संभाजीराजे, स्वराज्य रक्षक की धर्मवीर? हिंदू धर्मातल्या औरंगजेबांची खेळी
श्रीकांत देशमुख यांचा खणखणीत लेख
इतिहासाचा अर्थ कसा लावायचा याचे मर्यादित स्वातंत्र्य सगळ्यांनाच आहे. कारण आपण न पाहिलेल्या, फारसे पुरावे उपलब्ध नसणाऱ्या घटनांविषयी बोलत असतो. त्याच्या मूलभूत मर्यादा काय आहेत याचा विसर सोयीनुसार मात्र सगळ्यांनाच पडतो. मुळात इतिहास हा तुमचा बटीक किंवा गुलाम नाहीये, हे आधी ध्यानी घेतले पाहिजे. इतिहास हे पाळण्यात घालून झोका द्यावे असे नेणते बाळही नाही.
इतिहास हे तुमचे वर्तमानात राजकीय, सांस्कृतिक सत्ता हाती घेण्याचे आणि ती टिकवून ठेवण्याचे साधन नाहीये. जे कोणी असा प्रयत्न करत असतील त्यांनी त्यांच्या पूर्वजांना आपला वारसा विचारावा आणि त्यानंतर बोलावे. इतिहासाची भाषा परंपरेने जी चालत आलीय तीच बोलायची नसते. तिचे सांस्कृतिक, राजकीय आणि वास्तविक संदर्भ ध्यानी घ्यायचे असतात. मराठ्यांचा इतिहास ही कळसूत्री बाहुली नाही की ज्यांना जसे तिला नाचवायचे तसे नाचवावे आणि आपले सुमार राजकीय हितसंबंध साधून घ्यावेत.
संभाजी राजे हे धर्मवीर की स्वराज्य रक्षक, असा काहीसा वाद रा रा अजितदादा पवार यांच्या विधानाच्या निमित्ताने पेटवला जात आहे. असाच वाद सुषमा अंधारे यांनी वारकरी संप्रदायावर जे काही विधान केले त्यावर पेटवला गेला. त्यावर ‘वारकरी संप्रदायाचे वाटोळे कोणी केले’ या टिपणीत मी माझी भूमिका रीतसर मांडली होती. तिला मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व असा होता. ते सरते न सरते तर हा नवा वाद आता उफाळून आला आहे.
एक नवी असहिष्णुता , जी आत्यंतिक विषारी आहे ती आम्ही रुढ करू पहात आहोत, तिला उन्मत्त प्रतिसाद देत आहोत. मुळात जी महाराष्ट्र संस्कृतीची परंपरा नाहीये. मग आज हा खेळ कोण खेळत आहेत आणि त्याला प्रतिसाद कोण देत आहे, हा खरा प्रश्न आहे.
महाराष्ट्र धर्म, नावाची एक गोष्ट होती, आहे. या भूमीच्या गुणांची आणि या मातीला ज्यांनी हा गुण दिला त्यांची मुळात ही गोष्ट आहे. रामदास, राजवाडे, पुरंदरे ही एक परंपरा आपल्याकडे आहे. ज्या रामदासांनी, उदंड जाहले पाणी, स्नानसंध्या करावया, जप तप अनुष्ठाने आनंदवन भुवनी, अशी भूमिका मांडली. पाणी उदंड, पण ते कश्यासाठी, तर जप तप संध्या यासाठी. शेतीसाठी नाही. हा शेतकरी लोकांचा देश आहे, हे सारासार विसरून मांडलेली ही भूमिका आहे.
शिवाजीराजे यांच्या जन्मापासूनचा इतिहास जरी ध्यानी घेतला तरी राजे हे कुणबी मनाचे राजे होते हे लक्षात येते. मग स्नान संध्या कुठून आली? पुण्याची भकास, उध्वस्त झालेली भूमी माँ जिजाऊ साहेबांनी नांगराला सोन्याचा फाळ लावून नांगरली, याचा प्रतिकात्मक अर्थ काय आहे? मुळात उदंड जाहले पाणी, यातले काव्य बाजूला ठेवून विचार केला तर ही भूमिका महाराष्ट्रद्रोही होती.
