शिवाजी पार्कवर शिवसेनेला मेळाव्याची परवानगी
Think Tank News Network
शिवसेनेच्या (Shivsena) दसरा मेळाव्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला आहे. दादर येथील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई महापालिकेने (Mumbai) दोन्ही गटांना परवानगी नाकारली होती.
त्यानंतर दोन्ही गटाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाने शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची याचिका फेटाळली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेला परवानगी दिली आहे.
काही दिवसांपासून शिवसेना आणि शिंदे गटाच्यादृष्टीने प्रतिष्ठेच्या झालेल्या दसरा मेळाव्याच्या लढाईत उद्धव ठाकरे गटाची सरशी झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी शिवसेनेच्या याचिकेवर झालेल्या सुनावणीअंती शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास हिरवा कंदील दाखवला. उच्च न्यायालयाचा हा निर्णय शिवसेनेसाठी उत्साह दुणावणारा आहे. पालिकेने शिंदे गट (Eknath Shinde camp) आणि ठाकरे गट दोघांनाही शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी नाकारली होती. त्यानंतर शिवसेनेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
या याचिकेवर शुक्रवारी उच्च न्यायालयात जवळपास साडेतीन तास युक्तिवाद करण्यात आला. शिवसेना, पालिका आणि शिंदे गटाच्या वकिलांकडून आपापली बाजू पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर उच्च न्यायालयाने पालिकेचा निर्णय योग्य, उचित नाही असा शेरा मारत ठाकरेंना शिवतीर्थावर दसरा मेळाव्याला परवानगी दिली आहे. यावेळी कायदा आणि सुव्यवस्था पाळण्याची हमी ठाकरेंच्या वकिलांनी न्यायालयात दिली.
दसरा मेळाव्यावरून राज्यात वातावरण तापले आहे.