येरमाळ्यातील आंबेडकरी समाजाचा ऐतिहासिक दस्तऐवज : डॉ. सारीपुत्र तुपेरे
योगीराज वाघमारे यांच्या ग्रंथाचे उत्साहात प्रकाशन
येरमाळा : विशेष प्रतिनिधी
मराठवाडा या भूमीला आंबेडकरी चळवळीचा फार मोठा इतिहास आहे. त्यामध्ये कसबे तडवळे येथील बाबासाहेबांनी घेतलेली परिषद ही या भागासाठी अतिशय महत्त्वाची घटना ठरली. यातूनच उस्मानाबाद, कळंब, येरमाळा या भागामध्ये आंबेडकरी चळवळीचा विस्तार झाला. विशेषतः येरमाळ्याच्या भूमीमध्ये बाबासाहेबांच्या चळवळीत काम करणारे कार्यकर्ते आंबेडकरी विचार घेऊन गेले. तळागाळातील समाजापर्यंत त्यांनी हा विचार पोहोचवला. ही माणसे आडाणी होती. परंतु त्यांच्यामध्ये आंबेडकरी बाणा होता. त्यांनी पुढच्या पिढीला शिक्षणाचा मार्ग दाखविला. समाजप्रबोधन केले. परंतु अशा सामाजिक कार्यकर्त्यांमधील अनेक व्यक्तींची चरित्रे लिहिली गेली नाहीत. त्यांचे कार्यकर्तृत्व इतिहासात दुर्लक्षित राहिले. येरमाळ्यातील भीमनगरमध्ये राहणाऱ्या आंबेडकरी समाजातील अशा अज्ञात माणसांची व्यक्तीदर्शने, समाजदर्शने योगीराज वाघमारे यांनी ‘आमची वस्ती एक बेट’ या ग्रंथामध्ये रेखांकित केलेली आहेत. या ग्रंथाचे वेगळेपण म्हणजे भीमनगरचे पूर्वचे रूप आणि आजचे स्वरूप बखरीसारखे या ग्रंथामध्ये चित्रित झालेले आहे. म्हणून हा ग्रंथ येरमाळा येथील आंबेडकरी समाजाचा ऐतिहासिक दस्तऐवज ठरतो, असे प्रतिपादन सुप्रसिध्द लेखक, समीक्षक डॉ. सारीपुत्र तुपेरे यांनी केले.
ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे लिखित ‘आमची वस्ती एक बेट’ या ग्रंथाचे प्रकाशन येरमाळा येथे झाले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सारीपुत्र तुपेरे बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सरपंच एम. जे. कांबळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सारीपुत्र तुपेरे यांच्यासह डॉ. संजय कांबळे, ज्येष्ठ साहित्यिक रमेश बोर्डेकर, सुप्रसिध्द लेखक के. व्ही. सरवदे, सी. आर.घाडगे, सेवानिवृत्त गट विकास अधिकारी वसंत वाघमारे, थिंक टँक पब्लिकेशन्सचे डॉ. बाळासाहेब मागाडे उपस्थित होते.
डॉ. सारीपुत्र तुपेरे पुढे म्हणाले की, कसबे तडवळे येथील बाबासाहेबांनी घेतलेली परिषद ही या भागासाठी अतिशय महत्त्वाची घटना ठरली. यातूनच उस्मानाबाद, कळंब, येरमाळा या भागामध्ये आंबेडकरी चळवळीचा विस्तार झाला. विशेषतः येरमाळ्याच्या भूमीमध्ये बाबासाहेबांच्या चळवळीत काम करणारे कार्यकर्ते आंबेडकरी विचार घेऊन गेले. तळागाळातील समाजापर्यंत त्यांनी हा विचार पोहोचवला. ही माणसे आडाणी होती. परंतु त्यांच्यामध्ये आंबेडकरी बाणा होता. त्यांनी पुढच्या पिढीला शिक्षणाचा मार्ग दाखविला. समाजप्रबोधन केले. या परिषदेमुळेच या भागात शिक्षणाची ज्योत प्रज्वलित झाली.
योगीराज वाघमारे म्हणाले की, स्वतःच्या गावात झालेला हा प्रकाशन सोहळा आयुष्यभर विसरू शकणार नाही. या गावाच्या खूप आठवणी दाटून येतात. त्या या ग्रंथातून शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. ही वस्ती एक बेट बनले आहे. हा प्रशासनाचा एक प्रकारचा सामाजिक अन्यायच आहे. या पुस्तकाने जुन्या आठवणी सांगतानाच झालेल्या कोंडीचा प्रश्न मांडला आहे.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक रमेश बोर्डेकर, सुप्रसिध्द लेखक के. व्ही. सरवदे, सी. आर.घाडगे, सेवानिवृत्त गट विकास अधिकारी वसंत वाघमारे, थिंक टँक पब्लिकेशन्सचे डॉ. बाळासाहेब मागाडे यांनीही मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुंदन कांबळे यांनी केले. यावेळी उस्मानाबाद येथील सुप्रसिध्द साहित्यिक पंडित कांबळे, जयराज खूने, कळंब येथील शिलवंत गुरुजी आदी उपस्थित होते.