वैश्विक महामारी : समाज, साहित्य आणि संस्कृती
डॉ. सुनील अभिमान अवचार यांचा मर्मभेदी लेख
१.
जगाच्या इतिहासात अनेक वैश्विक महामा-या आल्या आहेत. त्यांनी मानवी जीवन, समाज आणि संस्कृती व साहित्य यावर दूरगामी प्रभाव टाकला आहे. महामारी कशाला म्हणायचे तर, “ज्यावेळी एखादा आजार चटकन जगात सर्वत्र पसरतो आणि त्याची लागण निरनिराळ्या देशांमध्ये खूप लोकांना होते. तेंव्हा त्या आजाराला महारोगराई अथवा महामारी असे म्हंटले जाते. असा आजार कुठल्याही एका देशापुरता किंवा एका खंडापुरता नसतो.तर तो जगभर सर्वत्र झपाट्याने पसरतो.”१ जेंव्हा एखाद्या रोगाचे किंवा आजारचे रुग्ण जगभर दियासायला लागतात तेंव्हा जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) त्या आजाराला माहामारी किंवा महारोगराई म्हणून घोषित करते.
कोरोनाची जीवघेणी महामारी आज आपल्या दारापर्यंत येऊन ठेपली आहे. ही घटना जगाच्या मानसपटलावर व्यापक प्रभाव टाकणारी आहे. अशा प्रकारच्या महामारीचाही एक वेगळाच इतिहास आहे. या महामारींनी यापूर्वीही जगाचा चेहरामोहराच बदलून टाकला आहे, तसेच मानवी अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. मानवी जीवनात नाटकीय घडामोडींनी भरलेल्या अनेक महामारी येवून गेल्यात. जसे की १४ व्या शतकातील’ प्लेग’ ‘ब्लॅक डेथ’ मुळे युरोपमध्ये मृत्यूचे तांडव माजले होते. १८०१ मधील कैरेबिया देशातील ‘येलो फिवर ‘ किंवा ‘ पित्त ज्वर’, १६४१ मधील ‘प्लेग’, १८८८ ते १८९७ या काळात ‘राइंडरपेस्ट’ व्हायरसने आफ्रिकेमध्ये ९० टक्के पाळीव प्राण्यांचा झालेला मृत्यू, अमेरिकेमधील ‘चेचक’, युरोपात १५ व्या शतकात पोहोचलेले अमेरिकेतील ६ कोटी लोक मृत्यूमुखी पडणे, तसेच खासरा, हैजा, मलेरिया, सार्स, काली खासी, टायफॉइड ह्यामुळे लाखो लोक जगभरात मृत झाले आहेत. या सर्वांमुळे आजवर मोठी मानवी हानी झाली आहे. ह्या महामारीने माणसामाणसातील भेदभावसुद्धा रुंद व्हायला खतपाणीच घातले आहे. यासंदर्भात एक उदाहरण पाहता येईल. ‘सत्याग्रह’ मासिकातील “महामारियां तो बदल रही हैं लेकिन उनमें होने वाला भेदभाव सदियों से वैसा ही है”२ या लेखात प्रसिद्ध इतिहासतज्ञ रामचंद्र गुहा यांनी महामारीच्या काळातील मुंबई शहरातील भेदभावाकडे लक्ष वेधले आहे. ते सांगताना त्यांनी प्रशांत किदांबी यांच्या लेखाची साक्ष दिली आहे. १८९६मध्ये मुंबईत ‘प्लेग’ची साथ आली तेव्हा इंग्रज आणि प्रस्थापित वर्गाचा असा दृष्टीकोण होता की, “प्लेगची साथ झोपडपट्टीमधून आली आहे.” याचा परिणाम असा झाला की झोपडपट्टीमधील लोकांवर जीवघेणे हल्ले झाले आणि त्यांच्या डोक्यावरील छप्परसुद्धा उध्वस्त केले गेले. आज जेव्हा आपण कोरोना महामारीचा विचार करतो तेव्हा जात, वर्ग, लिंगभेद, इस्लामोफोबिया अशी जळमटे या महामारीला चिकटकून आलेली दिसून येतात. कोरोनाबरोबरच भूक, हिंसा, जातीय अत्याचार यामुळेही लोकं मरत आहेत. असे होण्यामागे भारतातीलच नव्हे तर जगातील लोकांची असलेली पंगू, विकृत आणि मूलतत्त्ववादी मानसिकता कारणीभूत असल्याचेही लक्षात येते. जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून नावलौकिक मिळविलेल्या मुंबईच्या धारावीमध्ये कोरोनाचे पेशंट वाढू लागताच, ‘धारावीवर बॉम्ब टाका’ असा मेसेज सोशल मीडियावर लिहिला जातो व फिरविला जातो. जगाची महासत्ता म्हणून मिरविणा-या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा देखील अशावेळी तोल गेला आणि ‘चायनीज व्हायरस’! असे वंशभेद करणारे विधान त्यांचाकडून केले गेले. भारतातल्या विकृत मिडियाने या व्हायरसचा फैलाव मरकजमधून होत असल्याची कोल्हेकुईही केली. जाणीवपूर्वक प्रोपोगंडा पसरवला. कोरोंना रोखण्यासाठी कोणतेही पूर्वनियोजन न करता केलेल्या लॉकडाऊनच्या घिसाडघाईहीनेही समाजावर दूरगामी परीणाम झाला. हातावर पोट असणाऱ्या असंख्य मजुरांना पायपीट करून शेकडो, हाजारो किलोमीटरचा जीवघेणा प्रवास करावा लागला. यात कित्येकांचे बळीही गेले, गर्भार स्त्रियांना रस्त्यावर बाळंत व्हायची वेळ आली. पायपीट करावी लागल्यामुळे लहान मुलांचे पाय पोळले, अनेकांना रेल्वे रूळावर अपघातात आपले प्राण गमवावे लागले, (त्याचवेळी समाजातला एक वर्ग बाल्कनीत येऊन थाळ्या वाजवत होता, मेणबत्ती पेटवत होता, घरात बसून बोरसुद्धा झाला होता.) ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी Digital Device नसल्यामुळे केरळमधील देविका, महाराष्ट्रातील ऊसतोड कामगाराचा मुलगा राजेंद्र संत, जातीय अत्याचारामधून विद्यार्थी अरविंद बनसोड, पिंपरी चिंचवड येथील विराग जगताप यांची the caste system does not allow love असे म्हणत हत्या झाली. गुजरातमधील बडोद्यात फ्रंटवर लढणा-या ७ सफाई कर्मचा-यांचा मृत्यू, याच राज्यातील साधूंनी केलेला लहान मुलीवर बलात्कार, चीनसोबत निर्माण झालेली युध्दजन्य परिस्थिती किंवा अयोध्येला असलेला साकेत नगरीचा ऐतिहासिक संदर्भ पाडली तुडविला गेला. एका राष्ट्रीय मराठी दैनिकाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने विद्रोही साहित्य परंपरेचा अनुल्लेख, हाथरस मधील माणुसकीला काळिमा लावणारी घटना, शेतक-यांचे आंदोलन, भांडवलदारांसाठी सरकार करीत असलेले काम हे आणि असे असंख्य संदर्भ कोरोना काळात माझ्या आणि आपल्याही सर्वांच्या पुढे आले आहेत.
२.
कोरोनामुळे भारतात दडपशाही, शोषण, इतिहासाला हरताळ, जातीय अत्याचार, स्त्रियांसंदर्भात होणारी हिंसा, भटक्या विमुक्तांची होणारी फरफट हे सर्व घडत असताना आपले मराठीत लिहिणारे कवी, लेखक, विचारवंत, अभ्यासक नेमके आहेत तरी कुठे? काय करीत आहेत? असा प्रश्न मला अधिकाधिक अस्वस्थ करीत जातो. या काळातील त्यांचे वर्तन आणि कृती संशयास्पद दिसून येते. मौन धारण करणारे ते सर्वजण याप्रकाराला मूक सहमती देणारे आहेत का? आपले कवी-लेखक व्यवस्थेला प्रश्न विचारायला तयार नाहीत का? याउलट अमेरिकेमधील परिस्थिती आहे. ‘ब्लॅक लाईव्ह मॅटर’ चा विचार केला तर असे लक्षात येते की, जॉर्ज फ्लाइडची गोऱ्या पोलीसाकडून झालेली हत्या, तिचा विरोध करतांना शासन व्यवस्थेला रस्त्यावर येऊन विचारला जाणारा जाब, “I cant breathe” (मला श्वास घेता येत नाही) हे विधान घोषवाक्य होणे, “Silence is violence” म्हणत गो-यांनीही रस्त्यावर येणे, “कोरोनात तुम्ही रस्त्यावर बाहेर पडत आहात. तुम्हाला भीती वाटत नाही का?”, असे एका पत्रकाराने ब्लॅक तरुणाला विचारल्यावर, “आम्हाला मृत्यूच्या भीतीपेक्षा न्यायासाठी लढणे महत्वाचे वाटते.” असे उत्तर देणे हे सर्व मला चिंतन करायला लावणारे आणि माझा विश्वास वाढवून मला येणा-या लढाईसाठी प्रेरित करणारे वाटते. आपल्याकडील मुखवटेधारी सवर्ण अमेरिकेतील निग्रो, ब्लॅक्सना सोशल मिडियामधून नुसता पाठींबा देतात. आपले लेखक साहित्यिकही यापेक्षा काही वेगळे नाहीत. ते केवळ हळहळ व्यक्त करतात पण येथील दलित अत्याचारासंदर्भात, स्त्रियांच्या हिंसेसंदर्भात, आदिवासी भटके विमुक्त, LGBTQA, अल्पसंख्याक, शेतकरी, श्रमजीवी यांच्या संदर्भातील अवहेलनेबद्दल नेहमीच सोयीस्करपणे मौन बाळगून राहतात. इतिहासाची पाने उलगडून पाहता असे दिसते की, पुण्यात १८९६-९७ साली प्लेगच्या साथीने थैमान घातले असता सावित्रीबाई फुले जिवावर उदार होवून स्वत: रुग्णांची सेवा करीत होत्या. असे करीत असतानाच त्यांना स्वत:ला आणि मुलगा डॉ. यशवंत याला प्लेगची लागण झाली आणि त्यांचा मृत्यू झाला. वर्तमान स्थितीतही अॅजेला डेव्हीस सारखी अमेरीकन लेखिका काळ्या बंधूंच्या मोर्चात सामील होऊन प्रत्यक्ष कृती करत आहे. साहित्यिकाने केवळ लिहून आणि भाषणबाजी करून भागत नसते तर त्याने समाजाला भेडसावणा-या प्रश्नांना भिडायचे असते तेही प्रत्यक्ष कृती करून. दमनकारी व्यवस्थेला मग ती शासनाची असो वा इतर कुठली तिला सामन्यांच्या वतीने जाब विचारायचा असतो. आपले लेखक-कवी-विचारवंत मात्र आज या महामारीने व तिच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या असंख्य प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहेत. हे सगळंच मनावर ओरखडे ओढणारं चित्र आहे. अशा स्थित्यंतराच्या काळाला अखंडपणे भिडतांना Nina simone ही माझी जैविकदृष्ट्या नातं सांगणारी काळी भगिनी सर्वच संवेदनशील कलावंताना उद्देशून म्हणते, ‘How can you be an artist and not reflect the current time?’३ आजचा समकाळ आणि त्यामध्ये घडणारे क्रौर्यआपल्याला दूर्लक्ष कसे करता येईल. तिला पडणारा हा प्रश्न माझाही सतत पाठलाग करीत राहतो.
३.
जगभरात महामारीविषयी साहित्य, सिनेमा आणि संगीत निर्माण झालेले आहे. काहींचा उल्लेख या माझ्या भाषणात करणे अनिवार्य आहे. फ्रांसिस कादंबरीकार आणि विचारवंत असलेले आल्बेर कामू यांच्या ‘प्लेग’ या कादंबरीतून प्लेग या साथीच्या आजाराचा भयंकर प्रकोप अधोरेखित करते. कोलंबियन कथाकार गर्बियल गारसिया यांची कादंबरी ‘लव इन द टाइम ऑफ कॉलरा’ प्रेम आणि यातनांचा संघर्ष चित्रीत करते. रवींद्रनाथ टागोर यांनी ‘पुराना नोकर’ या रचनेत चेचक आजाराने त्रस्त झालेल्या माणसाची व्यथा मांडली आहे. प्रेमचंद यांच्या ‘ईदगाह’ या कथेत हैजा या आजाराचा संदर्भ आलेला आहे. तसेच मल्याळी साहित्यिक तकषी शिवशंकर पिल्ले यांच्या ‘मैला साफ करनेवाले का बेटा’ या कादंबरीत सर्व शहर एका भयंकर आजाराच्या विळख्यात कसे येते याचे चित्रण केले आहे. असे अनेक उल्लेख जगभरातील साहित्यात आपल्याला शोधता येतील.
आजच्या कोरोंना काळात सर्व जग ऑनलाइन झालेले आहे. तेंव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून का होईना लेखक–कवी लाईव्ह व्यक्त होत आहेत. आजच्या काळाची पीडा, जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी, संशय, अभावग्रस्तता, प्रेम, द्वेष, मत्सर यांचे चित्रण करणारे साहित्य निर्माण होत आहे. मराठी साहित्यही याला अपवाद नाही. कोरोंना काळात निर्माण झालेल्या प्रश्नांचा वेध घेणा-या काही साहित्यकृतींचा या ठिकाणी उल्लेख करता येईल. मुंबई महनगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून काम करना-या संवेदनशील विलास कोडगेकर या लेखकाने ‘कोरोंना आणि आम्ही’ ही डायरी लिहिली आहे. या डायरीची प्रारंभ साधारणपणे 19 मार्च 2020 ला सुरू होते आणि शेवट 15 जून 2020 या काळातील प्रत्येक दिवसातील घटना प्रसंगाची संवेदनशील पणे मंडणी केली आहे .ही डायरी वाचताना मला ऑना फ्रँकच्या युद्धाची भीषणता व्यक्त करणाऱ्या डायरीची आठवण होते विलासनी लिहिलेली ही कोरोना काळातील डायरी भारतातील कष्टकरी समूहाच्या वाटायला आलेले वास्तव पुढे आणणारी सफाई कर्मचाऱ्यांची डायरी आहे. मनोगतता म्हणतो,“कोरोना लढाईत जे काही अत्यावश्यक सेवेत जनतेला सेवा देणार्याच्या बाबतीत काय काय घडलं हे येथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे.”४ नाशिक येथे राहणारे डॉ विवेक खरे यांनी सुद्धा कोरोना काळातील घटनांवर भाष्य करणारी लक्षवेधी डायरी लिहिली असून ती भावतालच्या सामाजिक- सांस्कृतिक भावविश्वाचा वेध घेते.
अशोक कोळी यांनी ‘कडीबंदी’ या नावाने कोरोना काळात लिहीलेल्या कथांचा संग्रह अलीकडेच प्रकाशित झाला. हा कथासंग्रह त्यांनी ‘रक्ताचं पाणी करून टोलेजंग शहर उभारून रक्त सांडत रस्त्यांवरून गावाकडे निघालेल्या मजुरांच्या व्यथावेदनाना’५ अर्पण केला आहे. अमोल बागूल यांनी ‘मुक्काम आयसीयू, कोविड वार्ड (भयाच्या छायेतील वेदनावळ ) या नावाने कवितांची एक मालिकाच समाज माध्यमावर प्रसिद्ध केली. कवी मनाचे डॉक्टर असलेले श्रीधर पवार यांनी कोरोनावरील काही कवितांचे लेखन केले आहे. महेंद्र कुमार मेश्राम यांनी ‘लॉकडावून’ नावाचा कवितासंग्रह प्रकाशित केला आहे. त्यातील एका कवितेत ते म्हणतात,
“कोव्हीड-१९
तू जेथे जाशील तेथे तुला
संपवले जाईल
आज ना उद्या
पण, जातीचे काय रे?
हा विषाणू येथील
निर्दयी मस्तकातून
जात नाहीना
करतो हैदोस राजरोसपणे
तरीही बळींची खरी संख्या पुढे येत नाही.’’६
एकूणच आतापर्यंतच्या माझ्या विवेचनातून दोन परस्परविरोधी दृष्टीकोन मी येथे आधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. कलावंत हा समाजापासून सुटा राहू शकत नाही. समाजातील प्रत्येक घटना घडामोडीला त्याला भिडावेच लागते. तो काळाचा तटस्थ साक्षीदार असतो. मी आशावादी आहे. येणा-या काळात आपलेही कवी-लेखक आणि विचारवंत संत तुकाराम, म.फुले-शाहू आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर, आगरकर,पानसरे-दाभोळकर-कलबुर्गी यांचा कृतीचा वारसा नक्कीच चालवतील अशी आशा वाटते.
संदर्भ ग्रंथ सूची
१.https://www.lokmat.com/urjaa/coronavirus-what-pandemic/ लोकमत २८ मार्च,२०२०
२. रामचंद्र गृहा ,‘महामारियां तो बदल रही हैं लेकिन उनमें होने वाला भेदभाव सदियों से वैसा ही है’, सत्याग्रह, २८ एप्रिल २०२०
३.‘Nina Simone on the role of the Artist’, By beyond capitalism now on 08, 8, 2013.https://beyondcapitalismnow.wordpress.com/2013/08/08/nina-simone-on-the-role-of-the-artist/
४. विलास कोंडगेकर, ‘कोरोना आणि आम्ही’, प्रगतशिल लेखक संघ, मुंबई, ८.२०२०,पृ.3 (मनोगत)
५. अशोक कोळी, कडीबंदी, सप्तर्षी प्रकाशन, मंगळवेढा, सोलापूर , १०,२०२० पृ. अर्पणपत्रिका
६. महेंद्रकुमार मुरलीधर मेश्राम, लॉकडाउन, स्वयंदीप प्रकाशन, पुणे, २६, नोहेबर,२०२०, पृ.२५