आरोग्यताजे अपडेटथिंक टँक स्पेशलरोजगार/शिक्षणशेतीवाडी

लम्पी स्कीन पाय पसरतोय; गांभीर्याने घ्या

Spread the love

थिंक टँक / नाना हालंगडे
राजस्थान, पंजाब, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रामध्ये लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव वेगाने वाढला यामुळे पशुपालकांचे अर्थकारणच बिघडले आहे. आजाराच्या नियंत्रणासाठी प्रत्येक गावामध्ये सामूहिकपणे नियंत्रण उपाययोजनांची गरज आहे. पशुसंवर्धन विभागाने जलद गतीने लसीकरण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला तरच या आजारातून पशुपालन उद्योग सावरेल, हवामान बदलाच्या काळात पशू आजारांच्या नियंत्रणासाठी पशुपालक आणि पशुसंवर्धन विभागाने कायम दक्ष राहण्याची आणि कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्याची गरज प्रकर्षाने जाणवत आहे.

हौसाक्का म्हणजे इतिहास आणि वर्तमानाचा क्रांतिकारक दुवा!

 

जागतिक पशू आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव २०१० पासून विविध देशांमध्ये दिसून आला. सर्वप्रथम मोझांबिक देशातील जनावरांमध्ये याचा प्रादुर्भाव दिसला तेथूनच हळूहळू अनेक देशांत आजाराचा प्रसार झाला भारतात १२/८/२०१९ रोजी ओदिशा राज्यातील मयूरगंज जिल्ह्यामध्ये काही जनावरे आजारी दिसून आली.

१६/११/२०१९ रोजी लम्पी स्कीन आजाराचे निदान प्रयोगशाळेत झाले. त्यानंतर २०२० पासून बांगलादेश, चीन, भारतात कुठे ना कुठे या आजाराचा प्रादुर्भाव दिसत होता, मात्र जून २०२२ पासून भारतामध्ये या आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे. सध्या या आजाराने देशभरातील पशुपालक अडचणीत आले आहेत विशेषतः गाई आणि काही प्रमाणात म्हशी या आजाराला बळी पडताना दिसतात. ग्रामीण तसेच शहरी भागात वाढलेली भटक्या जनावरांची संख्या त्यांची कमी रोगप्रतिकारशक्ती, त्याचबरोबर उत्तर भारतातील अनेक गोशाळा आणि त्यामधील जनावरांची गर्दी, दुय्यम आरोग्य दर्जा यामुळे मोठ्या प्रमाणात गुजरात, राजस्थान या राज्यात आजाराचा वेगाने प्रसार झाला आहे, सध्याच्या स्थितीमध्ये बारा राज्यांतील सुमारे १६५ जिल्ह्यांत या आजाराचा प्रसार झाल्याचे दिसून आले आहे.

राणेंची भ्रांती आणि पवारांची औद्योगिक क्रांती

 

भारतीय कृषी संशोधन परिषदेने लम्पी स्कीन आजारावर भारतीय बनावटीची लस निर्माण केली आहे. ही लस तातडीने पशुपालकांना उपलब्ध करून दिली पाहिजे. देशभरातील पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था, पशू विद्यापीठे आणि पशू संवर्धन विभाग कार्यक्षम कसा होतील यादृष्टीने राज्य सरकार आणि केंद्र सरकारने पुढाकार घेणे काळाची गरज आहे.

सांगोला तालुक्यासाठी गुड न्यूज, लम्पीच्या ५० हजार लसी मिळणार

 

लम्पी स्कीन कशामुळे होतो?
गोवंश वर्गात दिसणारा लम्पी स्कीन हा विषाणूजन्य आजार आहे. हा विषाणू देवी गटातील कॅप्री पोक्स या प्रवर्गातील असून, शेळ्या मेंढ्यांतील देवी रोगाच्या विषाणूशी साधर्म्य आढळते आपल्या देशात प्रामुख्याने गोवंशात हा आजार दिसतो. या पूर्वीच्या संशोधनात आजाराचा प्रादुर्भाव देशी गोवंशापेक्षा संकरित जनावरांमध्ये अधिक असतो असे नमूद आहे. मात्र आपल्या देशात हा आजार मोठ्या प्रमाणावर देशी गोवंशात दिसून येत आहे. हा आजार सर्व वयोगटांच्या नर-मादीमध्ये होत असला तरी लहान वासरात तीव्रता अधिक असते.

*शेळी-मेंढीत हा आजार होतो का?
लम्पी स्कीन विषाणूचे शेळ्या-मेंढ्यांतील देवी आजाराच्या विषाणूशी साम्य आढळत असले, तरी हा आजार शेळ्या मेंढ्यांना अजिबात होत नाही.

*आजाराचा प्रसार कसा होतो?
प्रसार मुख्यत्वे चावणाऱ्या माश्या (स्टोमोक्सिस, टॅबॅनस, हिमॅटोबिया, क्युलीकॉइड्स), डास (एडीस), गोचीड या कीटकांमुळे होतो. निरोगी व बाधित जनावरे यांच्यातील प्रत्यक्ष स्पर्शाने किंवा लाळ, नाकातील स्त्रावाने दूषित झालेला चारा आणि पाण्याद्वारे प्रसार होवू शकतो.

*प्रादुर्भाव कोणत्या हवामानात अधिक प्रमाणात दिसतो?
उष्ण व दमट हवामान कीटक वाढीसाठी पोषक असते. त्यामुळे आपल्या देशात, राज्यात गेल्या तीन वर्षांपासून पावसाळ्यात याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. कीटकांचे प्रमाण कमी झाल्यामुळे हिवाळ्यात आजाराचे प्रमाण कमी होते.

*आजाराची गुंतागुंतीची धोकादायक लक्षणे कोणती?
सतत ताप येतो. छाती, पोळी, पायांवर सूज येऊन जनावर लंगडते, नाकातून स्राव येतो, श्वासास त्रास होणे आदी फुफ्फुसदाह आजाराची लक्षणे दिसतात. डोळ्यांतील व्रणामुळे चिपडे येऊन दृष्टी बाधित होते, नाकात व्रण निर्माण होतात. तोंडात व्रण निर्माण होऊन चारा खाण्यास त्रास होतो.

*दोन वर्षांपेक्षा या वर्षी मृत्युदर कशामुळे वाढला?
यापूर्वी जगात या आजाराचा दर २ ते ४५ टक्के (सर्व सामान्यपणे १० ते २० टक्के) आणि मृत्युदर १ ते ५ टक्यांपर्यंत आढळून आला आहे, मागील २ वर्षांत भारतात मृत्युदर अतिशय नगण्य होता. महाराष्ट्रात गेल्या २ वर्षांत साधारणतः ३.०८ लाख बधित जनावरांमध्ये फक्त १८ जनावरांचा मृत्यू झाला. हा मृत्युदर ०.००६ टक्का एवढा होता. मात्र यावर्षी कदाचित विषाणू अधिक घातक बनल्यामुळे तीव्रता वाढली असावी.
* मागील साथीच्या काळात क्वचित शरीराच्या आतील अवयवात गाठी दिसून येत होत्या. मात्र या वर्षीच्या साथीत श्वासनलिका, फुफ्फुसे, यकृत आदी अवयवांतही गाठी होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आजार धोकादायक झाला आहे.
* देशातील इतर राज्यांत मरतुक ५ टक्क्यांच्या आसपास असली तरी महाराष्ट्रात पशुसंवर्धन विभागाच्या नियोजनपूर्वक प्रयत्नांमुळे सद्यःस्थितीत १.९ टक्का आहे._
* बऱ्याच वेळा थायलोरिओसिस, बॅबेसिओसिस, ॲनाप्लाझमोसिस, न्यूमोनिया, कावीळ, गर्भाशयदाह इत्यादी आजारामुळे जनावरांचा मृत्यू दिसून आला आहे.

*लम्पी सदृश लक्षणे आढळल्यास काय करावे?
_लम्पी सदृश लक्षणे आढळल्यास तत्काळ जवळच्या शासकीय पशुवैद्यकीय संस्था प्रमुखांशी संपर्क साधावा, आजारी जनावरास तातडीने निरोगी जनावरांपासून विलगीकरण करून विनाविलंब उपचार सुरू करावे.

*आजाराची साथ पसरू नये म्हणून काय करावे?
* साथीच्या काळात गाव परिसरातून एकमेकांच्या गोठ्यास भेटी देणे बंद करावे.
* प्रादुर्भावग्रस्त भागातून जनावरांची ने-आण आणि चारा वाहतूक बंद करावी.

* साथीच्या काळात गाई-म्हशींचे खरेदी-विक्री बाजार बंद ठेवावेत.
* गावांमध्ये बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता तसेच चराईकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी.
* आजारी जनावरांचा मृत्यू झाल्यास मृतदेह उघड्यावर कुठेही न टाकता आठ फूट खोल खड्डयात पुरावा.

*आजाराचा प्रसार करणाऱ्या कीटकांचे नियंत्रण कसे करावे?
* गोठा, परिसर स्वच्छ व हवेशीर ठेवावा, डासांचा त्रास कमी करण्यासाठी परिसरात पाणी साठणार नाही याची दक्षता घ्यावी.

* गोचीड, त्यांची अंडी आणि त्यांच्या मधल्या अवस्थांचा नायनाट करण्यासाठी गोठ्याचा पृष्ठभाग (गव्हाण, भिंतीतील खाचखळगे) फ्लेमगने जाळून घ्यावा.
* माश्यांचा उपद्रव कमी करण्यासाठी गोठ्यातील शेणाची लवकर विल्हेवाट लावावी, शेण खड्यामध्ये टाकावे. उकिरड्यावर शेण टाकल्यानंतर पॉलिथिन कागद, ताडपत्रीने आच्छादित करावे.
* गाई, म्हशीस प्रखर सूर्यप्रकाशामध्ये चरावयास (सकाळी १० ते संध्या. ४ पर्यंत) सोडू नये. जेणेकरून चावणाऱ्या माश्यांचा प्रादुर्भाव कमी होईल.
* कीटकांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी गाई-म्हशींच्या अंगावर, तसेच गोठ्यात वनस्पतिजन्य किंवा जनावरांसाठी शिफारशीत रासायनिक गोचीडनाशकांची फवारणी करावी.
* वनस्पतिजन्य कीटकनाशक, जसे की नीम तेल (१० मिलि), करंज तेल (१० मिलि ), निलगिरी तेल (१० मिलि), साबण चुरा २ ग्रॅम एक लिटर पाण्यात मिसळून गाई म्हशींच्या अंगावर आणि गोठ्यात फवारणी करावी.

*गाभण गाईला लस देता येते का?
* गाभण गाईला लस देता येऊ शकते.

*आजाराचा प्रतिबंध करण्याकरिता कोणती लस द्यावी?
* आजाराच्या नियंत्रणासाठी भारतीय बनावटीची लम्पी प्रोवेंक इंड ही लस भारतीय पशुवैद्यक संस्था, इज्जतनगर आणि राष्ट्रीय अश्व संशोधन संस्था, हिस्सार यांनी प्रायोगिक तत्त्वावर नुकतीच विकसित केली आहे. नजीकच्या काळात ती सार्वत्रिकपणे उपलब्ध होणार आहे.
* सध्याच्या काळात पर्यायी लस म्हणून गोट पॉक्स (शेळ्यातील देवी) वापरण्यात येत आहे. ही लस नियंत्रणासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
* चार महिन्यांवरील सर्व गोवंशामध्ये लसीकरण करावे.
* साधारणपणे दोन ते तीन आठवड्यांत पुरेशी रोगप्रतिकारक शक्ती तयार होते आणि ती एक वर्षापर्यंत टिकते.
*आजारावर लसीकरण कसे करावे?
* प्रादुर्भावग्रस्त भागापासून ५ किमी त्रिज्येत येणाऱ्या सर्व गावांतील गोवंशाचे लसीकरण करावे. लसीची साठवण ४ ते ८ अंश सेल्सिअस तापमानात करावी. लस बर्फावर न्यावी. लसीकरण करताना प्रत्येक जनावरासाठी वेगळी सुई वापरावी.
* लसीची वापरातील बाटली ६ तासांच्या आत संपवावी. उर्वरित लस जनावरांना न देता तिची योग्य विल्हेवाट लावावी.
* आजारी जनावरांना लस अजिबात देऊ नये. बाधित जनावरांच्या संपर्कात आलेल्या जनावरांना लस देऊ नये.

*लसीकरण केल्यानंतर आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता किती? लसीकरण करूनही जर लम्पी आलाच तर उपचाराने बरा होतो का?
* जर जनावराच्या शरीरात सुप्त अवस्थेत विषाणू असल्यास लसीकरण केल्यानंतर १५ ते २० दिवसांपर्यंत प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. लसीकरण करूनही जर लम्पी आला, तरीही योग्य उपचाराने बरा होऊ शकतो.

*मागील वर्षी ज्या गाईला लम्पी आजार झाला असेल, तर या वर्षी परत होईल का?*l
* शक्यता कमी आहे, परंतु जनावराची रोगप्रतिकारक शक्ती आणि प्रकृती स्थिती कशी आहे यावर अवलंबून आहे. परंतु झाल्यास सौम्य स्वरूपाचा राहू शकतो.

*गोठ्यात नवीन व्यक्ती आल्यास किंवा डॉक्टर आल्यास आजाराचा प्रसार होतो का?
* बाधित क्षेत्रातून योग्यप्रकारे निर्जंतुकीकरण न करता नवीन व्यक्ती आल्यास किंवा डॉक्टर आल्यास आजार होण्याची शक्यता आहे.

*चारा वाहतूक केल्यावर लम्पी आजाराचा प्रसार होतो का?*
* बाधित क्षेत्रातून दूषित चारा वाहतूक केल्यास आजाराचा प्रसार होण्याची शक्यता आहे.

*आजारी गाई-म्हशींचे दूध प्यायल्यास किंवा सान्निध्यात आल्याने मनुष्यास आजार होतो का?*
* अजिबात नाही, गेल्या ९३ वर्षांच्या इतिहासात हा आजार जनावरांपासून माणसास झाल्याची कुठेही नोंद नाही. परंतु शेतकऱ्यांनी जनावरे हाताळल्यानंतर हात साबणाने धुऊन घ्यावेत किंवा सॅनिटायझरने स्वच्छ करून घ्यावेत. शास्त्रीयदृष्ट्या नेहमीच सर्वांनी दूध उकळून प्यावे.

*आजारी गायीचे दूध वासरांना पाजावे का?*
* आजारी गायीच्या दुधात लम्पीचे विषाणू असतात. त्यामुळे वासरांना प्रादुर्भाव होऊ शकतो शक्यतो वासरांना प्रत्यक्ष गाईचे दूध न पाजता त्याऐवजी दूध उकळून (१ ते ३ मिनिटे, ७० अंश सेल्सिअसपर्यंत उकळवावे) थंड करून पाजावे. असे केल्याने लम्पीचे विषाणू असक्रिय होतात.

*वराह, कोंबडी, शेळी-मेंढीमध्ये हा आजार होतो का? यांचे मांस खाण्याने मानवाला आजार होतो का?*
* अजिबात नाही, या प्राण्यात आजपावेतो लम्पी स्कीन आजार झाल्याची कुठेही नोंद नाही. त्यामुळे मांस खाण्यामुळे आजार होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. शास्त्रीयदृष्ट्या नेहमीच सर्वांनी मांस शिजवून खावे.

*माफसूचा प्रोटोकॉल*
* लम्पी स्कीन हा विषाणूजन्य आजार असल्याने प्रभावी उपचार उपलब्ध नाही, मात्र लक्षणांवर आधारित उपचार पद्धतीचा अवलंब करावा.
* सुरुवातीपासून नियमितपणे प्रतिजैविके, ज्वरनाशक, ऑटहिस्टेमिनिक औषधे, प्रतिकार शक्तिवर्धक जीवनसत्त्व अ व ई आणि शक्तिवर्धक ब जीवनसत्त्व तसेच त्वचेवरील व्रणासाठी अँटिसेप्टिक / फ्लाय रिपेलंट स्प्रे यांचा वापर करावा. योग्य उपचारामुळे ३ ते १० दिवसांत बहुतांशी जनावरे पूर्णपणे बरी होतात.
* जनावरांना मऊ, हिरवा चारा तसेच मुबलक पाणी उपलब्ध करून द्यावे.
* संतुलित आहार द्यावा. यामध्ये प्रामुख्याने खुराक आणि खनिज मिश्रणाचा समावेश असावा.

*लम्पीचे मूळ आफ्रिकेत :* दिवसेंदिवस लम्पी स्कीन आजार गोवंशामध्ये वेगाने पसरतो आहे. या आजाराची सुरुवात आफ्रिका खंडातून झाल्याचे दिसून येते. दक्षिण आणि पूर्व आफ्रिकेतील देशांमध्ये या आजाराचा सातत्याने प्रादुर्भाव दिसून आला आहे. मात्र १९७० मध्ये हा आजार पश्चिम आफ्रिकेतील देशांमध्ये पसरू लागला. साधारणपणे २००० पासून मध्य पूर्वेतील देश, २०१३ पासून टर्किसह अल्बेनिया, बोस्निया हर्जेगोव्हिना, बल्गेरिया, क्रोएशिया, कोसोवो, मॉन्टेनेग्रो, उत्तर मॅसेडोनिया, रोमानिया, सर्विया, स्लोव्हेनिया या देशांमध्ये लम्पी स्कीन आजाराने प्रवेश केला. अलीकडेच जॉर्जिया, रशिया, बांगलादेश आणि चीन या देशांमध्येही आजाराचा मोठा प्रादुर्भाव दिसून आला आहे.

*आशियायी देशात शिरकाव* साधारणपणे २०२१ पासून बांगलादेश, भारत, पाकिस्तान चीन, नेपाळ, भूतान, व्हिएतनाम, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, मलेशिया या आशियातील देशांमध्ये या आजाराचा दरवर्षी प्रादुर्भाव वाढतोय. यंदा जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात पाकिस्तानमध्ये हा आजार वेगाने पसरला. येथील हजारो जनावरे आजाराने बाधित झाली आहेत. पाकिस्तान प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आजपर्यंत पाच हजार जनावरे दगावली आहेत. अनेक जनावरे बाधित आहेत. भारतात लम्पी आजाराचा दृश्य परिणाम एप्रिल महिन्यात गुजरातमध्ये समोर आला. गेल्या काही दिवसांत गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, जम्मू आणि काश्मीर या राज्यांमध्ये आजार वेगाने पसरत आहे. जुलै महिन्यापासून या आजाराने देशात थैमान घालायला सुरुवात केली, आजपर्यंत देशभरात सुमारे ६७ हजार जनावरे या आजाराने दगावली आहेत. यामुळे शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे.

*परदेशात आहे काटेकोर नियमावली :* लम्पी स्कीन आजार कीटकांमार्फत पसरत असल्याने त्याचे नियंत्रण अवघड असते. या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी युरोपीय देशात प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. यामध्ये त्वरित रोगनिदान सुविधा, जसे की प्रयोगशाळेत अद्ययावत यंत्रणा, नमुने गोळा करण्याच्या आधुनिक प्रणालीचा वापर केला जातो, यामुळे आजार कुठे, किती जनावरांना, कोणत्या घटकांमुळे आणि कोणत्या प्रकारचा झाला आहे हे समजते. त्यानुसार उपचार, जनावरांची वाहतूक आणि त्यावरील निर्बंध तपासणी स्लॉटर पद्धती, आजारी किंवा प्रादुर्भावीत जनावरांचे निर्मूलन आणि प्रभावी लसीकरणाचा वापर केला जातो. विकसित देशात प्रत्येक जनावराला त्याचा ओळख क्रमांक असतो आणि त्याचे पूर्ण रेकॉर्ड देशाच्या किंवा राज्याच्या मुख्य ठिकाणी असते. जर असे जनावर लम्पी सारख्या किंवा इतर काही संसर्गजन्य आजाराने प्रादुर्भावीत असल्यास ते जनावर मालकाला बाहेर विकता येत नाही किंवा कत्तलखान्यात देता येत नाही, सदर बाबतीत निष्काळजीपणा केल्यास त्यास शिक्षेची आणि दंडाची तरतूद आहे जर पशुपालकाचे अनन्य साधारण आजाराने नुकसान झाले तर तेथील सरकार त्या पशुपालकाची जबाबदारी घेउन परत नव्याने सदर व्यवसाय करण्यास मदत करतात, जनावरांचा फार्म असणाऱ्या व्यावसायिकाला तेथील सरकारच्या पशुपालनाबाबतच्या नियमांचे काटेकोर पालन करावे लागते, नियम मोडल्यास शिक्षा आणि दंडाला सामोरे जावे.
*टेस्ट आणि स्लॉटर पद्धती* परदेशांमध्ये आजाराच्या निदानाची अद्ययावत सुविधा असल्याने नियमित जनावरांची तपासणी होते. जनावर आजारी आढळल्यास आणि ते आजाराचा प्रसार करत असेल किंवा मनुष्याला बाधा करणार असल्यास सदर जनावर किंवा तेथील संपर्कातील सर्व जनावरांना दयामरण पद्धतीने नष्ट केले जाते. त्यांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली जाते, जेणे करून मृत जनावरांकडून इतर जनावरांना किंवा माणसांमध्ये आजार पसरणार नाही. आजार निर्माण करणाऱ्या घटकांचे निर्मूलन केल्याने आजार आटोक्यात येतो. योग्य निदान करून ज्या भागात आजार पसरला आहे आणि तेथील आजाराची लक्षणे किंवा आजाराची प्रतिपिंडे नसणाऱ्या जनावरांना लसीकरण केले जाते, त्याचा प्रभावी परिणाम होऊन आजार आटोक्यात येतो. अर्थात असे काही आजार असतील ज्यामध्ये लसीकरण करणे प्रभावी नसेल, तर त्यावेळी टेस्ट आणि स्लॉटर पद्धतीचा अवलंब केला जातो.
लम्पी स्कीन आजारामुळे अक्षरशः बेजार झालो आहे. माझ्या गाईला योग्य उपचार मिळत नसल्याने मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. लसीकरण व्हायच्या आतच गाईला आजार झाला. सुरुवातीला खासगी पशुवैद्यकाकडून उपचार करून घेतले. त्यानंतर शेजारच्या गावातील पशुसंवर्धन विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला बोलावून घेतले. त्याने लम्पी झाल्याचे सांगितले. हे कळल्यानंतर दूध संघाच्या पशुतज्ज्ञाने औषधे लिहून दिली. औषधे घेऊन आल्यानंतर मात्र तो वैद्यकीय अधिकारी जनावरांना स्पर्श करत नव्हता. त्याने लांबूनच पाहून औषधे दिली. आजार कमी होत नसल्याने आम्ही आता होमिओपॅथिक उपचाराकडे वळलो आहोत. सरकारी पशुतज्ज्ञाला वारंवार फोन करूनही वेळेत न येणे, आला तरी जनावराच्या फार जवळ न जाता उपचार करणे आदी प्रकारांमुळे आम्ही हवालदिल झालो आहोत. दररोज ६ ते ७ लिटर दूध देणारी गाय आता थांबली आहे. आमचे रोजचे दोनशे रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे. उपचारासाठी धावाधाव होत आहे. पशुसंवर्धन विभागाकडे पुरेसे पशुतज्ज्ञ नाहीत, त्यामुळे लम्पी स्कीन आजारावर तातडीने उपचार होणे आव्हानात्मक ठरले आहे.
*महत्त्वाचे मुद्दे*
भटक्या जनावरांची संख्या, त्यांची कमी रोगप्रतिकारशक्ती, त्याचबरोबर उत्तर भारतातील गोशाळांमधील जनावरांची गर्दी, दुय्यम आरोग्य दर्जा यामुळे मोठ्या प्रमाणात गुजरात, राजस्थानमध्ये वेगाने प्रसार.
बाधित जनावरे विलगीकरणात ठेवा. बैलांकडे दुर्लक्ष करू नका.
थायलेरिअसिस, बबेसिओसिस अशा सहविकृतीसह जर लम्पी स्कीन आजार दिसला तर उपचार करताना सर्वकष विचार करा.
लसीकरणानंतर प्रतिकार शक्ती निर्माण होण्यासाठी १५ ते २१ दिवस लागतात.

सामुदायिक नियंत्रणासाठी ग्रामपंचायत, नगर परिषदांनी पुढाकार घ्यावा.
पशुपालकांनी गोठा, जनावरांची स्वच्छता ठेवावी. डास, गोचीड, गोमाश्या, घरातील माश्यांचा प्रादुर्भाव वाढणार नाही याकडे लक्ष द्या.
लम्पी स्कीन आजाराचा विषाणू शेळी, मेंढ्यांमध्ये देवी आजार निर्माण करणाऱ्या कॅप्रीपॉक्स समूहातील.
प्रामुख्याने देशी गाई, संकरित गाईंमध्ये मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव. शेळी, मेंढ्यांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव होत नाही.
जगात कुठेही या आजाराचे संक्रमण मानवात झालेले दिसून आलेले नाही.

पाहा खास व्हिडिओ

*आर्थिक नुकसान*
गाभण जनावरांमध्ये गर्भपात होतो, त्यामुळे एक वेत फुकट जाते. संक्रमण काळात मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन घटते. जनावरे अशक्त होत असल्याने त्यांना पुन्हा उत्पादनात आणण्यासाठी मोठा खर्च.कासेवर जखमा झाल्याने कासदाह. औषध उपचारांसह पशुपालकांचे आर्थिक नुकसान.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका