संपादक संजय आवटे आणि गणपती पूजा

वाद-प्रतिवादाचे घमासान

Spread the love

संजय आवटे हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते, विचारवंत, पुरोगामी चळवळीचे भाष्यकार तथा ‘दिव्य मराठी’ या अग्रणी वृत्तपत्राचे राज्य संपादक आहेत. त्यांची आजवरची मांडणी व वैचारिक वाटचाल ही पुरोगामी चळवळींना पुढे घेऊन जाणारी, बळ देणारी राहिली आहे. ते सतत उपक्रमशील असतात. फेसबुकवरूनही सातत्याने वैचारिक जागर घडवून आणत असतात. तिरकस लेखनासोबतच ते चिकित्सक दृष्टिकोन निर्माण करणाऱ्या पोस्ट सातत्याने करीत असतात. त्यांच्या सर्वच पोस्टला शेकडोंच्या घरात लाईक, कमेंट असतात. अशातच त्यांनी गणपतीची आरती करतानाचा फोटो फेसबुकवर टाकला आणि वाद-प्रतिवादाचे घमासान सुरू झाले. शेवटी श्री. संजय आवटे यांनीच सविस्तर पोस्ट लिहून आपली भूमिका मांडली. तरीही अनेकांचे समाधान झाले नाही.

राज्य संपादक संजय आवटे यांची मूळ पोस्ट.
————
गणपतीची आरती करतानाचा माझा फोटो व्हायरल झाला आणि काही नकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या. या प्रतिक्रिया मी समजू शकतो. त्यामुळे मला संताप नाही वा दुःखही नाही.
पण, मी काही सांगू इच्छितो.

तुम्हाला गंमत सांगतो.
मी एका खेड्यात लहानाचा मोठा झालो. तिथं आम्ही संघटनात्मक काम सुरू केलं होतं.

संविधानिक भूमिका घेऊन जनजागरण आरंभलं होतं.
लोक होतेच सोबत, पण तरीही काम पुढं जात नव्हतं.
लोकांचा प्रतिसाद मिळत नव्हता.

गणेशोत्सव आला.
आम्ही ‘विवेकाच्या देवतेचा उत्सव’ असे सूत्र घेऊन काम सुरू केले.
लोकांपर्यंत पोहोचलो.
लोकांनी चक्क प्रचंड प्रतिसाद दिला.
छान पैसेही उभे राहिले.

त्यातून आम्ही गावात विवेकवादी व्याख्यानमाला सुरू केली. शालेय मुला-मुलींसाठी स्पर्धा घेतल्या. पथनाट्ये, नाटुकली, कलात्मक प्रदर्शने, फिल्म फेस्टिव्हल अशी धमाल केली. हळूहळू आमचा गणेशोत्सव गावात सगळ्यांचा लाडका झाला.

काही वर्षे गेली.
पुढे आम्ही ठरवले… आपण विवेकाचा जागर करतो. पण, गणपती मूर्ती, तिची आरास, रोजची आरती, मिरवणुका यात खूप वेळ जातो नि ऊर्जाही. खरे म्हणजे, पैसाही.
मग आम्ही एक मार्ग काढला.
जाहीरपणे आम्ही गावक-यांना सांगितले, “गणपती ही देवता बुद्धीची. ती देवता विवेकाची. मग मूर्तीची ती गरज काय? यंदा आम्ही ‘अमूर्त गणेशा’ची स्थापना करतोय. म्हणजे, मूर्ती नसेल. पण, विवेकाचा उत्सव त्याच जोशात होईल. तुम्ही सोबत असा.”
तसे आम्ही जाहीर पत्रक काढले.
ही ‘रिस्क’ होती.

पण, गम्मत म्हणजे, त्या वर्षी आम्हाला सर्वाधिक लोकनिधी मिळाला.

लोकांना हे प्रचंड आवडले.
मूर्तीच्या पल्याडचा बाप्पा त्यांनी स्वीकारला.
बाप्पाच्या भाकडकथा वगैरे सोडून, बाप्पा म्हणजे विवेक; बाप्पा म्हणजे बुद्धी; बाप्पा म्हणजे कलासक्तता हे लोकांनी स्वीकारले.

मग, बाप्पांच्या नावाच्या या उत्सवात डॉ. नरेंद्र दाभोलकर आले. भाई वैद्य बोलले. सरफराज हुसेन बोलले. डॉ. चित्रा देशपांडे बोलल्या. प्रा. जी. एस. भोसले, डॉ. मीरा रामनवमीवाले, नागेश कांबळे बोलले. लोक या विचाराशी जोडले गेले आणि बाप्पा त्याचे वाहक झाले.

लोकमानसातली काही प्रतिकं नाकारण्यापेक्षा त्या प्रतिकांना व्यापक अर्थ देत आपला विचार पुढं नेणं हा अनेकदा ‘पोलिटिकल करेक्टनेस’ असतो.
तो समजला नाही, तर काय होतं, हे आज आपण पाहातो आहोत.

