संविधान हा जगण्याचा विषय : डॉ. बाळासाहेब मागाडे
सम्यक अॅकॅडमीच्या संविधान परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद
सोलापूर : थिंक टँक न्यूज नेटवर्क
भारतीय संविधानाने आपल्याला हक्क आणि अधिकारांसोबत जबाबदारीचीही जाणीव करून दिली आहे. स्वातंत्र्य आणि अधिकार उपभोगताना जबाबदारीही निभावायला हवी. प्रशासनात काम करीत असताना आपली बांधिलकी संविधान आणि जनतेप्रती असायला हवी, असे प्रतिपादन पत्रकार डॉ. बाळासाहेब मागाडे यांनी केले.
सोलापूर येथील सम्यक अॅकॅडमीतर्फे आयोजित संविधान परीक्षेच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. संविधान दिनाचे औचित्य साधून सोलापूर येथील सम्यक अॅकॅडमीतर्फे संविधान परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रमुख पाहुणे म्हणून सम्यक अॅकॅडमीचे मार्गदर्शक तथा राज्य विक्रीकर निरीक्षक बुद्धजय भालशंकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहुजन शिक्षक, कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर होते. प्रारंभी राज्य विक्रीकर निरीक्षक बुद्धजय भालशंकर यांनी प्रास्ताविक केले.
उद्घाटकिय मनोगत व्यक्त करताना डॉ. मागाडे पुढे म्हणाले की, स्पर्धा परीक्षा देवून प्रशासनात जाण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. आपण प्रशासनात गेल्यानंतर आपल्याला आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल. आयुष्य सुखमय बनेल. मात्र हे सर्व होत असताना आपण ज्या समाज घटकातून आलो त्याचा विसर पडता कामा नये. एक अधिकारी म्हणून समाजाला आपल्याकडून खूप अपेक्षा असतात. त्यांच्या अपेक्षांची पूर्तता व्हायला हवी. प्रशासनात जशा वाईट प्रवृत्ती असतात तसेच पारदर्शी, लोकाभिमुख काम करणारेही अधिकारी असतात. आपली बाजू ही जनतेची बाजू असायला हवी. आज तसे होताना दिसत नाही. राजकीय सत्तेचे प्रेशर कमालीचे वाढले आहे. अशाही परिस्थितीत आपण जेवढे शक्य होईल तेवढे जनतेच्या विश्वासास उतरायला हवे.
राज्य विक्रीकर निरीक्षक बुद्धजय भालशंकर यांनी एवढ्या मोठ्या पदावर पोहोचूनही समाजाप्रती ठेवलेली बांधिलकी आदर्शवत आहे. त्यांच्या पत्नी तथा इस्त्रोच्या संशोधक मोनाली मेश्राम यांचेही या उपक्रमात बळ मिळत आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पुणे, मुंबई येथे लाखो रुपये खर्च करावा लागतो. बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना हे शक्य होईल असे वाटत नाही. हे ओळखून राज्य विक्रीकर निरीक्षक बुद्धजय भालशंकर यांनी सुरू केलेला मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा उपक्रम समाजात चांगलेही काहीतरी घडत असल्याचे सुचिन्ह आहे.
बहुजन शिक्षक, कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर म्हणाले की, अशा उपक्रमाची खूप गरज होती. दुसरा कोणी ते करेल याची वाट न पाहता आपण पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांचा प्रशासकीय सेवेत जाण्याचा मार्ग सुकर व्हावा या हेतूने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. अनेक अडचणींवर मात करून हा उपक्रम अविरतपणे चालू ठेवणार आहोत. संविधान दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या मनात एक आदर्श नागरिक म्हणून चांगली भावना रुजावी हा या उपक्रमाचा हेतू आहे. या सम्यक अॅकॅडमीमध्ये शिकणारे कैक विद्यार्थी यशस्वी होऊन प्रशासनात जातील हा आमचा निश्चय आहे. विद्यार्थी ते साध्य करून दाखवतील.
प्रास्ताविकात राज्य विक्रीकर निरीक्षक बुद्धजय भालशंकर म्हणाले की, स्पर्धा परीक्षा अभ्यासाच्या योग्य सोई सुविधाअभावी अनेक विद्यार्थी यश संपादन करू शकत नाहीत. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना या सम्यक अॅकॅडमीचा फायदा होईल. अॅकॅडमीतून दरवर्षी अनेक विद्यार्थी अधिकारी म्हणून प्रशासनात रुजू होतील, असा विश्वास आहे.
संविधान परिक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनी हा कार्यक्रम झाला. सोलापूर व म्हैसगाव या दोन केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. सोलापूर येथे ६० तर म्हैसगाव येथे ७८ स्पर्धकांनी सहभाग घेतला. या परीक्षेसाठी प्रत्येकी दोन हजार रुपये प्रमाणे एकूण १४ हजार रुपये बक्षीस ठेवण्यात आले होते. २५ डिसेंबर रोजी याचे बक्षीस वितरण होणार आहे. सूत्रसंचालन राहुल साखरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन खंडू कोळी यांनी आभार मानले. परीक्षा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सत्यवान पाचकुडवे, प्रा.डॉ. राजदत्त रासोलगीकर, प्रा. सुधाकर गायकवाड, मुख्याध्यापक विनोद धुवर, बी. एन.गायकवाड, सुशीलचंद्र भालशंकर, अक्षय किराद, कपिल क्षीरसागर, सिद्धार्थ बनसोडे, सुमित चलवादी, बहुजन आवाज न्यूज पोर्टलचे संपादक विजयकुमार लोंढे, भारत कापरे, ज्ञानेश्वर धांडे, एकनाथ रिकिबे, अशोक कांबळे, महादेव माने, शिवाजी खारे, ज्ञानदेव शिंदे, चंद्रशा गायकवाड, रत्नदीप कांबळे आदींनी परिश्रम घेतले.