स्पेशल रिपोर्ट/ नाना हालंगडे
हत्तरवाड (ता. खानापूर) येथील एक गाव एक तुलसी विवाह सोहळा सामाजिक सलोखा, बंधुत्व आणि एकतेचे प्रतीक आहे. हजारो भाविकांची उपस्थिती आणि दीपोत्सवामुळे या गावात दिवाळीनंतर पुन्हा एकदा दिवाळी अवतरल्याचा प्रत्यय तुलसी विवाह निमित्त पाहायला मिळतो. यंदा सोमवार दि. 7 रोजी तालुक्यात प्रसिद्ध असलेला हा अनोखा तुलसी विवाह साजरा होणार असून, ग्रामस्थ आणि पंचमंडळींकडून सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे.
तुलसी वृंदावनाशिवाय घराची संकल्पना पूर्णत्वाला येत नाही. पण हत्तरवाड गावात एकाही घरासमोर तुलसी वृंदावन नाही आणि तुलसीही नाही. कारण गावाच्या मध्यभागी असलेल्या एकमेव तुलसीलाच प्रत्येक कुटुंब आपली मानून तिची पूजा करते. या गावाने अनेक दशकांपासून एक गाव एक तुलसी विवाहची परंपरा जोपासली आहे.
नवसाला पावणारी तुळस अशी परिसरात ख्याती असल्याने येथील तुलसी विवाहाला नंदगड, हलसी, हलगा, मेरडा या परिसरातील हजारो भाविक सहकुटुंब हजेरी लावतात.
गोवा, महाराष्ट्रात असलेल्या माहेरवाशीनी देखील तुलसी विवाहाला आवर्जून उपस्थित राहतात. अलीकडच्या काळात नवस फेडण्यासाठी पुणे, मुंबई येथे स्थायिक झालेले परिसरातील उद्योजक आणि महिला मोठ्या संख्येने हजेरी लावत असल्याने या तुलसी विवाहाची ख्याती सर्वदूर पसरली आहे. गाव प्रमुख, ग्रामस्थ व पंच कमिटीच्या उपस्थितीत थाटामाटात तुलसीचा विवाह सोहळा पार पाडला जातो. विद्युत रोषणाई आणि दीपोत्सवाने संपूर्ण गाव उजळून निघते.
हत्तरवाड गाव लहान असले तरी येथील 90 पेक्षा जास्त लोक भारतीय सैन्य दलात जवान आहेत. गावची राखणदारीन असलेल्या तुलसीमुळेच सीमेवर देश रक्षणाची सेवा कोणत्याही त्रासाविना पार पाडता येते अशी या जवानांची श्रद्धा आहे. त्यामुळे भव्य दिव्य ठरणाऱ्या या सोहळ्याचा खर्च उचलण्यात हे जवान पुढाकार घेतात. आवळा, चिंच, चिरमुरे हा पूर्वापर चालत आलेला प्रसाद दिला जातो.
गावातील सर्व मंदिरात दीपालंकाराची पूजा केली जाते. नवी जोडपी सामूहिक पूजेत सहभाग घेऊन सूखी संसाराचे मागणे मागतात. तुलसी विवाहानंतर लक्ष्मी मंदिर, रामलिंग मंदिर, मारुती मंदिर, कमलेश्वर मंदिरात कार्तिकोत्सव साजरा केला जातो.
तुलसी विवाहाची अख्यायिका
कांचीनगरीत कनक नावाचा राजा होता. त्याला नवसाने एक मुलगी झाली तिचे नांव किशोरी होते. तिची पत्रिका पाहून ज्योतिषाने सांगितले जो तिच्याशी विवाह करेल त्याच्या अंगावर वीज पडून तो मरेल. एका ब्राह्मणाने किशोरीला द्वादशाक्षरी विष्णू मंत्र सांगितला त्या मंत्राचा जप करावा, तुळशीची पूजा व कार्तिक शुद्ध नवमीला तिचा विष्णूशी विवाह लावावा असे व्रत त्यांनी सांगितले व ती त्याप्रमाणे करू लागली.
एकदा एक गंध्याने तिला पाहिले व तो तिच्यावर मोहित झाला माळिणीच्या मदतीने स्त्री वेष घेऊन त्या माळिणीबरोबर तो किशोरीकडे आला. ती माळीण म्हणाली, ही माझी मुलगी आहे. फुलांची रचना करण्यात तरबेज आहे. तुला देवासाठी फुलांच्या नाना प्रकारच्या रचना करून देत जाईल. गंधी किशोरीकडे दासी म्हणून राहू लागला. कांची राजाचा पुत्र मुकुंद हाही किशोरीवर मोहित झाला होता. तो सूर्याची खूप उपासना करायचा. सूर्याने स्वप्नात दृष्टांत देऊन त्याला सांगितले की, तू किशोरीचा नाद सोडून दे तिच्याशी विवाह करणारा वीज पडून मरेल. मुकुंद सूर्याला म्हणाला, तुझ्यासारख्या देवाला तिचे वैधव्य टाळता येईल. किशोरी मला लाभली नाही तर मी अन्न पाणी वर्ज्य करून मरून जाईन.
सूर्याने किशोरीच्या वडलांना दृष्टांत देऊन सांगितले की राजपुत्र मुकुंदाला तू आपली मुलगी दे. कनक राजाला हा विवाह मान्य करणे भाग पडले. कार्तिक द्वादशी ही लग्नाची तिथी ठरली. गंध्याला हे सर्व कळले. तो खूप दुःखी झाला, व त्याने ठरवले की, लग्न मंडपात जाण्याआधी तिचा हात धरायचा त्याच वेळी मेघगर्जनांसह विजा कडकडल्या किशोरीही भांबावून गेली व ती बाहेर आली व गंध्याने तिचा हात धरला व त्याच क्षणी गंध्याच्या डोक्यावर वीज कोसळली व तो मरण पावला. नंतर राजपुत्र मुकुंद याच्याशी तिचा विवाह झाला. तुळशी व्रताच्या प्रभावाने किशोरीचे वैधव्य टळले.
तुलसी व्रत हे एक काम्य व्रत आहे. तुळसी विवाह करणे हा या व्रताचाच भाग मानला जातो. यानिमित्ताने कर्त्याला कन्यादानाचे पुण्य लाभते असे मानले जाते.