आजवर आपण तिला कुरवाळत बसलो आणि गोब्राम्हण प्रतिपालक शिवाजी मान्य केला. तिचाच वारसा राजवाडे वगैरे लोकांनी आधुनिक काळात पुढे नेऊन, टाळकुट्यानी महाराष्ट्र बुडवला, ही भूमिका मांडली. या लोकांनी मांडलेला तथाकथित ‘महाराष्ट्र धर्म’ हाच खरा धर्म आहे असे आपण दुर्दैवाने मान्य करत आलो. दुसरी बाजू, जी जोतीराव, रानडे, लोकहितवादी, शेजवलकर मांडत होते ती कोणी ध्यानात घेतलीच नाही. त्याचेच भयंकर परिणाम आज आपण भोगत आहोत आणि खऱ्या चिकित्सेला नकार देत आहोत.
संभाजीराजे यांची यथेच्छ बदनामी बखरी, तथाकथित लेखक, कवी, इतिहासकार, नाटककार यांनी केली. व्यसनी, बदफैली, बापाचा वारसा न चालवणारा वाह्यात मुलगा वगैरे या रीतीने. त्याला त्या काळात कोणीही नीट उत्तर नाही दिले. शिवाजी राजांची पन्नास वर्षांची जन्म ते मृत्यू अशी एकूण कारकीर्द आणि संभाजीराजे यांची ठळक अशी केवळ दहा वर्षांची कारकीर्द, याचा विचार करता संभाजीराजे कुठे कमी पडले याचा जाणत्यानी विचार करावा.
जर समजा संभाजी राजे यांना आणखी किमान दहा वीस वर्षे मिळाली असती तर? त्यांचे केवळ दहा वर्षातले कार्यकर्तृत्व लक्ष्यात घेतले तर त्यांनी शिवाजीराजे यांच्यापेक्षाही अधिक कर्तृत्व गाजवले असते हे ध्यानी येते. मुळात गंमत ही आहे की ते ध्यानी येऊ नये याची कारस्थाने ते हयात असल्या पासूनच रचली गेली. त्यासाठी अनेक अनाजीपंत कार्यरत होते, आजही आहेत.
अजितदादा पवार हे इतिहासकार नाहीत, हे मान्यच आहे. याचा अर्थ त्यांना इतिहास अजिबातच कळत नाही असेही कोणी समजू नये. खऱ्या इतिहासाला वाळवी कोणी लावली, हा खरा प्रश्न आहे. गोब्राम्हण प्रतिपालक शिवाजी आणि धर्मवीर संभाजी असे म्हणणाऱ्यांनी. हा वारसा आधुनिक काळात चालवला तो पुरंदरे, रणजित देसाई असल्या लेखकांनी. यात इतरही काही नावे आहेत.
काही तार्किक बाबी आपण समजून घेऊयात. शिवाजीराजे यांची तथाकथित गोब्राम्हण प्रतिपालक ही प्रतिमा खोडून काढण्याचे काम कोणी केले? यात महत्वाची नावे आहेत ती महात्मा फुले, लोकहितवादी, रानडे, प्रबोधनकार ठाकरे, कॉ डांगे, कॉ शरद पाटील, पानसरे या थोरांची. पुनरावृत्तीचा दोष पत्करून हे पुन्हा पुन्हा सांगावे लागते, त्याला इलाज नाही.
या दोन्ही विचारातील कोणता विचार आपल्याला मोलाचा आणि वास्तविक वाटतो? आपला चॉईस कोणता? राजवाडे की महात्मा फुले, न्यायमुर्ती रानडे, लोकहितवादी? पुरंदरे की डांगे, शरद पाटील, पानसरे ? यातली निवड करणे तसे फार अवघड नाही. या निवडीवर मर्यादा आणण्याचे काम आजही रितसरपणे चालले आहे हे दुर्दैवी आहे.
प्रश्न हा येतो की शिवाजीराजे हे गोब्राम्हण प्रतिपालक नाहीत, तर केवळ रयतेचे राजे आहेत, हे आपण मान्य करत असू तर राजे संभाजी हे धर्मवीर कसे? शिवाजीराजे हे केवळ हिंदू धर्माचे राजे नव्हते तर त्यांचा थोर पुत्र, त्यांचा राजकीय आणि वैचारिक वारस हा धर्मवीर कसा? धर्मवीर म्हणत असताना हिंदू धर्माचे सनातनत्वच अधिरेखीत होते, हे आपण ध्यानी घेत नाही. सनातन हिंदुत्व आणि हिंदू असणे, या दोन बाबी पूर्णतः भिन्न आहेत, हेही लक्षात घेतले पाहिजे. कारण तुकोबाही हिंदू होते आणि रामदासही. आपल्याला कोणाचे हिंदू असणे, आजच्या आणि एकूणच संदर्भात महत्वाचे वाटते, हा खरा प्रश्न आहे. या सगळ्या संदर्भांचा विचार आपण करीत नाहीत.
औरंगजेबाने संभाजीराजे यांची ज्या रीतीने अमानुष हत्या केली, त्याचे मूळ कारण काय होते? शिवाजीराजे यांच्या नंतर मोगली सत्तेला सर्वात मोठा धोका हा संभाजीराजे यांचेकडून होता हे त्याने ओळखले होते. संभाजीराजे यांच्या गोटातील लोकांना फितवून त्याने हा कार्यभाग साधला. जो सामना शिवाजी महाराजांना सुरवातीच्या काळात आणि अखेरपर्यंत स्वकीयांशी करावा लागला त्याला संभाजीराजे अपवाद नव्हते.
शिवाजीराजे यांनी त्याचा निकराने सामना केला. स्वकीय आणि परकीय हा भेद त्यांच्यापाशी नव्हता, कारण परकीय म्हणून ज्यांना आपण मानतो त्यांच्यापेक्षा तथाकथित स्वकीय हे अधिक धोकादायक आहेत हे ते पूर्ण ओळखून होते. सुदैवाने संभाजीराजे यांनाही त्याचे पूर्ण भान होते, तरही ते अडचणीत आले आणि मराठ्यांचा इतिहास पूर्ण बदलला. राजे किमान काही दशके जगले असते तर पेशवाई कदाचित आलीही नसती?
औरंगजेब हा धर्मवेडा होता पण शिवाजीराजे आणि संभाजीराजे हे धर्मवेडे नव्हते. संभाजीराजे यांना धर्मवीर आपण म्हणत असू तर शिवाजीराजे हेही धर्मवीर होते, असे म्हणायला हवे. इतिहास याला पुष्टी देत नाही, हे आपण दुर्दैवाने लक्ष्यात घेत नाही.
अ. रा. कुलकर्णी नावाचे एक उत्तम इतिहास संशोधक आहेत. त्यांनी सांगितले आहे, ‘शिवाजीराजे यांना गोब्राम्हण प्रतिपालक ही उपाधी राजाशी हितसंबंध असणाऱ्या ब्राह्मण लोकांनी लावली आहे’.
यापेक्षा आपण वेगळे काय सांगणार?
शिवाजीराजांना धर्मवीर किंवा धर्मभास्कर या मर्यादित आणि सनातनी उपाधीतुन वाचवले ते जोतीराव, रानडे या थोरांनी. तिथे आपले काही चालत नाही हे लक्षात आल्यावर ब्राम्हण्यवादी लोकांनी संभाजीराजे यांना आता घेरले आहे. हा डाव लक्षात घेणे आवश्यक आहे. तेही राजांना फार थोर म्हणावे यासाठी नाही, तर आपल्या तात्कालीक राजकीय स्वार्थासाठी. पण राजकारण हे एक धुके असते. जे लवकर कोणाच्या ध्यानी येत नाही. येते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. इतिहासाची विटंबना करणाऱ्या लोकांना वेळीच त्यांची जागा दाखवली नाही तर काळ सोकावतो.
मुळात धर्माचा संबंध हा मानवी अस्तित्वाशी असतो हे विसरायला नको. कोणताही मूळ धर्म द्वेष शिकवत नाही, त्यात आपण आपल्या सोयीनुसार द्वेष, मत्सर पेरतो. तो कसा वाढत राहील याची योजना करतो. ही कारस्थाने कायमस्वरूपी चाललेली असतात.
वर्तमानातली सत्ता टिकवण्यासाठी इतिहासाचे विद्रुपीकरण करणारे लोक देशाचे आणि खऱ्या मानवतावादी धर्माचेही गुन्हेगार असतात हे विसरायला नको.
कोणी एक कादंबरीकार सांगतात की संभाजीराजे यांना फार आधीपासूनच धर्मवीर मानल्या गेले. कोणी एक शास्त्री त्यांना धर्मवीर म्हणत, कोणी धर्मभास्कर म्हणत. स्वराज्य रक्षक हे नाव मालिकेतून आले. किती दुर्दैवी आहे हे विधान? याचा अर्थ इतिहासाचा वास्तविक अर्थ लावायचाच नाही का? मग शिवाजीराजे यांनाही असेच गोब्राम्हण प्रतिपालक म्हणवल्या जात होते, त्यांनाही रयतेचा राजा मानायचे नाही का?
पहिली शिवजयंती महात्मा फुले यांनी सुरू केली. आपण आजही श्रेय कोणाला देतो? तेच खरे मानायचे का?
महात्मा फुले यांचे पहिले चरित्रकार पंढरीनाथ पाटील, हे बुलढाण्याचे. त्यांनी काय लिहिले, महात्मा फुले यांनी राजांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला तेव्हा रायगडाच्या पायथ्याशी असणारा ग्रामभट म्हणाला, कुणबट शिवाजीच्या थडग्याचा देव केला.
हा इतिहास आपण विसरणार आहोत का?
प्रश्न हा आहे की धर्म मोठा की समाज? धर्म समाजासाठी आहे की समाज धर्मासाठी?
मग समाज आणि त्याचे प्रश्न महत्वाचे आहेत, हे ज्यानी स्वीकारले त्या छत्रपती शिवाजी महाराज आणि राजे संभाजी यांना आपण धर्मभूषण मानणार की समाजभूषण?
इतिहास हा तुमचा बटीक नाही. यावे त्याने मनाप्रमाणे भोगावे म्हणजे इतिहास नाही. ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिणाऱ्या लेखकांनी आजवर आपल्या सोयीप्रमाणे इतिहास वाकवला आहे. वाचकांना काय आवडते हे समोर ठेवून कादंबऱ्या लिहिल्या आहेत. इतिहासातील महापुरुषांचे जगण्याचे मध्यवर्ती सूत्र काय होते हे ध्यानात घेतले नाही. केवळ बेगडी भाषा आत्मसात असली म्हणजे इतिहास नाही लिहिता येत. जोतीराव भरड भाषेत जे लिहीत त्याची टवाळी याच चिपळूणकर वगैरे लोकांनी केली होती. भाषा कळण्यापेक्शा समाज कळणे अधिक महत्त्वाचे असते.
मासा पाणी खेळे, कोण गुरु असे त्याचा, हे शिवाजीराजे यांच्या शिक्षणाचे सूत्र जोतिरावांनी आपल्या पवाड्यातून मांडले, ते अन्य कोणाला नाही मांडता आले. आपण दादोजी आणि रामदास यांचे भोवती भरकटत राहिलो. याला जबाबदार कोण? आजही नव्याने पुन्हा तेच चालले आहे. शिवाजीराजे हातातून निसटताहेत ना, मग संभाजीराजे यांना पकडा. त्यांना धर्मवीर करून टाका. संभाजीराजे यांचाही लढा हा रयतेच्या राज्यासाठीच होता. आणि रयत म्हणजे तमाम कष्टकरी, सर्व जाती धर्माचे लोक होते. केवळ मराठा किंवा ब्राम्हण नव्हते. बहुजनांनी हे ध्यानात घेतले पाहिजे. ज्या बहुजनांसाठी हे दोन्ही राजे आयुष्यभर राबले, त्यांनी तरी इतिहासाला वेठबिगार करणाऱ्या भंपक, स्वार्थी लोकांपासून सावध असायला हवे.
चालत आले तेच पूर्णपणे स्वीकारायला हवे का? ते स्वीकारणे हेच सनातनत्व असते. बहुजन माणसांचा इतिहास नव्याने लिहायचा असतो. परंपरा नेहमीच बहुजन विरोधी असते. तिला स्थितीस्थापकत्व हवे असते. शोषणाचा इतिहास तिला पुन्हा लिहायचा असतो. धर्म हे कायम शोषणाचे हत्यार रहात आलेय. संभाजीराजे यांना धर्मभूषण म्हणणे म्हणजे ते शोषण कर्त्यांच्या बाजूने होते, असेच मान्य करणे आहे.
त्यांचा लढा हा केवळ अमानवी शोषण आणि अन्यायाविरोधातला होता. तो कुठल्याही धर्मासाठी नव्हता. तो नाहिरे साठीचा लढा होता. बुधभूषण लिहिणाऱ्या अश्या थोर राजाला ‘धर्मभूषण’ या चौकटीत बंदिस्त करणे हा इतिहासद्रोह ठरेलच पण वर्तमान द्रोहही ठरेल. ज्यांना समाजाची दिशाभूल करुन सत्ता मिळवायची आहे, त्यांना हे कथन मान्य होण्याचे कारण नाही. पण ज्यांची दिशाभूल केली जातेय त्यांनी तरी डोळे उघडे ठेवून बघण्याची गरज आहे. अन्यथा त्यांनाही इतिहास आणि वर्तमान माफ करणार नाही. हिंदुत्वाचे नाव घेत हिंदू धर्मातले औरंगजेब इथे पुन्हा पुन्हा जन्माला येत रहातील.
– श्रीकांत देशमुख (लेखक हे महाराष्ट्रातील ख्यातनाम साहित्यिक आहेत.)
श्रीकांत देशमुख यांचे इतर दणदणीत लेख