शेकापचा महावितरणच्या मनमानीविरोधात गुरुवारी मोर्चा
स्व. भाई गणपतराव देशमुख यांच्या पश्चात निघणारा पहिलाच मोर्चा
- हेही वाचा : ‘बाबासाहेब’ तुम्हीच आहात ‘आबासाहेब’
थिंक टँक न्यूज नेटवर्क : डॉ. नाना हालंगडे
सांगोला तालुक्यात महावितरणने मनमानी चालवली आहे. कोरोना व अतिवृष्टीमुळे आधीच पार कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांच्या उरावर बसून पाशवी पद्धतीने वसुली सुरू केली आहे. कनेक्शन तोडली जात आहेत. महावितरणच्या या कार्यपद्धती विरोधात शेतकरी कामगार पक्षाने गुरुवार, 25 रोजी सांगोल्यात भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे.
नियमानुसार शेतकऱ्यांना १५ दिवसाची नोटिस न देता बीज थकबाकीच्या नावाखाली वीज मंडळाने वीज खंडीत करण्याची मोहीम राबवली आहे. गेल्या चार वर्षांच्या निसर्गाच्या लहरीपणाचे अवलोकन केल्यास शेतकऱ्यांनी शेतीसाठी किती वीज वापरली याचा अंदाज येतो. जर शेतकऱ्यांची पिके नष्ट झाली असताना विजेचा वापर केला म्हणणे व्यवहारीपणाचे होणार नाही. अवर्षण व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. कोरोनामुळे दोन वर्षापासून बाजारपेठा, फळभाजी मार्केटच बंद आहेत. सध्या जरी चालू झाली तरी व्यवहार झाले नाहीत. अतिवृष्टीमुळे डाळिंब, मिरची, भाजीपाला यासारख्या अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये आला आहे. सध्या पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे लाखो रुपये खर्च करून जोपासलेल्या बागा व पिके नष्ट झाली आहेत. अशा स्थितीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याऐवजी वीज तोडून आर्थिकदृष्टीने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना वीज महामंडळ आत्महत्येस प्रवृत्त करीत आहे.
सांगोले विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांची सन 2021 पर्यंतची वीज बिले माफ करावीत. तसेच वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम थांबवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा यासाठी गुरुवार, २५-११-२०२१ रोजी शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने मोर्चाद्वारे तहसिल कार्यालय , सांगोले येथे येऊन निवेदन देण्यात येणार आहे.
मोरचाबाबत तहसीलदार यांना कळविण्यात येते आहे. या पत्रावर भाई चंद्रकांत देशमुख, भाई डॉ. बाबासाहेब देशमुख, भाई विठ्ठलराव शिंदे, भाई बाळासाहेब काटकर, दीपक गोडसे यांच्या सह्या आहेत.