“जानवे घालू नका रे विठ्ठलाला,
त्या बिचा-याला स्वतःची जात नाही”
हे खरेच, पण आपल्याला विठुराया ठावा असतो तो तुकारामाचा. नामदेवाचा. चोखामेळ्याचा आणि जनीचा.
लोकमानसातला विठ्ठल तुकारामाचाच होता. कोणी त्याला अन्य रूपात उभे केले, म्हणून माझा विरोध विठ्ठलाला नसेल. माझा विरोध या रूपाला असेल.

पण, मी विठुरायाशी नातेच नाही जोडले तर?
प्रतिकांची ही तुलना नाही.
पण, हे नाही केले, तर अन्य कोणी ही प्रतिकं वापरेल आणि जनमानसाशी नातं जोडेल!
सध्या तसंही प्रतिकांच्या अपहरणाचा धंदा तेजीत आहे.
त्यापेक्षा जनमानसाशी नातं जोडत, ही पारंपरिक प्रतिकं अधिक व्यापक करणं महत्त्वाचं.
‘पोलिटिकल करेक्टनेस’ नावाचीही एक गोष्ट आहे.

परिवर्तनवादी खूप अपरिवर्तनीय होत चालले आहेत.
मुद्दा आहे, या धारणा बदलण्याचा!

खूप विचारांती, मी या निष्कर्षाप्रत येऊन पोहोचलो आहे.
तुम्हाला कळावी माझी भूमिका, म्हणून थेटपणे आज मांडतो आहे.

– संजय आवटे


राज्य संपादक संजय आवटे यांच्या उपरोक्त पोस्टचे समर्थन, खंडन, प्रतिवाद करणाऱ्या निवडक कमेंटस.

आरती, मूर्ती,गणेश, ओवळणे,… ही सगळी सनातनी ब्राह्मणी धर्माची प्रतीक आहेत.अश्या प्रकाराने त्याचे बाह्य स्वरूप बदलते.आत्मा तोच रहातो.आरएसएस बदलते आहे असे म्हणण्या सारखे आहे. – सुरेश खोपडे (माजी पोलिस अधिकारी)


संपादक, तुमच्या भूमिकेशी कोणाची सहमती, असहमती असेल, कोणी त्यावर कडवट,नकारात्मक प्रतिक्रिया देत असेल तर त्याचे स्वागत करा. सर्व साधक बाधक मतं चव्हाट्यावर येऊ द्या. या मंथनातूनच प्रबोधन होते. वादसंवाद,भूमिकेचे स्पष्टीकरण होऊ द्या. तुमच्या या खुलाश्यावरही काही लोक बोलतील, त्यांना बोलू द्या. त्याचा त्रास करून घेऊ नका. सामान्य लोकांपासून फटकून राहून परिवर्तन शक्य नाही असे मला वाटते. मी तसेच वागतो. प्रखर,एकांडे बुद्धीवादी त्याला लोकानुनय म्हणतात. म्हणूदेत. त्यांचेही भले होवो. जोवर घटनेच्या चौकटीत निषेध वा समर्थन होतेय तोवर होऊद्या.आप लगे रहो.प्रमुख वर्तमानपत्राचा राज्य संपादक म्हणून तुमच्यावर काही जबाबदाऱ्या आहेत.नी एक व्यक्ती, एक विचारवन्त म्हणून तुम्हाला उपासनेचे स्वातंत्र्य आहे.जे लोक 100% करांतीकारक म्हणून मिरवत आहेत, त्यांच्यामागे एकही सामान्य माणूस नसतो.(अगदी त्यांचे कुटुंबियही नसतात) हे लक्षात घेऊन, कोणी वंदा कोणी निंदा, आपण आपली भूमिका लावून धरा.आमच्यासारखे गरीब लोक तुमच्या सोबत,पाठीशी आहेत,पुढेही असतील. सर्व सदिच्छा! – हरी नरके (विचारवंत, लेखक)


खरं तर..फोटो आला तेव्हाच वाटलं होत की वाद उफाळणार…!

परिवर्तनवादी लोकांचा मुद्दा खूप पटला. बुद्धिवादी चर्चेतून जर सगळे अमूर्त गणेशाचे वाहक होणार असतील तर हरकत काय आहे ? काहीच नाही.
सार्वत्रिक हीत महत्त्वाचे! – ज्योती हणुमंत भारती (कवयित्री, लेखिका)


अशा पोलिटिकल करेक्टनेस मुळे सामान्यांच्या प्राथमिकता हरवतात व ते भलत्याच मार्गाने जाण्याची शक्यता असते. दारू पिऊन मिरवणूकीतून नाचणे. जुगाराचे अड्डे जमवणे, ध्वनि प्रदुषण करणे, गर्दीत महिलांचा विनयभंग करणे याही एका सोशल डॅमेजचाच भाग आहेत. जे मानसिक दृष्ट्या विकसित होऊ शकलेले नाहीत अशांच्या हाती असे हत्यार देणे म्हणजे एका पिढीच्या खऱ्या प्राथमिकता हिरावत त्यांना नको ते पर्याय उपलब्ध करून देण्यासारखे असते. माझ्या मते यात पोलिटिकल करेक्टनेसपेक्षा सोशल अधोगती जास्त होते आहे. एकमात्र खरे की आता अंधभक्त तुम्हाला डोक्यावर घेत नाचण्याची शक्यता आहे. – गिरीधर पाटील (विचारवंत)


पण जे अस्तित्वात नाहीच त्याचा आधार घेऊन कितीही विचारमंथन केलं तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. यासाठी आपली भूमिका ठाम पाहिजे. गल्लत भूमिकेत होतेय. मुदलातच गोंधळ असेल तर त्याला पॉलिटिकल करेक्टनेसचं गोंडस नाव देऊनही काही फायदा होणार नाही. – गिरीश लता पंढरीनाथ (पत्रकार)


तुम्ही वर्ण व्यवस्थेचा सामाजिक-सांस्कृतिक इतिहासाचा धांडोळा घेऊन पाहा. जानवं हे विशिष्ट जाती पुरतं कधीही मर्यादित नव्हतं. याचे पुरावे, दाखले सापडतील. चाळीसेक वर्षापूर्वी जानवं सर्व जातीतील, समाजातील लोक धारण करीत असत. कारण, तो आचार धर्माचा मुलभूत घटक होता. अठरा पगड जातीत पूर्वी जानवे धारण केले जायचे. नंतर तुळशीची माळ धारण करण्याची लाट आली. काळाच्या ओघात बेगडी पुरोगामीत्व उदयाला आले तसे जानवे आणि तुळशीची माळ दोघेही बहिष्कृत होत गेले. आता जानवे पण ब्राह्मणांत देखील मोजके लोक धारण करतात. हे वास्तव आहे. अलिकडच्या काळात मात्र जानवे हे आचार धर्माचे सामाजिक वाहक न राहता ते दु:स्वासाचे कारण बनलेले दिसतेय. – श्रीपाद सबनिस


आपल्याकडे तात्विक विरोध करण्याची , मतांचा काथ्याकूट करण्याची फॅशन आहे. काहीही सामाजिक काम न करता एखाद्याला ट्रोल करायचे काम अनेक पुस्तकी साक्षर करीत असतात. त्यांना ना हा समाज समजलेला आहे ना आपण नक्की कोणत्या विचारांचा आग्रह धरतोय ते कळत असते. दुर्दैवाने अशी घरबैठी विचारवंत मंडळी खूप वाढली आहेत आपल्याकडे . तू काय काम करतो आहेस हे न जाणून घेता फक्त तुझ्या फोटोवर झोड उठवणारे स्वतःच्या आयुष्यात काय काय तडजोडी करतात ते बघायला हवं.
तुला जे ओळखतात संजय , त्यांना तुझा जीव नक्की कशात अडकलाय ते ठाऊक आहे. तू शेरेबाजी करणाऱ्यांची काळजी करू नकोस. त्यांना समजवण्याचा प्रयत्न तू करतोस हे ही तुझ्या विवेकी वृत्तीचे लक्षण आहे. कीप इट अप! – अरुण म्हात्रे (कवी)
—–
परिवर्तनवादी चळवळी बहुसंख्य जनमाणसाशी हेटाळणी न करता मानवी स्वरूपाचा संवाद आणि त्यातून प्रबोधन करण्यास सक्षम ठरल्या नाहीत, फारशा यशस्वी झाल्या नाहीत ही गोष्ट पूर्णतः खरी आहे. मात्र त्याचवेळी परिवर्तनवाद्यानी बहुमताच्या दबावाखाली येऊन लोकानुनय करावा का, केलाच तरी त्याची मर्यादा काय असावी, ज्या समाजाला आपल्याला बदलायचं आहे त्या समाजासमोर थेट स्पष्ट निर्भिड पने उभं राहून काम करायचं की समाजात मिळून-मिसळून काम करायचं की शेवटी हतबल होऊन समाजाच्या मांडीवर बसूनच काम करायचा प्रयत्न करायचा हे ठरवता आलं पाहिजे. पेशंट ने डॉक्टर ला मांडीवर घेऊन सांगायचं की मला हेच औषध पाहिजे असा हा किंचित प्रकार आहे. त्यामुळेच तुमचा मार्ग बहुतांश वेळा मांडीवर बसून गोंजारण्याचा असतो त्यामुळे तो फारसा बुद्धिप्रामाण्यवादी वाटत नाही. पण लोकांना रूचनारा आहे हे सुद्धा शंभर टक्के खरे!
प्रश्न आहे “बाप्पाला” विवेकाची देवता म्हणून रुजवायचा. जे घातक आहे. विवेक बाप्पात शोधायचा तर मग बुद्ध फुले शाहू आंबेडकर ह्यांच्यात काय शोधायचं? बाप्पाच्या गोड गोंडस सोयीस्कर विवेका पासून खऱ्या विवेका पर्यंत प्रवास कसा करणार?
पॉलिटिकल correctness ची भूमिका स्वागतार्ह मानली तरी ही उत्तरं शोधायला हवीत. Political correctness without scientific temperament is sucidal thought. असं मला वाटतं. ह्यावर सविस्तर चर्चा घडायला हवी. – मयुर लंकेश्वर
——

 

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका