संवेदनशील मनाचा हृदयस्पर्शी आविष्कार : “कैवार”

डॉ. शिवाजी शिंदे लिखित "कैवार" काव्यसंग्रहाचे प्रा.विनय मडगावकर यांनी केलेले मर्मग्रही परीक्षण

Spread the love

विलियम वर्ड्सवर्थ यांनी कवितेची व्याख्या “The spontaneous overflow of powerful feelings; it takes its origin from emotion recollected in tranquility”, अशी  केली आहे. असाच हृदयस्पर्शी उत्कट भावनावेग डॉ. शिवाजी शिंदे सरांच्या ‘कैवार’ या संग्रहातील काव्यरचनांमधून अक्षरबद्ध झाला आहे. प्रशासकीय संरचनेत कार्य करत असताना निर्मळ प्रवृती आणि संवेदनशीलता या दैवी गुणसंपदेमुळे कवीमनाचे हे सुस्वभावी अधिकारी इतरांपेक्षा वेगळे ठरतात. त्यांना वास्तवाचे भान आहे, तसेच प्रतिभेचे वरदान लाभले आहे. ‘कैवार’ या संग्रहातील प्रत्येक कविता वाचताना याचा प्रत्यय येतो.

आपल्या लेखन प्रेरणेविषयी ते लिहितात, “समाजात वावरत असताना काही घटना, प्रसंग यामुळे मी अस्वस्थ व्हायचो आणि या अस्वस्थतेतून निर्माण झालेली शब्दरूपी संवेदनाच मला लिहिण्यासाठी प्रवृत्त करत गेली हीच माझ्या लेखनाची प्रेरणा.” संवेदनशील मनाच्या अस्वस्थ भावनेतून कविता उत्स्फूर्तपणे आविष्कृत होत असते. सामाजिक जीवनात कार्यरत असताना कवीने पाहिलेल्या, अनुभवलेल्या काही वेदनादायी घटना प्रसंगामुळे क्षुब्ध झालेल्या त्यांच्या मनाचा हुंकार ‘कैवार’ या संग्रहातील काही रचनांमधून प्रकट झाला आहे.

भारतीय सामाजिक परिप्रेक्षात नितीमुल्यांना अधिक प्राधान्य दिले आहे. घर-परिवारातून, शाळा-महाविद्यालयामधून आपल्यावर संस्कार होत असतात. वडीलधारी माणसे, गुरुजन यांच्या अनुकरणाने आपण कळत-नकळत त्यांच्या आचरणाद्वारे जाणवणाऱ्या नितीमुल्यांचा स्वीकार करत असतो. या सर्वात आपला जन्मदाता वडील, हा आपला प्रिय आदर्श असतो. आईच्या तुलनेत वडिलांवर कमी प्रमाणात काव्यरचना उपलब्ध आहेत. ज्या आहेत त्यापैकी ‘बाप नावाचा माणूस’ ही ‘कैवार’ संग्रहातील रचना लक्षवेधी आहे.

“प्रलोभनाला, अमिषाला बळी न पडणारा
स्वाभिमानाने जगणारा
गरजवंताच्या मदतीला धावून जाणारा
अन्यायाविरुध्द लढणारा
बाप पाहिला मी”

असा स्वाभिमानाने जगणारा कणखर बाप, आपल्या मुलांवर इमानदारीचेच संस्कार करतो, परंतु बेइमानांच्या जगात त्याने जगायचे कसे? असा यक्षप्रश्न कवीच्या मनाला सलत आहे. कवीच्या या भावना आणि त्या शब्दबद्ध करण्याचा आवेश अधिक तीव्र असला, तरी तो नेमकेपणाने ‘माझा कष्टकरी बाप’ या कवितेत व्यक्त झाला आहे.

“बाबा, तुम्ही म्हणताय इमानदारीने जगावं
परंतु इमानदार क्षणाक्षणाला मरतो आहे
बेइमान मात्र रोज मजेत
आपला खिसा भरतो आहे”

असे वास्तव कवी मांडतात. कवीकडे मानवी जीवन व्यवहार आणि सामाजिक क्षेत्रातील  बऱ्यावाईट अनुभवांचे समृद्ध भांडार आहे. प्रस्तुत संग्रहातील शब्दांची महती कथन करणारी ‘शब्द’ कविता, ‘माणसाकडूनच’, ‘आजकाल’, ‘माणुसकीच्या शोधात’, ‘तू वागला नाहीस तर’, अशा रचनांमधून आपल्या प्रशासकीय अनुभवांचे सार त्यांनी नेमक्या शब्दात प्रस्तुत केले आहे. यापैकी ‘वास्तविकता’ सारखी काव्यरचना स्थल आणि कालाच्या बंधनात बंदिस्त राहणारी नाही, अशीच आहे. शेक्सपियरच्या नाटकात ज्युलियस सीझरच्या पाठीत खंजीर खुपसणारा एकच ब्रुटस त्या काळात  होता. आपल्या आयुष्यात तर पावलोपावली अनेक ब्रुटस, हितचिंतक असल्याचे भासवत अहित करण्यासाठीच टपून बसलेले असतात. अशा लोकांसाठी संत ज्ञानदेवांनी ‘जे खळांची व्यंकटी सांडो’ असे म्हणून पसायदान मागितले. असाच अन्वयार्थ ‘वास्तविकता’ या कवितेत दिसून येतो.

“पाठीत खंजीर खुपसणारे पुष्कळ आहेत
काळाची पावले जरा ओळखायला शिका
कुणाला आनंद देता आला नाही तरी चालेल
परंतु निदान दुःख तरी कोणाला देऊ नका”

उपरोल्लिखित ‘वास्तविकता’ या कवितेत कवीने मांडले हे जीवनमूल्य स्थलकालनिरपेक्ष आहे. त्याचप्रमाणे ‘सरते वर्ष’ ही अशीच दर वर्षाच्या अखेरीस समर्पक ठरणारी रचना आहे.

“कधी अपमान कधी सन्मान
कधी परिस्थितीचे भान शिकवून जाते
सरते वर्ष सरून जाते
अनुभवांची शिदोरी घेऊन जाते”

प्रत्येक वर्षीच्या शेवटी जाणवणारा हा वार्षिक अनुभव आहे. कवी आपल्या अशा विविध जीवनानुभावांचे कथन काव्यामधून वेगवेगळ्या पद्धतीने करत आहे. दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणारी मानवी संवेदनाच कालपरत्वे बधीर होत चालली आहे. परिस्थितीनुरूप इतर लोक कोणत्या प्रसंगी कोणता विचार करतात, कोणता विचार करत नाहीत अथवा करू शकत नाहीत, याचा वेध कवीने ‘शेतकऱ्याचे दुःख’ या कवितेत सजगपणे घेतला आहे.

“शेतकरी शेतामध्ये राब राब राबतो
शेतमालाची किंमत मात्र व्यापारी करतो
हे सर्वसामान्यांच्या बुद्धीला पटेना
शेतकऱ्यांचे दुःख पाहून कोणासही काही वाटेना”

शेतकरी हा संपूर्ण राष्ट्राचा अन्नदाता, आर्थिक जगतातील नीतीमुळे त्याच्यावर उपाशी रहायची वेळ का येते? या प्रश्नाचे  उत्तर या कवितेत आहे.

भारतीय कृषी संस्कृतीच्या केंद्रस्थानी असलेल्या शेतकऱ्याचे भवितव्य पर्जन्यवृष्टीवर अवलंबून असते. ‘हुलकावणी’ आणि ‘अवकाळी पाऊस’ या दोन्ही रचना पावसामुळे निर्माण होणाऱ्या भिन्न परिस्थिती दर्शवणाऱ्या आहेत. एका रचनेत पावसाची प्रतीक्षा आहे, तर दुसरीत ‘अवकाळी पाऊस’ बरसल्यामुळे बागायतीत होणाऱ्या नुकसानाचे विवरण आहे.

 “कुणाच्या ध्यानीमनी नसताना धो धो बरसला
शेतकऱ्याच्या अशा-अपेक्षाचा भ्रमनिरास झाला
लेकरावानी सांभाळलेले द्राक्ष-आंबा-डाळिंब बागा
मातीमोल झाल्याने बळीराजा पार उन्मळून पडला”

कवीची अंतर्दृष्टी इतर लोकांपेक्षा उच्च असते म्हणूनच, कवी नवीन कल्पना तयार करू शकतो आणि त्या आपल्या प्रतिमा आणि प्रतीकांसह सादर करू शकतो. उपरोल्लिखित कवितेमधील “लेकरावानी सांभाळलेले द्राक्ष-आंबा-डाळिंब बागा मातीमोल झाल्याने बळीराजा पार उन्मळून पडला” या ओळीतील ध्वनीत होणारे विविध अर्थ गंभीर आणि मन थरारून सोडणारे आहेत. कारण शेतकऱ्याचे उन्मळून पडणे, हे आर्थिक, सामाजिक आणि मानसिक असते. त्याची परिणीती काही वेळा भयावह असते. हे भीषण वास्तव कवीने सूचकपणे मांडले आहे.

गाई, बैल, वासरे हे तर कृषी जीवनाचे अविभाज्य घटक, शेतकऱ्याच्या परिवाराचे सदस्य. त्यांच्यावर पुत्रवत माया केली जाते, त्यामुळेच बेंदूर तथा बैलपोळा या सणाला कृषी संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. अचानक हा आधारच नाहीसा झाला तर, शेतकरी हादरून जातो. ‘महापुरानंतरचं उद्ध्वस्त गाव’ या कवितेत हे विदारक वास्तव आले आहे.

“लेकरावानी सांभाळलेल्या बैलाचं हंबरणं बंद झालं
त्याच्या गळ्यातल्या चाळांचं खुळखुळ वाजणंही थांबलं
महापुरानं सारं गावच उद्ध्वस्त झालं”

अशा परिस्थितीतही हतोत्साही होणं हा कवीचा पिंड नाही. ‘पुरग्रस्ताचे मनोगत’ या कवितेत कवीच्या मनातील मानवी जीवनाबद्दलच्या सकारात्मक आस्थेचा उत्कट प्रत्यय येतो.

“महापुरान निर्माण झालेली दलदल स्वतः आवरेन मी
खचून न जाता स्वतःसह सर्वांनाच सावरेन मी
महापुराचा सामना हिमतीने करीन मी
या संकटातूनही पुन्हा उभा राहीन मी”

या कवितेतील ‘खचून न जाता स्वतःसह सर्वानाच सावरेन मी’ ही ओळ वाचतांना कविवर्य कुसुमाग्रजांच्या ‘कणा’ या कवितेतील ‘मोडून पडला संसार, पण मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा’ या ओळींचे स्मरण होते. केवळ प्राक्तन म्हणून समोर आलेले भागदेय स्वीकारण्यापेक्षा नियतीलाच आव्हान देण्याची धमक ‘प्रवृत्ती’ या काव्यात आहे.

“संकटाला घाबरून डगमगून जाऊ नकोस
वादळाला परतवून लाव… मैदान सोडू नकोस”

कुरुक्षेत्रातील रणभूमीवर श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता उपदेश केला. त्यातील ‘तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धस्य कृत निश्चयः’ या प्रेरणादायी उद्बोधनाचा मथितार्थ ‘प्रवृत्ती’ कवितेत प्रकट झाला आहे.

कवी जीवन आणि निसर्गाविषयीचे सत्य शोधत असले तरी ‘कोरोना’सारख्या विषयावर भाष्य करतांना पूर्णपणे सावध असल्याचे जाणवते. कवीने ‘कोरोना’ची चिकित्सा करण्यापेक्षा त्याचा मानवी जीवनावर झालेल्या परिणामांवर अभ्यासकांचे लक्ष केंद्रित केले आहे. त्यांची ‘कोरोना तू हे मात्र चांगलं केलं’ ही रचना कालदर्शक आहे, तशी ती मुल्यदर्शक आहे. कवीचे कालाभान प्रशंसनीय आहे, त्यामुळे त्यांच्या ‘चला, सर्व एकजुटीने कोरोना विषाणूशी लढू’ या रचनेत कालस्वर तीव्रतेने जाणवतो.

कवीच्या सूक्ष्म निरीक्षणांचे काव्यातून होणारे प्रकटीकरण, त्याचे विविध अन्वयार्थ स्तिमित करणारे आहेत. ‘कोवळ्या अर्भकांचा काय दोष?’ या कवितेत आपल्या निष्पाप नवजात अर्भकांना रस्त्यावर फेकणारे जन्मदाते आणि ‘कृतघ्न मुलं’ या कवितेत जन्मदात्यांना सोडून जाणारी त्यांचीच मुले, असा अमानुष विरोधाभास दिसून येतो. दुसरीकडे ‘पोरीचं लगीन’, ‘तुम्ही म्हणता, ती कुठं काय करते’ ‘संकल्प महिला दिनाचा’, या त्यांच्या न्याय्य रचना समाजभान जगवणाऱ्या आहेत. ‘मुकं मन’, ‘ओढ’ या कवितांमध्ये त्यांनी स्नेहभाव केंद्रस्थानी ठेवला आहे.

प्रस्तुत काव्यसंग्रहातील ‘सेवेकर्‍यांनो या हो | या हो ’, ‘दत्ता धाव रे’, ‘स्वामी समर्थ’ या काव्यांच्या माध्यमाने प्रस्तुत संग्रहात कवीने परमेश्वराचे श्रद्धेय अधिष्ठान निर्माण केले आहे. देवभक्तीबरोबर देशभक्तीला प्राधान्य देत ‘तुम्ही येणार आहात म्हणून’ या काव्यात भारतमातेच्या रक्षणार्थ वीरगती प्राप्त भारतीय वीरांना आणि ‘वर्दीतल्या दर्दी माणसाला माझा सलाम’ या रचनेत देशातील न्याय-सुव्यवस्थेसाठी तत्पर कर्तव्यदक्ष पोलिसांना कवीने अभिवादन केले आहे.

स्मरण-रमणीयता या मूल्यानुसार ‘राजे, आपण आज हवे होतात’ या रचनेत कवी भविष्याचा वेध घेत वर्तमानात भूतकाळ आठवण्याचा प्रयत्न करतात.

“मरगळलेल्या तरुणांमध्ये नवचैतन्य जागवायला
हरवत चाललेला आत्मविश्‍वास निर्माण करायला
समाजाची विस्कटलेली घडी पुन्हा बसवायला
राजे, आपण आज हवे होतात”

भक्त‘कैवारी’ स्वामींवर विश्वास ठेवून महाराज शिवछत्रपतींचा आदर्श समोर ठेवणाऱ्यांना काहीच अशक्य नाही. एकूण ‘कैवार’ या काव्य संग्रहात शिंदे सरांनी आपल्या प्रशासकीय अनुभवांचे तसेच सामाजिक विषयांचे काव्यात्मक प्रस्तुतीकरण उत्तम प्रकारे केले आहे. सरळ सोप्या भाषेत समाजभान जागवणारी आणि कालस्वर प्रकट करत, स्वानुभवाच्या मुशीतून साकारलेली आत्मनिष्ठ कविता, वाचकाला आपली वाटाणे स्वाभाविक आहे. या रचना हृदयस्पर्शी आहेत, तशाच त्या समीक्षक आणि अभ्यासक यांच्या बुद्धीला आवाहन करणाऱ्या आहेत. भावी काळात माननीय डॉ. शिवाजी शिंदे सरांच्या हस्ते अशीच सर्जनशील साहित्यनिर्मिती होत राहो आणि उतरोत्तर त्यांची प्रगती होत राहो, हीच स्वामी चरणी प्रार्थना.

-प्रा. विनय मडगावकर
(मराठी विभाग, गोवा विद्यापीठ, गोवा)
संपर्क : ८३०८४७७६६४
vinay@unigoa.ac.in

   कोलाज आठवणींचा

 

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका