लाच मागितल्याप्रकरणी माळशिरसच्या मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा
कंत्राटदाराकडे १ लाख २६ हजार रुपयांची केली मागणी
थिंक टँक न्यूज नेटवर्क : एच. नाना
कन्स्ट्रक्शनच्या बँक खात्यावर बिलाची रक्कम जमा केल्याच्या मोबदल्यात बिलाच्या ३ टक्के रक्कम (१,२६,००० / – रुपये) लाच म्हणून मागितल्या प्रकरणी माळशिरसचे मुख्याधिकारी विश्वनाथ वडजे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.
तक्रारदार यांच्याकडे माऊली चौक , माळशिरस ते कचरेवाडी हद्दीपर्यंतच्या रस्ता डांबरीकरण्याचे कामाच्या बिलाचा चेक तिरूपती कन्स्ट्रक्शन यांचे बँक खात्यावर जमा केल्याच्या मोबदल्यात बिलाच्या ३ टक्के रक्कम लाच म्हणून माळशिरसचे मुख्याधिकारी विश्वनाथ वडजे यांनी रक्कम मागितली. याबाबत दि .३०.० ९ .२०२१ रोजी तक्रारदार यांनी त्यांचा तक्रारी अर्ज अॅन्टी करप्शन ब्यूरो सांगली यांच्याकडे दिला होता. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक ३०.० ९ .२०२१ , दि .२२.१०.२०२१ रोजी ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली.
पडताळणी कारवाईमध्ये लोकसेवक वडजे, मुख्याधिकारी , नगरपंचायत माळशिरस यांनी तक्रारदार यांच्याकडे माऊली चौक, माळशिरस ते कचरेवाडी हद्दीपर्यंतच्या रस्ता डांबरीकरण्याचे कामाच्या बिलाचा चेक तिरूपती कन्स्ट्रक्शन यांचे बँक खात्यावर जमा केल्याच्या मोबदल्यात १,००,००० / – रूपये व नवीन कामे मिळवून देण्यासाठी खर्च २६००० / – रूपये अशी एकूण १,२६,००० / – रूपये लाचेची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले आहे.
त्यानंतर दि . २२.१०.२०२१ रोजी व दि .०१.११.२०२१ रोजी लोकसेवक वडजे , मुख्याधिकारी , नगरपंचायत माळशिरस , यांचे विरूध्द सापळा कारवाई आयोजीत केली असता लोकसेवक वडजे, मुख्याधिकारी , नगरपंचायत माळशिरस यांनी संशय आल्याने तक्रारदार यांचेकडून लाच स्विकारली नाही. श्री. विश्वनाथ दिगंबरराव वडजे, मुख्याधिकारी नगरपंचायत कार्यालय माळशिरस ता. माळशिरस जि . सोलापूर वर्ग -२ यांच्या विरुध्द माळशिरस पोलीस ठाणे जि . सोलापूर येथे लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु आहे.
सदरची कारवाई राजेश बनसोडे (पोलीस उप आयुक्त / पोलीस अधीक्षक), व सुरज गुरव (अपर पोलीस उप आयुक्त / अपर पोलीस अधीक्षक), सुहास नाडगौडा (अपर पोलीस उप आयुक्त / अपर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे) तसेच सुजय घाटगे (पोलीस उप अधीक्षक अॅन्टी करप्शन ब्युरो सांगली) यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुदत्त मोरे पोलीस निरीक्षक , अविनाश सागर , संजय संकपाळ , अजित पाटील , प्रितम चौगुले , संजय कलगुटगी , चालक बाळासाहेब पवार , पोलीस कर्मचारी अॅन्टी करप्शन ब्युरो सांगली यांनी केली आहे.