शहाजीबापूंचा समाचार घेण्यासाठी सुषमा अंधारे उद्या सांगोल्यात
सांगोला/नाना हालंगडे
शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे या उद्या रविवार, २५ डिसेंबर रोजी सांगोला दौऱ्यावर आहेत. सांगोला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सकाळी अकरा वाजता त्यांची विराट सभा होणार आहे. या सभेत शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर त्या तोफ डागणार आहेत. “ह्या गद्दार आमदाराचा समाचार घेण्यासाठीच ही सभा आयोजित केली आहे” अशी माहिती शिवसेनेच्या प्रवक्त्या संजना घाडी यांनी सांगोला येथे आज पत्रकार परिषदेत दिली. सुषमा अंधारे यांच्या रविवारच्या या सभेमुळे सांगोल्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे.
शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे तसेच शरद कोळी यांनी महाराष्ट्रभर शिवसेनेच्या वतीने महाप्रबोधन यात्रा सुरू केली आहे. या यात्रेमध्ये शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हेही सहभागी झाले होते. सुषमा अंधारे यांनी कोकण, मराठवाडा, विदर्भ हा भाग पिंजून काढला आहे, सांगोला येथे मागील दहा दिवसांपूर्वीच सभा होणार होती. मात्र अंधारे यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे ही सभा रद्द करण्यात आली होती. आता पुन्हा रविवार रोजी सकाळी अकरा वाजता ही सभा आयोजित करण्यात आली आहे.
शहाजीबापूंवर तोफ धडाडणार
मागील दोन महिन्यांपासून सुषमा अंधारे या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी अनेक सभांमध्ये शहाजीबापू पाटील यांना लक्ष केले होते. त्यांची टीका सहन न झाल्याने शहाजीबापू पाटील यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले होते. मागील 15 ते 20 दिवसांपूर्वीपासून या दोघांमधील टीका – टिप्पणीची कुठलीही घटना समोर आली नाही.
आता सुषमा अंधारे या रविवारी सांगोल्यात होणाऱ्या सभेत पुन्हा शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना लक्ष करतील अशी चिन्हे आहेत. “गद्दार शहाजीबापू पाटील यांचा समाचार घेण्यासाठीच ही सभा आयोजित करण्यात आल्याची” माहिती खुद्द शिवसेनेच्या पक्षप्रभक्त संजना गाडी यांनी सांगोल्यात पत्रकार परिषदेत दिल्याने सुषमा अंधारे ह्या आमदार शहाजीबापू पाटील यांना सांगोल्यातच खिंडीत पकडतील अशी चिन्हे आहेत.
मागील आठवड्यात शिवसेनेचे खासदार संजय शेवाळे यांनी आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती प्रकरणावर गंभीर भाष्य केले होते. रिया चक्रवर्ती यांना आदित्य ठाकरे यांनी 40 कॉल केल्याचा आरोप खासदार शेवाळे यांनी लोकसभेत केला होता. याचाही समाचार सुषमा अंधारे या सभेत घेण्याची शक्यता आहे.
या पत्रकार परिषदेत संजना घाडगे यांनी स्पष्ट सांगितले की, “खासदार राहुल शेवाळे यांची अनेक लफडी आम्हाला माहित आहेत. ती चव्हाट्यावर आणण्याचे काम सांगोल्याच्या सभेत सुषमा अंधारे करतील. याशिवाय भाजपचे नेते नारायण राणे यांचीही पोलखोल या सभेत करणार असल्याची माहिती घाडी यांनी पत्रकारांना दिली आहे.
सभेची जंगी तयारी
सांगोला शहरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही विराट सभा होणार आहे. हा चौक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. या चौकात एकूण तीन रस्ते येऊन मिळतात. तसेच उद्या सांगोल्याचा आठवडा बाजार आहे. त्यामुळे या सभेला हजारोंची गर्दी उसळेल असा अंदाज आहे. या चौकात अनेक राजकीय पक्षांच्या सभा होत असतात. मुख्यमंत्री तसेच वरिष्ठ केंद्रीय मंत्र्यांच्या सभा या चौकात यापूर्वी झालेल्या आहेत.
राजकीय दृष्ट्या हा चौक अत्यंत महत्त्वाचा आहे. हजारो लोक बसतील अशी क्षमता या चौकाची आहे. त्यातच रविवारी सांगोल्याचा आठवडा बाजार असतो. त्यामुळे ही सभा गर्दीने खचाखच भरेल असा आयोजकांना अंदाज आहे. सभेसाठी भव्य असा स्टेज उभारण्यात आला आहे. कार्यकर्ते ताकतीने हे सर्व नियोजन करत आहेत. सभेबाबतची पोस्टर्स, डिजिटल बॅनर सर्व परिसरात लावण्यात आलेले आहेत. शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागातून शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते या सभेसाठी येतील या दृष्टीने वाहनांचे नियोजन करण्यात आले आहे. ही सभा शहाजीबापू पाटील यांची डोकेदुखी वाढवणारी ठरेल अशी शक्यता आहे.
उद्या थिंक टँकवर सुपरफास्ट कव्हरेज
महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या व सांगोल्याच्या मातीतल्या थिंक टँक लाईव्ह या न्यूज पोर्टलवर तसेच यूट्यूब चॅनलवर या सभेचे कव्हरेज करण्यात येणार आहे. सांगोल्यात होणारी ही सभा, सभेतील भाषणे यांचे सविस्तर वार्तांकन तातडीने थिंक टँकवर आपणास वाचायला तसेच पाहायला मिळेल.
खालील लिंकवर क्लिक करून आमचे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा
https://youtube.com/@thinktanklive3626