
सांगोला/नाना हालंगडे
काय झाडी, काय डोंगार, काय हाटील या जगप्रसिद्ध डायलॉगचे शिल्पकार, शिंदे गटातील वजनदार नेते आ. शहाजीबापू पाटील यांनी आपल्याच वजनाला जोरात दणका दिलाय. त्यांनी ८ दिवसांत तब्बल ९ किलो वजन कमी केलंय. सांगोल्याचा हा ढाण्या वाघ स्लिम बनलाय.
आमदार शहाजीबापू पाटील यांचे मागील काही दिवसांपासून खूपच वजन वाढलं होतं. त्यामुळे त्यांना काहीसा त्रास जाणवत होता. यामुळे त्यांनी वजन कमी करण्याचा निर्णय घेत थेट श्री श्री रविशंकर यांच्या पंचकर्म व सुदर्शन क्रिया या शिबिरात सहभाग घेण्याचं ठरवलं. ते बंगळुरु येथे गेले. बंगळुरु येथील श्री.श्री.रविशंकर यांच्या आश्रमात शिबिरात सहभाग घेतला. या शिबिरादरम्यान त्यांनी ८ दिवस योग प्राणायाम आणि ध्यान धारणा केली. तसेच ८ दिवस त्यांनी समतोल आहार घेत त्यामध्ये उकडलेल्या पालेभाज्या, फळभाज्याचा आहारात समावेश केला.

बापू नव्या लूकमध्ये!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे फायरब्रॅन्ड नेते म्हणून ओळख असणारे शहाजीबापू पाटील (ShahajiBapu Patil) आता नवीन रूपात समोर येणार आहे. बंगळूरू येथे हॅपिनेस कार्यक्रमातील पंचकर्म उपचार घेतल्यानंतर आता नऊ किलो वजन कमी करून पुन्हा नव्या जोमाने महाराष्ट्राच्या समोर येत आहेत.
हिवाळी अधिवेशनानंतर गायब!
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनासाठी गेलेले बापू पहिल्या दोन दिवसानंतर गायब झाले होते. अगदी त्यांच्या सांगोल्यात येऊन शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांचेवर टीकेची तोफ डागल्यावरही बापूंकडून कोणतीच प्रतिक्रिया आली नव्हती. आता याचे गुपित समोर आले असून 24 डिसेंबर रोजी शहाजीबापू त्यांचे मित्र महेश पाटील यांच्यासोबत बंगळूरू येथील श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात पंचकर्म आणि सुदर्शन क्रिया करण्यासाठी दाखल झाले.
८ दिवसात तब्बल ९ किलो वजन कमी
या शिबिरात त्यांनी ८ दिवसानंतर तब्बल ९ किलो वजन कमी केलं. याबाबत त्यांचे काही फोटो देखील व्हायरल झाले आहेत. त्यामुळे बापू पाटील (Shahajibapu Patil) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
शहाजीबापूंनी सांगितलं फिटनेस सिक्रेट
अवघ्या आठ दिवसात नऊ किलो वजन कमी केल्याने अनेकांना आश्चर्य वाटलं. एवढ्या कमी दिवसात त्यांनी हे कसं साधलं. त्यांचा फिटनेस मंत्रा नेमका काय आहे? याविषयी शहाजीबापूंनी (Shahaji Bapu Patil) यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना बोलताना आपले सिक्रेट सांगितले.
शहाजीबापू म्हणाले की, माझा गुडघा दुखत होता. त्यामुळे डॉक्टरांनी गेल्यावर त्यांनी मला दोन पर्याय दिले एकतर ऑपरेशन करणं किंवा वजन कमी करणं. ऑपरेशन करण्यापेक्षा मी वजन कमी करण्याचा पर्याय निवडला.
वेगवेगळे काढे प्यायला दिले
वजन कमी करण्यासाठी बंगळुरूला गेलो. तिथं श्री श्री रवीशंकर यांच्या आश्रमात आर्ट ऑफ लिव्हिंगचा 10 दिवसांचा कोर्स केला. सुरुवाती पाच ते सहा दिवस त्यांनी पंचकर्म केलं. तेव्हा वेगवेगळे काढे प्यायला दिले. वेगवेगळ्या तेल आणि पावडरने मालिश केली. या सगळ्याने माझं चार किलो वजन कमी झालं.
वाफेवर उकडलेला आहार घेतला
मग मेडिटेशन सुरु केलं. मेडिटेशनच्या माध्यमातून सुदर्शन क्रिया केली. त्यांचा वाफेवर उकडलेला आहार घेतला. व्यायाम केला. या सगळ्याचा परिणाम होऊन वजन कमी झालं.
जीवन खूप सुंदर
पंचकर्म, योगासने आणि डायटच्या माध्यमातून 8 दिवसात 9 किलो वजन कमी केलं. खूप चांगला अनुभव मिळाला आहे, जीवन खूप सुंदर आहे. त्यासाठी फिट राहाणं गरजेचं आहे, असं त्यांनी सांगितलं.
मागे एकदा बोलताना शहाजीबापूंनी संजय राऊतांना ओपन चॅलेंज दिलं होतं.गावाकडं या बोकडाचं मटण कसं वरपायचं तो सांगतो, असं म्हटलं होतं. त्यावर प्रश्न विचारला असता आता ताकद वाढली आहे. ती जास्त झाली आहे. ती कमी करायची वेळी आली आहे, असं शहाजीबापू म्हणालेत. शहाजीबापू वजन घटल्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी स्वत:मध्ये केलेला हा बदल अनेकांना आश्चर्याचा धक्का देणारा आहे.
आपल्या नेत्याचा नवा लूक पाहण्यासाठी सांगोला तालुक्यातील कार्यकर्ते आतूर झाले आहेत.
- हेही वाचा