संकटे थोपवणारा अखंड महाराष्ट्र

डॉ. घपेश ढवळे यांचा दणदणीत लेख

Spread the love

महाराष्ट्र राज्यानं अनेक संकटं पाहिलीत. संकटं अंगावर झेलणं आणि ती यशस्वीपणानं परतवून लावण्यात यशस्वी होणं हे महाराष्ट्राला नवं नाही. आज ‘महाराष्ट्र दिन’ आहे. कोराेनाचं भव्य संकट महाराष्ट्राच्याही उरावर बसलंय. या संकटसमयी हा राज्याचा स्थापनादिन चिंताग्रस्त स्थितीत आपण साजरा करतोय.. यातून लवकरच आपण बाहेर पडू आणि “संकटं थोपवणारा अखंड महाराष्ट्र” जगाला दाखवून देऊ. महाराष्ट्राच्या जडणघडणीचा वेध घेणारा हा दणदणीत लेख..

महाराष्ट्र हे खरेतर नावामध्येच ‘महा’ असणारे श्रेष्ठ राष्ट्र. प्रचंड गुणवत्तेमुळे उदयाला आलेली पुणे आणि मुंबई ही महानगरे नजीकच्या काळात एक होतील. या शहरांमध्ये आयटी, इंजिनिअरींग अशा क्षेत्रांमधील सर्वात जास्त गुणवत्ता आहेच, शिवाय मुंबई तर आर्थिक केंद्र आहे. अगदी नागपूरदेखील ‘लॉजिस्टीक हब’ म्हणून उदयाला आले आहे.

• संयुक्त महाराष्ट्र चळवळ
स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा लढा उभारला गेला. या चळवळीमुळे १ मे इ. स. १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. महाराष्ट्र राज्यात मराठी भाषा बोलणारे मुंबई, कोकण, देश, विदर्भ, मराठवाडा, खानदेश व अजूनही महाराष्ट्राबाहेरच असलेले डांग, बेळगाव, निपाणी, कारवार व बिदर हे भाग अभिप्रेत होते. साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक, राजकीय या सर्व अंगानी ही चळवळ उभी राहिली.

• मुंबई : उद्योगधंद्याचे शहर
डिसेंबर इ. स. १९४८ रोजी प्रसिद्ध झालेल्या दार कमिशनच्या अहवालात भाषावर प्रांतरचनेला विरोध दर्शविण्यात आला होता व महाराष्ट्रीय लोकांवर अपमानास्पद टिप्पणी होती. जे.व्ही.पी कमिटीने महाराष्ट्र व कर्नाटक यांच्या मागणीला पाठिंबा दिला नाही व मुंबई महाराष्ट्रात देण्यास विरोध केला. मुंबई अनेक भाषांच्या व वर्णाच्या लोकांचे, उद्योगधंद्याचे शहर आहे असे अहवालात म्हटले होते. वल्लभभाई पटेलांनी मुंबईचा विकास गुजराती भाषकांनी केल्याचे नमूद केले.

• पुनर्रचनेबाबत पायाभूत तत्त्वं आणि विसंगती
डिसेंबर इ. स. १९५३ रोजी फाजलअली यांच्या अध्यक्षेतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाची नियुक्ती झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या वतीने एस.एम.जोशी, धनंजय गाडगीळांसह इतरांनी आयोगासमोर आपली बाजू मांडली. इ. स. १९५५ रोजी आयोगाचा निवाडा जाहीर झाला. पुनर्रचनेबाबत पायाभूत तत्त्वं सगळ्यांना सारखी लागू केलेली नव्हती आणि त्यात मोठी विसंगती होती. हैद्राबादसाठी एक भाषिकाच तत्त्व तर मुंबईसाठी द्वैभाषिकाचं. मुंबई प्रांतात गुजराती भाषिक सौराष्ट्र समाविष्ट करून मराठी भाषिक विदर्भ, बेळगाव-कारवार बाहेर ठेवले गेले. मुंबईच्या विकासासाठी तिला गुजरातपासून वेगळे ठेवणे योग्य नाही व बेळगाव भाग कर्नाटकाशी ‘आर्थिकदृष्ट्या’ जोडला असल्याचे तसेच विदर्भ महाराष्ट्रात घातल्यास नागपूर शहराचे महत्त्व कमी होईल असे अहवालात नमूद करण्यात आले. आयोगाला या द्वैभाषिकात मराठी भाषिकांची संख्या गुजराती भाषिकांपेक्षा जास्त होऊ द्यायची नव्हती असेच या विसंगतीचे कारण म्हणावे लागेल.

