“शहाजीबापूंचं घर अंधारेंना खुपतंय, त्यांना कावीळ झालीय!”
बापूंच्या मदतीला धावले शंभूराज देसाई
थिंक टँक / नाना हालंगडे
शहाजीबापू हे शेतकऱ्यांचे पुत्र आहेत. स्वत:च्या कष्टातून जमिन, स्वकष्टातून घर बांधले आहे, हे सुषमा अंधारेंच्या डोळ्यात खुपत आहे. अंधारेंना कावीळ झाली असावी, असे सांगत सुषमा अंधारे यांना आयुष्यात कधीही विधिमंडळात येण्याची संधी मिळणार नाही. त्यांनी स्वप्ने पाहू नयेत, अशी टीका शिंदे गटाचे नेते व राज्याचे मंत्री शंभूराजे देसाई (Minister Shambhuraj Desai) यांनी केली. ते पत्रकारांशी बोलत होते.
शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी रविवारी सांगोला येथे विराट सभा घेऊन शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. आपल्या पत्नीला दोनशे रुपयांची साडी घेऊ शकत नसणारे शहाजी बापू पाटील हे शिंदे गटात जाताच दोन महिन्यात एक एकर जागेत बंगला कसे बांधतात? असे कोणते झाड त्यांनी दारात लावले आहे? असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला होता.
सुषमा अंधारे यांनी आमदार शहाजी बापू पाटील यांच्यावर केलेली जहरी टीका सहन न झाल्याने शंभूराज देसाई यांनी अंधारे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
ते म्हणाले की, आपण किती स्फोटक शब्दात बोलतो, हे त्यांच्या वरच्या नेत्यांना दाखवण्यासाठी, अंधारे बोलत असतात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विस्मरण होऊन, अंधारेंना शिवसेनेमध्ये प्रवेश दिला गेला आहे. यापूर्वी सुषमा अंधारे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल काय बोलेले ते त्यांना चालतं का ? असा ही मंत्री देसाई यांनी प्रश्न उपस्थित केला.
अंधारे या आता सभागृहात नाहीत, त्यांना कधी सभागृहात येण्याची संधीच मिळणार नाही, असाही खोचक टोलाही ना. देसाई यांनी लगावला.
शंभूराज देसाई हे बापूंचे मित्र
मंत्री शंभूराज देसाई हे आमदार शहाजी बापू पाटील यांचे चांगले मित्र आहेत. आमदार शहाजीबापू पाटील यांनी अनेक भाषणांतून देसाई यांच्या मैत्रीबाबत स्पष्ट केले आहे.
गुवाहाटी येथे असताना “काय झाडी.. काय डोंगार… काय हाटील..” हा फोन कॉलवरील संवाद सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर आमदार शहाजीबापू पाटील हे प्रचंड तणावात होते. या संवादावर सर्वच माध्यमात मोठ्या प्रमाणात बातम्या सुरू होत्या.
दरम्यान, या व्हायरल क्लिपमुळे शहाजीबापू हे तणावात आहेत. ते आपल्या रूममध्ये बराच वेळ झोपले आहेत ही माहिती शंभूराज देसाई यांनी त्यावेळेस एकनाथ शिंदे यांना दिली होती. एकनाथ शिंदे यांनी शहाजीबापू पाटील यांना बोलावून घेत त्यांना बोलते केले.
त्यांना पुन्हा एकदा “काय झाडी..काय डोंगर.. काय हॉटेल” हा संवाद बोलण्यास सांगितले. तोही व्हिडिओ समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. हा किस्सा खुद्द शहाजीबापू पाटील यांनी अनेक भाषणांमध्ये सांगितलेला आहे. त्यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधमुळेच आज शंभुराजे देसाई यांनी तातडीने सुषमा अंधारे यांनी केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर दिले असल्याचे दिसून येत आहे.
हेही पाहा