रासप सर्व निवडणूका स्वबळावर लढणार
आ. महादेव जानकरांनी टाकला राजकीय बॉम्ब
थिंक टँक / नाना हालंगडे
महाराष्ट्रात युत्या, आघाड्यांची समीकरणे जोमात असताना इकडे राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकरांनी राजकीय बॉम्ब टाकलाय. विधानसभा, लोकसभेसह आगामी सर्व निवडणुका रासप स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केलीय. हे सांगतानाच त्यांनी माढा, परभणी, बारामती, मिर्झापूर (उत्तरप्रदेश) या लोकसभा मतदार संघातून स्वतः निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी करीत असल्याचेही सांगून टाकले.
आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती लोकसभा विधानसभेच्या निवडणुका राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे रासपाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांनी पंढरपुरात रासप पश्चिम महाराष्ट्र पदाधिकारी मेळाव्यात बोलताना सांगितले
येथील तनपुरे महाराज मठात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यामध्ये नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार महादेव जानकर यांच्या हस्ते करण्यात आला.
पुढे बोलताना आमदार जानकर म्हणाले की, रासपाच्या कार्यकर्त्यांनी आतापासूनच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोकसभा, विधानसभा या निवडणुकीसाठी कार्यकर्त्याने आपापल्या मतदारसंघात कामाला लागावे.
युती संदर्भात बोलताना आमदार जानकर म्हणाले की, जो पक्ष आपणाला सन्मानाने जागा देईल त्याबरोबर आपण युतीसंदर्भात विचार करू.
याप्रसंगी राष्ट्रीय सचिव कुमार सुशील, राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे, प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, प्रदेश मुख्य सचिव ज्ञानेश्वर सलगर, प्रदेश सरचिटणीस सोमा आबा मोटे, प्रदेश सदस्य वैशाली वीरकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय माने, उपाध्यक्ष सुनील बंडगर, अजित पाटील, पंकज देवकाते, कालिदास गाढवे, प्रकाश खरात, जिल्हा उपाध्यक्ष एडवोकेट शरदचंद्र पांढरे, जिल्हा सरचिटणीस नवनाथ मदने, माळाप्पा खांडेकर, तालुकाध्यक्ष संजय लवटे, संतोष मासाळ, दामाजी मेटकरी, अनिल गडकर, नागनाथ मदने, संजय हाके उपस्थित होते.
राज्यात पक्ष कार्यरत
राष्ट्रीय समाज पक्ष एक भारतातील ताकदवान राजकीय पक्ष मानला जातो. या पक्षाची स्थापना २००३ मध्ये झाली. महादेव जानकर हेेे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. या पक्षाने आजपर्यंत ४ राज्यात २ लोकसभा जागा लढविल्या. या पक्षाने महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आसाम, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, तमिळनाडू मध्यप्रदेश विधानसभा निवडणूका लढविल्या आहेत. सध्या ८ राज्यात पक्ष कार्यरत आहे.
२०१७ झालेल्या महाराष्ट्रातील निवडणूकीत रा.स.प. ने जिल्हा परिषदेवर १२ आणि तालुका पंचायतवर १८ सभासद निवडून आणले. ०.२ मतदान मिळवून राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता प्राप्त होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे. याला निर्वाचन आयोगाकडून मान्यता मिळालेली आहे.
२००३ साली पक्ष स्थापन करून २०१३ पर्यंत ग्रामपंचायत, ते विधानसभा- लोकसभा लढविणे आणि जिंकणे, यात पक्षाला यश आले आहे. 2009ला राष्ट्रीय समाज पक्षाचा एक आमदार निवडून आला आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणूकीमध्ये दौंड मतदार संघातून राहूल कूल हे निवडून आले आहेत. ब्राह्मण –मराठा ते जैन – मुस्लिम अल्पसंख्य समाजाला राष्ट्रीय समाजाचा प्रमुख घटक मानतो. “एकात्म राष्ट्र निर्माण” हे त्यांनी आपले ध्येय बनविले आहे. राजकीय सत्ता हे साध्य तर राष्ट्रीय समाज पक्ष हे साधन आणि वाहन बनविले आहे.
पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी 2014ची लोकसभा निवडणूक महाराष्ट्रातील बारामती लोकसभा मतदारसंघातून लढवली. शरद पवार यांच्या बालेकिल्यात लाखो मते खेचली.
पाठोपाठ राज्याच्या विधानसभेच्या निवडणूकीमध्ये दौंडमधून रासपचे उमेदवार राहुल सुभाष कुल हे 14 हजारांच्या वर आघाडी घेऊन निवडून आले.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत हा पक्ष परभणी, बारामती, माढा तसेच उत्तर प्रदेशातील मिर्झापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे महादेव जानकर यांनी सांगितले. भाजपने सन्मानजनक जागा दिल्या तरच युती करू अन्यथा स्वबळावर लढण्याची आमची तयारी असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा
संभाजीराजे, स्वराज्य रक्षक की धर्मवीर? हिंदू धर्मातल्या औरंगजेबांची खेळी