• मुंबईचा विकास गुजराती भांडवलदारांनी केला?
१ नोव्हेंबर इ. स. १९५६ ला केंद्राने सौराष्ट्र, गुजरात, मराठवाडा, विदर्भ व मुंबई इलाख्यातील सर्व मराठी प्रदेश मिळून (परंतु बेळगाव-कारवार वगळून) विशाल द्विभाषिक स्थापले. परंतु, या द्विभाषिकाचे महाराष्ट्र व गुजरात येथेही कडाडून विरोध झाला. आणि विधानसभा निवडणूक लढवली. या सार्वत्रिक निवडणुकीत समितीला भरघोस यश मिळाले. द्वैभाषिकाची विभागणी करताना महाराष्ट्र राज्याने गुजरात राज्याला १० कोटी द्यायचे व पुढील ४ वर्षात ती रक्कम कमी करत आणायची अशी अट मान्य झाली. तसेच मुंबईचा विकास व उभारणी गुजराती भांडवलदारांनी केली असा दावा गुजराती भाषिक करत होते व त्याचं ‘व्याज’ म्हणून एकूण ५० कोटी देऊनच मुंबई महाराष्ट्राला मिळाली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला तरी त्यात बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर व डांगचा समावेश झाला नाही. बेळगावबाबतचा महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न आजही चालू आहे. सरकारला राज्याला हवे असलेले ‘मुंबई’ नाव वगळून समितीने ‘महाराष्ट्र’असे नाव ठरवले व राज्याची स्थापना १९६० सालच्या कामगारदिनी म्हणजे १ मे १९६० रोजी झाली. महाराष्ट्र स्थापनेचा कलश महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे हस्ते दिल्लीहून आणला गेला. नव्या राज्याची मुंबई ही राजधानी व नागपूर उपराजधानी निश्चित झाली.

• महाराष्ट्रभर असंतोषाचा डोंब
या आयोगाच्या विरोधात महाराष्ट्रभर असंतोषाचा डोंब उसळला. त्यामुळे सौराष्ट्रासह गुजरात, विदर्भासह महाराष्ट्र व स्वतंत्र मुंबई अशा त्रिराज्य योजना जाहीर केली. त्रिराज्य योजनेत महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्यामुळे अन्यायाची भावना मराठीजनांत पसरली व संयुक्त महाराष्ट्र चळवळीने पेट घेतला. ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ हे या आंदोलनाचे घोषवाक्य बनलं. महाराष्ट्रातील कम्युनिस्ट, सोशालीस्ट व प्रजासमाजवादी पक्षातील डावे पुढारी व काँग्रेसेतरांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा हातात घेतला. सेनापती बापट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, एस.एम.जोशी, प्रल्हाद केशव अत्रे, श्रीपाद डांगे, शाहीर अमर शेख,भाई उद्धवराव पाटील, प्रबोधनकार ठाकरे हे चळवळीतील महत्त्वाचे नेते ठरले. एस.एम. जोशी, श्रीपाद डांगे यांनी लढ्याचे नेतृत्व केले. अत्र्यांनी आपल्या ‘मराठा’ या दैनिकात संयुक्त महाराष्ट्राचा जोरदार पुरस्कार केला तर विरोधकांवर बोचरी व कठोर टीका केली. त्यांच्या भाषणातून संयुक्त महाराष्ट्राला विरोध करणार्याचा खरपूस समाचार घेतला. शाहीर अमर शेख,शाहिर अण्णाभाऊ साठे,शाहिर गव्हाणकर ह्यांनी आपल्या कलाविष्काराने मराठी अस्मिता जागृत ठेवली.

• … अन् सभा उधळली
२० नोव्हेंबर इ. स. १९५५ मोरारजी देसाई व स.का.पाटील या नेत्यांनी चौपाटीवर सभा केली. लोकांनी संतापून सभा उधळली. २१ नोव्हेंबर इ. स. १९५५ रोजी झालेल्या आंदोलनावेळेस पोलिसांनी केलेल्या गोळीबारामुळे १५ जणांना प्राण गमवावा लागला. जाने-फेब्रु इ. स. १९५६ रोजी केंद्रशासित मुंबईची घोषणा केल्यानंतर लोक रस्त्यावर उतरली. हरताळ, सत्याग्रह व मोर्चे सुरू झाली. त्यामध्ये आंदोलन कारी निष्ठुर ८० लोकांचा नाहक बळी गेला.

• १०५ जणांची प्राणाची आहुती
संयुक्त महाराष्ट्रातील आंदोलनात एकूण १०५ जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या स्मरणार्थ मुंबईच्या फ्लोरा फाउंटन भागात हुतात्मा स्मारक उभारले गेले. संयुक्त महाराष्ट्र समितीने दिल्ली येथे प्रचंड सत्याग्रह घडवून आणला. भारताचे अर्थमंत्री सी.डी देशमुखांनी महाराष्ट्रावरील होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ आपला राजीनामा दिला. या राजीनाम्यामुळे चळवळीला अधिक बळ मिळाले.

• शाश्वत स्वरूपाची प्रगती व्हावी
आज जर महाराष्ट्र महाराष्ट्राची स्थिती बघितली तर पुणे – मुंबई यातून साकार झालेले संयुक्त शहर ही आपली मोठी शक्ती ठरणार आहे. त्याच्या जोडीला नागपूर, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद अशी शहरे आपापल्या गुणवत्तेने ग्रामीण महाराष्ट्राकडेही पाहावे लागणार आहे. पुढील काही वर्षांमध्ये सर्वंकष प्रगती महाराष्ट्राला करायची असेल, तर प्रामुख्याने शिक्षण आणि शेती या क्षेत्रांमध्ये विकास व्हायलाच हवा. दुसरी हरित क्रांती व तीही शाश्वत स्वरूपाची आज महाराष्ट्रात व्हायला हवी, सेंद्रीय शेती, जैविक तंत्रज्ञान, पाण्याचे योग्य व्यवस्थापन या दृष्टीने विकासाची सुरुवात झाली, तर ती शेती क्षेत्राला स्थैर्य प्राप्त करून देईल

• अनेक क्षेत्रांत महाराष्ट्र राज्य आघाडीवर
आज महाराष्ट्र राज्य देशात सर्वात आघाडीवरचे राज्य आहे. कला, साहित्य, क्रीडा, व्यापार उद्योग, शिक्षण, आरोग्य सुविधा आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे कृषी क्षेत्रासह अनेक क्षेत्रात महाराष्ट्र राज्य आघाडीवर असल्याचे चित्र आपणास पाहायला मिळत. १ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन. म्हणून साजरा केला जातो.

• .. अन् कामगारांनी वज्रमूठ आवळली
इतिहासाची उजळणी केल्यावर आपल्या असे लक्षात येते की, औद्योगिक क्रांतीनंतर जगभरातून मुख्यत: पाश्चिमात्य जगतात रोजगार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होऊ लागले. कामगारांकडे काम होते, मात्र त्यांची पिळवणूक सुरु होती. कोणत्याही हक्कापासून वंचित असलेल्या कामगारांना १२ तास, १४ तास काम करावे लागत असे. या विरोधात कामगार एकजूट झाले आणि त्यांनी उठाव केला. जगभरात याचे तीव्र पडसाद उमटू लागले. अखेर कामगारांची कामाची वेळ ८ तास निश्चित करण्यात आली. यानंतर कामगारांच्या हक्कासंदर्भात दोन आंतरराष्ट्रीय परिषदा झाल्या. नंतर १ मे १८११ पासून कामगार दिन साजरा केला जाऊ लागला. महाराष्ट्रात साजरा होणा-या कामगार दिनाला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा संदर्भ आहे. संयुक्त महाराष्ट्राचा लढा वेगवेगळ्या स्तरावर लढला गेला. या लढ्यात कामगारांनी घेतलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. त्याच्या सहभागामुळेच हा लढा ख-या अर्थाने रस्त्यावर लढला गेला. याच कारणामुळे १ मे १९६० रोजी मराठी भाषकांसाठी स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर त्याच दिवशी महाराष्ट्र दिन बरोबरच कामगार दिनही मोठ्या उत्साहात साजरा केला जाऊ लागला.

• समतावादी महापुरुषांची भूमी
सामाजिक समता, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि अंधश्रद्धेचे उच्चाटन याकरिता आपले आयुष्य वेचणा-या ध्येयवादी नेत्यांचा आपल्या राज्याला मोठा वारसा लाभला आहे, हे आपले भाग्य आहे. विशेषत: छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षि छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्यासारख्या थोर आणि समाजसुधारक नेत्यांचे स्मरण करणे औचित्यपूर्ण ठरेल. महाराष्ट्राच्या विविधतेतून संपूर्ण भारताचे दर्शन घडते. आज देशातील एक पुरोगामी प्रगत राज्य ही महाराष्ट्राची ओळख आहे. स्वातंत्र्योत्तर काळात सुरू झालेली लोकशाहीची वाटचाल आता गतिमान झाली आहे.

• प्रगतीची पताका
आज महाराष्ट्रातही उत्तोत्तम शैक्षणिक संस्था आणि त्यासाठीच्या मूलभूत संरचना अस्तित्वात आहेत. शिक्षण आणि शेती या दोन्ही स्तरांवरचा विकास आपल्याला आवश्यक आहे. मात्र, त्यासाठी महाराष्ट्राची स्पर्धा केवळ कर्नाटक – तामिळनाडू – गुजरातशी नाही, ती इंग्लंड – फ्रान्ससोबतची असणार आहे. उदात्त संत परंपरा आणि समाजसुधारकांचा देदीप्यमान इतिहास आपल्याला लाभला आहे. शिवाजी महाराजांसारखा जगातील सर्वश्रेष्ठ राजा म्हणून सर्वज्ञात असणारे खंदे लढवय्ये, शिवाय जोतिराव फुले, डॉ. आंबेडकरांसारखे राष्ट्रपुरुष याच महाराष्ट्रात होऊन गेले. स्वत:चे असे सांस्कृतिक परिमाण असणा-या महाराष्ट्रात सर्वच दृष्टींनी वैश्विक संस्कृती आहे. महाराष्ट्राच्या या प्रगतीशील वाटचालीत अनेक अडचणी आल्या. भूकंप झाले, महापूर आले, दुष्काळ आले. बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ल्यांनाही तोंड द्यावे लागले. पण या सर्व संकटांवर मात करीत महाराष्ट्राने आपली यशस्वी वाटचाल कायम ठेवली. इतकेच नव्हे तर संपूर्ण देशात अनेक पुरोगामी, क्रांतीकारक तसेच लोकहिताचे कार्यक्रम राबविण्यात आपली आघाडी कायम ठेवली. रोजगार हमी योजना, ग्रामस्वच्छता अभियान, माहितीचा अधिकार, महिला आरक्षण आदी अनेक धोरणात्मक निर्णय महाराष्ट्राने आधी घेतले आणि नंतर ते केंद्रीय पातळीवर स्वीकारले गेले, ही गोष्ट खचितच अभिमानास्पद आहे.

• लढवय्या परंपरेला मानाचा मुजरा
शिक्षण ही नव्या शतकातील प्रगतीची पूर्वअट आहे. महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था श्रेष्ठ आहेच, आता ही प्रक्रिया अधिक व्यापक करायला हवी. शिक्षणाने मूलभूत संशोधनाला गती दिली पाहिजे. शिक्षणाने विकासाला हातभार लावला पाहिजे. त्यासाठी शिक्षण मूल्याधिष्ठित असायला हवे. निरनिराळ्या जागतिक युनिव्हर्सिटीजचे सुद्धा महाराष्ट्राने व्यापक दृष्टीकोन ठेवून स्पर्धात्मकतेने स्वागत करायला हवे. या सर्व बदलांकरिता पूरक असे खंबीर नेतृत्व, इच्छाशक्ती, कष्ट करण्याची तयारी आणि त्यासाठी आवश्यक असणारी ऊर्जा निर्माण होणे अवघड नाही. आज माहिती तंत्रज्ञानामध्ये भारताची घोडदौड त्याच जोरावर तर सुरू आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचे योगदान मोठे आहे. कारण महाराष्ट्राला सांस्कृतिक ओळख आहे. एक अधिष्ठान आहे. औद्योगिक, आर्थिक, माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रात भारतीयांची कामगिरी पाहता असे सहजपणे लक्षात येते की, आपण नेतृत्वासाठी सज्ज झालो आहोत. जगभर पोहोचलेला मराठी माणूस आपल्या क्षमतांचे दर्शन घडवू लागला आहे. आगामी क्षमतांचे दर्शन घडवू लागला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक आव्हाने महाराष्ट्रासमोर असली तरी त्यातून तावून सुलाखून क्षमतेने आणि विश्वासाने बाहेर पडण्याची धमक महाराष्ट्रात आहे. कितीही संकटे आले तरी महाराष्ट्र मागे येणार नाही हे महाराष्ट्राने मागील एकसष्ठ वर्षात दाखवून दिले आहे त्याचे आपण सर्व साक्षीदार आहोत. आधी पूर्ण महाराष्ट्र 105 लोकांच्या बलिदानाला विसरणार नाही,  हे मात्र तेवढेच खरे. आज त्यांच्या बलिदानामुळे आम्हाला महाराष्ट्रासारख्या प्रगत आणि कणखर राज्य पाहायला मिळतो.या ऊर्जेला आणि महाराष्ट्राच्या लढवय्या परंपरेला मानाचा मुजरा, जय महाराष्ट्र!

– डॉ. घपेश पुंडलिकराव ढवळे, नागपूर
मो. 8600044560
ghapesh84@gmail.com

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका