“राजकीय सौहार्दाचा वस्तुपाठ”; हे फक्त सांगोल्यातच घडू शकते
विजयी व पराभूत उमेदवार जेव्हा आमने-सामने येतात
थिंक टँक न्यूज नेटवर्क : डॉ. नाना हालंगडे
एरव्ही निवडणुका संपल्या तरी उमेदवार एकमेकांचे तोंड पाहत नाहीत. कार्यकर्त्यांतील धुसफूस आणि सुप्त संघर्ष हा नित्याचाच. यातून निष्पाप कार्यकर्त्यांचे जीवही जातात. हे चित्र देशात अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सांगोला तालुका मात्र याला अपवाद आहे. येथे फक्त निवडणुकीपुरतेच राजकारण चालते. निडणुकीनंतर मात्र मनभेद संपतात. एक असाच एक राजकीय प्रसंग सांगोल्यात काल पाहायला मिळाला. गत विधानसभा निवडणुकीतील विजयी व पराभूत उमेदवार आमने-सामने आले.. आणि काय घडलं त्याची ही कथा..
- हेही वाचा
- ‘बाबासाहेब’ तुम्हीच आहात ‘आबासाहेब’
त्याचं झालं असं. एका दुकानाच्या उद्घाटनासाठी सांगोल्याचे शिवसेनेचे विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील व पराभूत उमेदवार डॉ. अनिकेत देशमुख यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. हे दोघेही मागील निवडणुकीत एकमेकांच्या समोर दंड थोपटून उभे होते. भाई गणपतराव देशमुख त्यावेळी हयात होते. आपल्या पश्चात शेकापला पराभव पत्करावा लागू नये यासाठी भाई गणपतराव देशमुख यांनी दमदार नियोजन केले होते. मात्र मित्र पक्षाकडून दगाफटका झाला आणि शेकापचे तरुण तडफदार उमेदवार डॉ. अनिकेत देशमुख यांचा अवघ्या काही मतांनी पराभव झाला.
- हेही वाचा : जवळा जि.प. गटात अतुल पवार करणार भूकंप?
हा खरं तर शेकापला मोठा धक्का होता. दोन वेळचा अपवाद सोडला तर शेकापने कधीही पराभव पाहिला नव्हता. त्या निवडणुकीत मात्र विपरित घडले. डॉ. अनिकेत देशमुख यांना पदार्पणातच पराभवाची धूळ चाखावी लागली. हातचा घास हिरावल्यागत अवस्था शेकापच्या कार्यकर्त्यांची झाली. मात्र राजकीय कटुता न ठेवता निवडणुकीपुरते राजकारण करण्याचे संस्कार भाई गणपतराव देशमुख यांनी कार्यकर्त्यात रुजविल्याने परिस्थिती पूर्वपदावर आली.
- हेही वाचा : जयंतराव घेरडीचे मैदान गाजविणार!
‘तो’ प्रसंग इतिहास मुक्रर करणारा
एका दुकानाच्या उद्घाटनासाठी सांगोल्याचे शिवसेनेचे विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील व पराभूत उमेदवार डॉ. अनिकेत देशमुख यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. सायंकाळी कार्यक्रम होता. दोघेही नियोजित वेळेत कार्यक्रमस्थळी दाखल झाले.
फित कापण्यासाठी ते दोघेही जवळ आले. नजरा नजर होताच दोघांनीही एकमेकांना आलिंगन देऊन नमस्कार केला. एकमेकांची ख्याली खुशाली विचारली. शेकहॅण्ड केला. एकमेकांचा आदर राखत त्या दोघांनीही फित कापून दुकानाचे उद्घाटन केले. तासभर ते दोघे एकत्र असूनही त्यांच्यात कसलीही कटुता दिसून आली नाही.
हे नेमकं कसं घडलं?
त्याचे कारणही तसेच आहे. राजकारणातील पितामह, विजयाचा विक्रम प्रस्थापित करणारे शेकापचे ज्येष्ठ नेते कै. भाई गणपतराव देशमुख यांनी आपल्या उभ्या राजकीय आयुष्यात कधीही वैमनस्य पत्करले नाही. विधानसभा निवडणुकीत त्यांचा विरोधात बहुसंख्य वेळा अॅड. शहाजीबापू पाटील उभे ठाकले होते. अॅड. शहाजीबापू व गणपतराव तथा आबासाहेब हे दोघेही पट्टीतले वक्ते. दोघांचेही संघटन मोठे, मानणारा मतदार वर्ग मोठा. असे असूनही अॅड. शहाजीबापू पाटील यांना एकवेळचा अपवाद सोडला तर सतत पराभव पत्करावा लागला. इकडे सतत विजयी होऊनही जमिनीवर पाय आणि केवळ विकासासाठीच राजकारण ही भूमिका जगणारे आबासाहेब मात्र निवडणुकीवेळची कोणतीही टीका मनात न ठेवता कामाला प्राधान्य देत असत.
खेळीमेळीचे, सौहार्दाचे वातावरण
कै.भाई गणपतराव देशमुख, अॅड. शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील, श्रीकांत देशमुख, कै. सीताराम वाघमोडे ही सांगोला तालुक्याच्या राजकारणातील महत्वाची नावं. यातील अॅड. शहाजीबापू पाटील व श्रीकांत देशमुख हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते. अॅड. पाटील हे आता शिवसेनेत तर श्रीकांत देशमुख हे भाजपत आहेत. हे सर्वच नेते प्रगल्भपणे राजकारण करणारे आहेत. भाई गणपतराव देशमुख हे मित्र पक्षासोबतच विरोधकांचाही आदर करायचे. त्यामुळेच अॅड. शहाजीबापू पाटील असोत की दीपकआबा हे विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने भाई गणपतराव देशमुख यांच्या मांडीला मांडी लावून बसत असत. एकमेकांची विचारपूस करत. भाई गणपतराव देशमुख हे आपल्या कार्यकर्त्यांच्या बरोबरीने विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांचीही कामे कोणताही मनभेद न ठेवता मार्गी लावत असत.
हे चित्र सुखावणारे
कोणता उमेदवार आपली कामे करू शकतो, आपण कोणाच्या पाठीशी उभे राहावे हे समजण्यासाठी जनता सुज्ञ असते. आताच्या डिजीटल युगात ही प्रगल्भता अधिक वृद्धिंगत झाली आहे. लोकांना पक्ष व उमेदवारांपेक्षा आपला व मतदासंघांचा विकास, उमेदवाराचा व्यक्तिगत स्वभाव, जनसंपर्काची हातोटी या बाबी महत्त्वाच्या वाटतात. नेमके हेच काम भाई गणपतराव देशमुख यांनी आपल्या उभ्या राजकीय आयुष्यात वृद्धिंगत केले आणि ते निस्वार्थी, सौहार्दपूर्ण राजकारणात यशस्वी झाले. त्यांनी घालून दिलेला मनभेद विरहित, सौहार्दपूर्ण राजकारणाचा वस्तुपाठ या घटनेने पुन्हा एकदा जनतेला पाहायला मिळाला. तालुक्यातील हे निकोप राजकीय वातावरण वृद्धिंगत करण्याची जबाबदारी विद्यमान सर्वपक्षिय नेत्यांवर आहे.. एवढेच!