योगीराज वाघमारे आणि डॉ. सारीपुत्र तुपेरे यांचे ग्रंथ समाजाला दिशा देणारे
डॉ. एम. डी. शिंदे यांचे प्रतिपादन
सोलापूर : प्रतिनिधी
ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे लिखित ललितग्रंथ “पत्रास कारण की..” आणि डॉ. सारीपुत्र तुपेरे लिखित काव्यसंग्रह “तुझ्या बोटाच्या दिशेने चालत आहे ” हे दोन्ही ग्रंथ समाजाला दिशा देणारे आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. एम. डी. शिंदे यांनी केले.
थिंक टँक पब्लिकेशन्स प्रकाशित योगीराज वाघमारे लिखित “पत्रास कारण की..” आणि डॉ. सारीपुत्र तुपेरे लिखित “तुझ्या बोटाच्या दिशेने चालत आहे” या ग्रंथांचे प्रकाशन नुकतेच झाले. यावेळी डॉ. एम. डी. शिंदे बोलत होते.
अध्यक्षस्थानी सोशल कॉलेजचे प्राचार्य डॉ. इ. जा. तांबोळी होते. प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ लेखक डॉ. शेरअली शेख, ज्येष्ठ विचारवंत डॉ. एम. डी. शिंदे, बौद्ध साहित्याचे अभ्यासक डॉ. संघप्रकाश दुड्डे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक थिंक टँक पब्लिकेशन्सचे संचालक डॉ. बाळासाहेब मागाडे यांनी केले. सूत्रसंचालन सुप्रिया माने यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. सारीपुत्र तुपेरे यांनी केले.
डॉ. एम. डी. शिंदे पुढे म्हणाले की, योगीराज वाघमारे यांनी “पत्रास कारण की…” या ग्रंथात समाजातील वास्तव स्थितीवर अत्यंत संव संवेदनशीलपणे भाष्य केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्यागामुळे आपला विकास झाला. शिक्षण मिळाले, आर्थिक संपन्नता आली. त्या बाबासाहेबांनाच अनेकजण विसरतात.
आपली समाजाप्रती असणारी जबाबदारी किती महत्त्वपूर्ण आहे याची जाणीव या ग्रंथातील विविध पत्रांतून प्रकर्षाने जाणवते. नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर क्षीरसागर नावाचा समाजबांधव धम्मकार्य हाती घेतो. समाजात बुद्धविचार पेरत राहतो. त्याचे हे कार्य किती महत्त्वाचे आहे हे यातील एका पत्रातून दिसून येते.
योगीराज वाघमारे यांचे पत्रातील संवादात्मक लेखन नवा विचार देणारे आहे. आत्ममग्न झालेल्या समाजाला ते काहीतरी सांगू पाहतात. यातील अनेक पत्रे वाचकांना आत्मपरीक्षण करायला लावतात. वाचकांनी हा ललितग्रंथ नक्की वाचायला हवा.
डॉ. संघप्रकाश दुड्डे म्हणाले की, डॉ. सारीपुत्र तुपेरे यांच्या काव्यसंग्रहात आईची ममता दिसून येते. आपल्या मुक्तिदात्याप्रतीचा आदरभाव प्रकर्षाने जाणवतो. फॅन्ड्री चित्रपटात जब्याने मारलेला दगड हा विद्रोह प्रकट करणारा असला तरी त्यामध्ये दडलेले स्वाभिमानाचे तत्वज्ञान मनाला ऊर्जा देते. त्याचा उहापोह त्यांच्या कवितेतून दिसून येतो. त्यांच्या सर्व कविता आंबेडकरी विचारांची दिशा स्पष्ट करणाऱ्या आहेत.
तथागत गौतम बुद्धांची करुणा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे समतावादी विचार प्रत्येक शब्दांतून दिसून येतात. वाचकांना या कविता केवळ विचार करायला लावत नाहीत तर त्या एका नवा विचार देवून जातात. हा काव्यसंग्रह आंबेडकरी साहित्य विश्वात चर्चा घडवून आणेल असा आहे.
डॉ. शेरअली शेख म्हणाले की, “तुझ्या बोटाच्या दिशेने चालत आहे..” हा काव्यसंग्रह आंबेडकरी विचारांची पेरणी करणारा आहे. मानवी जीवनात सर्वधर्म समभाव, समतावादी विचार किती महत्त्वाचे आहेत त्याची जाणीव हा काव्यसंग्रह करून देतो. डॉ. तुपेरे यांनी असे लेखन सातत्याने करावे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा सोलापूर सोशल कॉलेजचे प्राचार्य डॉ. इ. जा.तांबोळी म्हणाले की, “तुझ्या बोटाच्या दिशेने चालत आहे..” या काव्यसंग्रहातील प्रत्येक कविता वाचकांना तत्वज्ञान सोपे करून सांगते. यावेळी डॉ. तांबोळी यांनी कवी नारायण सुर्वे यांच्या कवितेचा संदर्भ देत तथागत गौतम बुद्धांची करुणा, बुद्ध विचारांची दिशा मानवी जीवनात किती महत्त्वाची आहे याचे विश्लेषण केले.
या कार्यक्रमास डॉ. तानाजी देशमुख, डॉ. शिवाजी मस्के, डॉ. बापू राऊत, भारतकुमार मोरे, डॉ. अर्जुन धोत्रे, नागेश खराडे, डॉ. शिवाजी बनसोडे, बी. के. तळभंडारे, अरुण गायकवाड, कवी नागनाथ गायकवाड, प्राचार्या डॉ. मीना गायकवाड, डॉ. डी. आर. गायकवाड आदी उपस्थित होते.
हेही वाचा