शहाजीबापूंच्या इलाख्यात आदित्य ठाकरे देणार हाबडा
पंढरपूर, सांगोल्याचा दौरा अखेर ठरला
थिंक टँक / नाना हालंगडे
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे बंडखोर आमदार आणि खासदारांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. विशेष म्हणजे “काय झाडी.. काय डोंगार… काय हाटील..” फेम आमदार शहाजीबापू पाटील यांच्या सांगोला तालुक्यात येण्याचे आदित्य ठाकरे यांचे निश्चित झाले आहे. आमदार शहाजीबापू पाटील यांनी ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टीग्रस्त गावात भेटी दिल्या त्या सर्व गावात स्वतः आदित्य ठाकरे जाणार आहेत. शिंदे – फडणवीस सरकारचा आणि विद्यमान लोकप्रतिनिधींचा फोलपणा चव्हाट्यावर आणणार आहेत.
आदित्य ठाकरेंनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलेले आव्हान स्वीकारत ७ नोव्हेंबरला सिल्लोड मतदारसंघात सभेचे आयोजन केले आहे. अब्दुल सत्तार यांच्या पाठोपाठ आदित्य ठाकरे हे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मतदारसंघात सभा घेणार आहेत.
९ रोजी सोलापूर जिल्हा दौरा
आदित्य ठाकरे ९ नोव्हेंबर रोजी सोलापूर दौऱ्यावर येणार असून सांगोला तालुक्यात सभा घेणार असल्याची माहिती सेनेचे नेते लक्ष्मण हाके यांनी दिली. पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेऊन सांगोला तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.
विठ्ठलाच्या दर्शनाने दौऱ्याची सुरुवात
आदित्य ठाकरे ९ नोव्हेंबरला सकाळी ९ वाजता पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते १० वाजता नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.
आदित्य ठाकरे ९ नोव्हेंबर रोजी विठ्ठलाचे दर्शन घेऊन शहाजीबापू पाटील यांच्या सांगोला तालुक्यातील नुकसानग्रस्त संगेवाडी आणि मांजरी येथे बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. विशेष म्हणजे याच गावातून शहाजीबापू पाटील यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला होता.
येत्या ७ नोव्हेंबरला कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदार संघात आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदे दोघांच्या सभा एकच दिवशी आहेत. आजी-माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांची एकाच ठिकाणी सभा असल्याने कुणाच्या सभेला जास्त गर्दी होते याचीच उत्सुकता सर्वांना लागून आहे. शिंदे गटातील प्रमुख नेते असलेल्या अब्दुल सत्तार आणि शहाजीबापू पाटील यांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे भेटी देणार आहेत. आता शहाजीबापू पाटील आदित्य ठाकरे यांच्याकडून काय प्रतिक्रिया दिली जाणार हे पाहावं लागणार आहे.
आदित्य ठाकरे यांनी परतीच्या पावसानं नुकसान झालेल्या नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील भागाची पाहणी केली होती. आदित्य ठाकरेंनी त्यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या घरी देखील त्यांनी भेट दिली होती.
जुनोनी वारकरी अपघाताबाबत धक्कादायक खुलासा; आजोबा नव्हे तर नातू चालवत होता कार
पुढील दोन महिन्यात जगावर भीषण संकट! बाबा वेंगा यांचे धडकी भरवणारे भाकीत | Think Tank Live