शहाजीबापूंच्या इलाख्यात ठाकरेंचा बॉम्ब, लक्ष्मण हाकेंची पक्ष प्रवक्तेपदी नियुक्ती
सांगोला/नाना हालंगडे
“काय झाडी.. काय डोंगार… काय हाटील..” फेम आमदार शहाजीबापू पाटील यांच्या इलाख्यात उद्धव ठाकरे यांनी बॉम्बची पेरणी केली आहे. शहाजीबापू पाटील यांच्या प्रत्येक टीकेला सडेतोड उत्तर देण्यासाठी प्रा. लक्ष्मण हाकेंची पक्ष प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबतचे पत्र पक्षाकडून त्यांना देण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शिंदे गटाने बंड केल्यानंतर शिवसेनेतून शिंदे गटात जाणाऱ्यांची रीघ लागली आहे. अशातच धनगर समाजाचे नेते, माजी मंत्री महादेव जानकर, आ. गोपीचंद पडळकर यांच्यासमवेत काम केलेले नेते लक्ष्मण हाके यांनी ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. एक अभ्यासू, आक्रमक चेहरा असलेले हाके हे पुन्हा एकदा चर्चेत आले. पक्षात प्रवेश करताच हाके यांना पक्षाचे उपनेतेपद बहाल करण्यात आले. आता त्यांच्यावर प्रवक्ते पदाची नवी जबाबदारी देण्यात आली आहे.
सांगोल्यात बापूंना घेरण्याचा इरादा
“काय झाडी.. काय डोंगार… काय हाटील..” या डायलॉगमुळे राज्यात प्रसिद्ध असलेले आमदार शहाजीबापू पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यापासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. अगदी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांना त्यांनी शिंगावर घेतले. त्यामुळे शहाजी पाटील यांचा उधळलेला वारू रोखण्यासाठी शिवसेनेने जोरदार खेळी केली आहे. शहाजी पाटील यांना त्याच तोडीचे प्रत्युत्तर देण्यासाठी लक्ष्मण हाके यांना पक्षाचे प्रवक्ते पद दिले आहे.
आदित्य ठाकरे यांनी घातले लक्ष
शहाजी पाटील यांनी मधल्या काळात आदित्य ठाकरे यांच्यावरही जोरदार टिकास्त्र सोडले होते. “या पोरावर चांगले संस्कार झाले नाहीत” असा हल्लाबोल केला होता. मागील आठवड्यात आदित्य ठाकरे यांनी सांगोला तालुक्याच्या दौऱ्यावर असताना शहाजी पाटील यांना प्रत्युत्तर दिले होते.
आम्ही गद्दारांना किंमत देत नाही असे सांगतानाच त्यांनी सांगोला मतदारसंघात शहाजी पाटील यांना घेरण्याचा प्लॅन कार्यकर्त्यांना दिल्याचे वृत्त आहे. अशातच लक्ष्मण हाके यांच्यावर पक्ष प्रवक्ते पद देवून हा प्लॅन स्पष्ट केला आहे.
“घे चुना.. मळ पुन्हा” गायछाप गुजरातेत गेल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही
…अखेर सांगोला तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या