विस्तारणाऱ्या माध्यम क्षेत्रातील संधीचे सोने करा : डॉ. रवींद्र चिंचोलकर
मास कम्युनिकेशन विभागात राष्ट्रीय पत्रकारिता दिन उत्साहात साजरा
सोलापूर : प्रतिनिधी
माध्यमांचे क्षेत्र झपाट्याने विस्तारत आहे. इतर क्षेत्रात नोकऱ्या कमी होत असताना विविध माध्यमांत मात्र करिअरच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. या संधीचे विद्यार्थ्यांनी सोने करावे, असे आवाहन मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलांतर्गत मास कम्युनिकेशन विभागात राष्ट्रीय पत्रकारितादिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. एम.ए. मास कम्युनिकेशन व बी.व्होक. जर्नालिझम या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. अंबादास भासके, कु. तेजस्विनी कांबळे, डॉ. बाळासाहेब मागाडे, श्री. ऋषिकेश मंडलिक, डॉ. चैतन्य शिनखेडे हे सहायक प्राध्यापक उपस्थित होते.
डॉ. रवींद्र चिंचोलकर पुढे म्हणाले की, लोकशाहीच्या इतर तीन स्तंभांप्रमाणे चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेला लोकशाही प्रक्रियेत महत्त्वाचे स्थान आहे. इतर राष्ट्रांच्या तुलनेत वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या बाबतीत भारत देश पिछाडीवर आहे. अगदी पाकिस्तानही वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या बाबतीत आपल्या पुढे आहे. वृत्तपत्र स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे. हे स्वातंत्र्य अनेकदा शासन व्यवस्थेकडून हिरावून घेतले जाते. १९७५मध्ये लादण्यात आलेली आणीबाणी याचे उत्तम उदाहरण आहे. हा काळ पत्रकारितेसाठी काळा कालखंड मानला जातो. वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या प्रक्रियेत प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाची महत्त्वाची भूमिका आहे. या न्यायिक संस्थेच्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रीय पत्रकारिता दिन साजरा केला जातो.
यावेळी डॉ. अंबादास भासके, कु. तेजस्विनी कांबळे, डॉ. बाळासाहेब मागाडे, श्री. ऋषिकेश मंडलिक, डॉ. चैतन्य शिनखेडे यांनी मनोगते व्यक्त केली. प्रारंभी एम.ए. मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी अस्मिता गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन बी.व्होक. जर्नालिझम अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी ऋतुजा जाधव यांनी, तर आभार प्रदर्शन एम.ए. मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमाचे विद्यार्थी मनमोहन भोसले यांनी केले.