या शेतीतील वेगवेगळ्या पीकपद्धतीमुळे शेतकरीही आधुनिक झाला आहे.
जत तालुक्यातील सनमडी येथील प्रगतशील बागायतदार हणमंत बिराप्पा धायगुडे यांच्याकडे १० एकर शेतजमीन आहे. सतत दोन वर्षापासून चांगला पाऊस पडत असल्याने शेतजमीन पडीकच होती. अशातच म्हैसाळ योजनेचे पाणीही मुबलक येत असल्याने जमीन पाणवठ झाली होती. त्याच वेळी हनमंत यांनी जुलै महिन्यामध्ये इंद्रायणी भाताची लागण केली. दोन एकरामध्ये ३५ पोती तांदूळही झाला.
धायगुडे हे उच्चशिक्षित आहेत. ते शेतीमध्ये सतत नवनवीन प्रयोग करीत असतात. थंड हवामानातील अतिरिक्त पावसातील उच्च प्रतीचा इंद्रायणी भात यांनी आपल्या शेतात करून विक्रमी उत्पादनही घेवून दाखविले. त्याच्या या इंद्रायणी भाताच्या शेतीमुळे तालुक्यात चर्चेचा विषय झालेला आहे. संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकरी ही भात शेती पाहण्यासाठी येत आहेत.
इंद्रायणी तांदळाची लोकप्रियता
आंबेमोहराप्रमाणेच सुगंधित, चवीला गोड, खाण्यास मऊ , पण थोडा चिकट असलेल्या इंद्रायणी तांदळाची लोकप्रियता गेल्या काही वर्षांत राज्यभर वाढू लागली आहे. अवघ्या तीस वर्षांपूर्वी विकसित करण्यात आलेल्या इंद्रायणी तांदळाच्या गुणांमुळे त्याला मुख्य आहारात वाढत चाललेली मागणी लक्षणीय आहे.
आंबेमोहराप्रमाणेच सुगंधित, चवीला गोड, खाण्यास मऊ , पण थोडा चिकट असलेल्या इंद्रायणी तांदळाची लोकप्रियता गेल्या काही वर्षांत राज्यभर वाढू लागली असून पुणेकरांच्या पसंतीला उतरलेल्या या मावळातील तांदळाने आता मुंबईकराच्या थाळीतही स्थान मिळविले आहे. अवघ्या तीस वर्षांपूर्वी विकसित करण्यात आलेल्या इंद्रायणी तांदळाच्या गुणांमुळे त्याला मुख्य आहारात वाढत चाललेली मागणी लक्षणीय आहे.
राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वडगाव मावळ येथील संशोधन केंद्रात आंबेमोहोर व १५७ आयआर ८ या दोन तांदळाच्या जातींचा संकर करण्यात आला. त्यातून १९८७ साली इंद्रायणी ही जात विकसित करण्यात आली. मावळ, वेल्हा, भोर, मुळशी, जुन्नर, आंबेगाव, राजगुरुनगर, वाई, जावळी, पाटण, कराड, नगर जिल्ह्य़ांतील अकोले, नाशिकच्या धुळे, नंदुरबार या भागांत त्याचे उत्पादन सुरू झाले. त्यानंतर शेतकरी आंबेमोहोरऐवजी या तांदळाकडे वळले. आता सह्य़ाद्रीच्या कडेला असलेल्या सखल भागात कोल्हापूरपासून ते घोटीपर्यंत त्याची लागवड सुरू झाली. त्याची लागवड ही विदर्भातही सुरू झाली आहे. आता हाच तांदूळ जत तालुक्यात उत्पादित केला जात आहे.
इंद्रायणीमध्ये अमायलुज हा घटक १८ ते १९ टक्के आहे. त्यामुळे तो चिकट होतो. आता राष्ट्रीय स्तरावर तांदूळ संशोधनाची मानके निश्चित करण्यात आली आहेत. त्यामध्ये अमायलुज हा घटक २० ते २५ टक्के असेल तरच कृषी अनुसंधान परिषद भाताची जात प्रसारित करायला संशोधन संस्थांना मान्यता देते. मात्र इंद्रायणी हा मानकांची निश्चिती करण्यापूर्वी प्रसारित झाला. त्यामुळे त्याला मान्यता मिळाली.