राजकारणी खरे नटसम्राट : पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील
राज्याच्या महाविकास आघाडी अगोदरच सांगोल्यात आघाडी
सांगोला (नाना हालंगडे):‘राजकारणी खरे नटसम्राट असतात यांना सर्व प्रकारच्या भूमिका पार पाडाव्या लागतात. शिवसेनेमध्ये सामाजिक कामांना नेहमीच प्राधान्य दिले जाते. त्यामुळेच आज एक टपरीवाला शिवसेनेच्या माध्यमातून मंत्री होतो. राजकारणात कोणाला पाणी पाजायचे असेल तर आपल्याकडे पाणी असावे लागते. बापू, तुम्ही काळजी करू नका हा पाणीपुरवठा मंत्री तुमच्या पाठीशी आहे. तालुक्यातील एकही गाव पाण्यावाचून वंचित राहणार नाही. 81 गावची पाणीपुरवठा योजना यापुढेही सुरु राहणार असल्याची ग्वाही पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी आज गुरुवार (ता.14) रोजी सांगोला येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील बोलत होते.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे उपाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील, शिवसेनेचे भाऊसाहेब रुपनर, डी. व्ही. पी ग्रुपचे प्रमुख अभिजीत पाटील, काँग्रेसचे प्रा. पी. सी. झटके, संभाजी शिंदे, रफिक नदाफ, बाबुराव गायकवाड, तानाजी पाटील, शहाजी नलवडे, सूर्यकांत घाडगे, कमरुद्दीन खतीब, गुंडादादा खटकाळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, तिन्ही पक्षाच्या लोकांची महाविकास आघाडीची गाडी सध्या सुसाट आहे. ही महाविकास आघाडीचे सरकार आपले कार्यकाल पूर्ण करेल. आज कोण जास्त बोलतो त्याच्यावर ईडी लावली जाते. चौकशी करायला काहीच हरकत नाही परंतु सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे.
सत्कार मूर्ती शहाजी पाटील म्हणाले की, सांगोला तालुक्याची दुष्काळाची ओळख होती ती बदलण्याचे काम सध्या करावा लागत आहे सांगोला तालुक्यातल्या विविध टेंभू, म्हैसाळ शिरभावी पाणीपुरवठा यांसारख्या विविध योजना शिवसेनेच्याच सहकार्याने पूर्ण झाल्या आहेत. 650 कोटी रुपयांची ‘स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना’ लवकरच कार्यान्वीत होणार आहे. दीपक साळुंखे-पाटील बोलताना म्हणाले की तालुक्यात राजकारण करायला वयाच्या मर्यादा नाहीत. सांगोल्यातील महाविकास आघाडी राज्याच्या महाविकास आघाडीच्या अगोदरच निर्माण झाली आहे. यावेळी पी. सी. झपके, अभिजीत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केली. प्रा. संजय देशमुख यांनी आभार मानले.