लॉकडाऊनमध्येही दिली संशोधनाला गती
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची कौतुकास्पद कामगिरी
- 21 विद्यार्थ्यांच्या पीएच.डी.ची व्हायवा
- 411 संशोधकांच्या आरआरसी बैठकांचे विद्यापीठाकडून यशस्वी नियोजन
- कोरोना, लॉकडाऊनमध्ये संशोधनाला गती देणारे विद्यापीठ
सोलापूर, दि.19 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून कोरोना व लॉकडाऊन काळातही संशोधनाला गती देण्यात आली असून 21 विद्यार्थ्यांच्या पीएच.डी.ची व्हायवा अर्थात मौखिक परीक्षेचे यशस्वी नियोजन करण्यात आले. 411 संशोधक विद्यार्थ्यांच्या संशोधन व मान्यता समितीच्या(आरआरसी)ऑनलाईन बैठकाही पार पडल्या. यामुळे संशोधक विद्यार्थ्यांनी आनंदायी व सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने कोरोना काळात विद्यार्थी हिताच्या दृष्टिकोनातून अनेक निर्णय घेऊन त्याची उत्तमरितीने अंमलबजावणी केल्याचे कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी सांगितले. यामध्ये प्रामुख्याने संशोधक विद्यार्थ्याचे संशोधनाचे काम प्रलंबित न ठेवता, त्यास प्राधान्य देऊन संशोधक विद्यार्थ्यांच्या पीएच.डी.च्या चार विद्याशाखांतर्गत विविध विषयांच्या आजपर्यंत एकूण 21 संशोधक विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन मौखिक परीक्षा (Viva-Voce) यशस्वीरीत्या घेण्यात आल्या व आगामी काळातही घेतल्या जाणार आहेत. या मौखिक परीक्षा झाल्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक ठिकाणी नोकरीसाठी अर्ज भरण्याची संधी प्राप्त झाली. मुलाखतीस पात्र होता आल्याने अनेक विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे आनंददायी व सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. विद्यापीठाने पुढाकार घेऊन घेतलेला हा निर्णय निश्चितच संशोधक विद्यार्थ्यांना फलदायी ठरत आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने कोरोना काळात विद्यार्थी हिताच्या दृष्टिकोनातून अनेक निर्णय घेऊन त्याची उत्तमरितीने अंमलबजावणी केली आहे. –कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस
याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी आपले स्पायरल थेसिस विद्यापीठाकडे लॉकडाऊनपूर्वी जमा केले होते, अशा विद्यार्थ्यांचाही विचार करून विद्यापीठाने एकूण 8 विषयांच्या 15 संशोधक विद्यार्थ्यांच्या मध्यवर्ती संशोधन समितीच्या(सीआरसी) व विभागीय संशोधन समितीच्या(डीआरसी) बैठकांचे ऑनलाईन प्रणालीद्वारे आयोजन केले. महाराष्ट्रात आजपर्यंत पीएच.डी.मौखिक परीक्षेशिवाय सीआरसी व डीआरसी बैठकांचे ऑनलाईन प्रणालीद्वारे आयोजन करणारे सोलापूरचे हे पहिले विद्यापीठ आहे. त्यामुळे संशोधक विद्यार्थ्यांच्या संशोधन कार्याला गती मिळत आहे.
पीएच.डी.प्रवेश पात्रता परीक्षेतून(पेट – ७) मधील प्रथमफेरीमधून निवड झालेल्या एकूण ४११ संशोधक विद्यार्थ्यांच्या संशोधन व मान्यता समितीच्या(आरआरसी)ऑनलाइन बैठकांचे विद्याशाखानिहाय व विषयनिहाय आयोजन दि. 20 ऑगस्ट ते 18 सप्टेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले होते. या सर्व बैठका यशस्वीरित्या व कोणत्याही व्यत्ययाशिवाय पार पडल्या. याकरिता विद्यापीठ कार्यक्षेत्रातील तज्ज्ञ प्राध्यापक, अभ्यासमंडळाचे अध्यक्ष, विद्यापीठ कार्यक्षेत्राबाहेरील तज्ज्ञ प्राध्यापक, समित्यातील सदस्य या सर्वांचे उत्तम सहकार्य लाभले.
यासाठी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.देबेन्द्रनाथ मिश्रा यांचे नियोजन व अधिष्ठाता डॉ. विकास कदम यांचे सहकार्य लाभले. संशोधन विभागातील सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे, कक्ष अधिकारी देवकन्या पांढरे, विजय जाधव, अनिता भोसले, राजश्री म्हेत्रे, अंजली बळुडंगी, अश्विनी माने या सर्व सहकाऱ्यांकडून त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली.
(माहितीस्त्रोत : राहुल वंजारी-जनसंपर्क अधिकारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ)