शेतीपंपाची आजपासून वीज तोडणी मोहिम
लोकप्रतिनिधींना गंडविण्यात महावितरणला "आनंद"
थिंक टँक न्यूज नेटवर्क : डॉ. नाना हालंगडे
२० नोव्हेंबर २०२१ रोजी महावितरणने शेती पंपाचा विद्युत पुरवठा बंद केल्याने, सांगोला तालुक्यात चांगलाच गलका झाला. लोकप्रतिनिधींनी श्रेयवादासाठी मोर्चे काढले, पण ते तात्पुरते ठरले. अवघ्या चार दिवसांतच ही लाईट बंद करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. शेतकरी व लोकप्रतिनिधींना गंडविण्यात महावितरणला “आनंद” वाटत असल्याचे दिसत आहे.
सात वर्षांपासून झोपलेली महावितरण कंपनी गतवर्षापासून शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेली आहे. कोणत्याही प्रकारची वीजबिले न देता यांनी वसुली सुरू केली. त्यामध्ये ही अव्वाच्या सव्वा बिले. अशातच मागील ५ ते ६ महिन्यापूर्वी शेतकऱ्यांनी वीजबिले भरली पण ती जमा केली नाहीत. आत्ता ऐन हंगामात शेतीपंप डीपी बंद करण्याचे धोरण यांनी अवलंबिले.
मागील आठ दिवसात ही वीज बंद केली होती. पण तालुक्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधींनी महावितरण कार्यालयावर मोर्चा काढून, नको ती भाषा बोलून ही वीज सुरू करावयास लावली. पण लोकप्रतिनिधींचे हे बोल तात्पुरते ठरले.
आज २८ नोव्हेंबर पासून ही शेतीपंपची लाईट बंद करण्यात येणार आहे,असे उपकार्यकारी अभियंत्याने सांगितले आहे.
सांगोला तालुक्यात महावितरणची ३४ हजार ग्राहकाकडे ३२६ कोटी रुपयाची थकबाकी आहे. पण महावितरणचे वरिष्ठ अधिकारी उत्तम नियोजन करीत नाहीत. सर्वसामान्यांची कामे करीत नाहीत.
कार्यालयात कधीही सापडत नाहीत. विशेष म्हणजे फोनही कधी उचलत नाहीत. अशी ही यांची कामाची पद्धत आहे. त्यामुळे कनिष्ठ कर्मचाऱ्यांना त्रास सोसावा लागत आहेत.
आता रब्बीचा हंगाम सुरू आहे. विजतोडणीमुळे शेतकऱ्यांना हा हंगाम साधता येणार नाही. वीजबिले भरण्यास शेतकरी तयार आहेत पण शेतकऱ्यांना बिले मिळत नाहीत.
जी बिले आली आहेत त्यामध्येही तारतम्यपणा नाही. त्यामुळे बळीराजा हैराण झाला आहे.