यंदा नवरात्रोत्सव फक्त आठ दिवसांचा

रविवार विशेष; निर्मितीशक्तीची आराधना व जागर करणारा सण

Spread the love

अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून महानवमीपर्यंत केले जाणारे कर्म, रात्रीचा कुळाचार म्हणजे नवरात्र, अशी एक समजूत आहे. कोणतेही नवरात्र हे साधारणपणे नऊ दिवसांचे असते, पण तिथीचा क्षय झाल्याने ते आठ दिवसांचे, किंवा वृद्धी झाल्यास दहा दिवसांचे असू शकते. चंपाषष्ठीचे नवरात्र फक्त सहा दिवसांचे असते. यंदाचे शारदीय नवरात्र मात्र आठ दिवसांचे असणार आहे.

सांगोला (डॉ. नाना हालंगडे) : नवरात्रोत्सव हा आदिशक्ती, निर्मितीशक्तीची आराधना व जागर करणारा सण आहे. एरव्ही नऊ दिवस चालणारा हा सण यंदा मात्र आठ दिवसांचा आहे. याचे नेमके कारण काय असावे? याचा शोध घेणारी ही स्पेशल स्टोरी.

अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून महानवमीपर्यंत केले जाणारे कर्म, रात्रीचा कुळाचार म्हणजे नवरात्र, अशी एक समजूत आहे. कोणतेही नवरात्र हे साधारणपणे नऊ दिवसांचे असते, पण तिथीचा क्षय झाल्याने ते आठ दिवसांचे, किंवा वृद्धी झाल्यास दहा दिवसांचे असू शकते. चंपाषष्ठीचे नवरात्र फक्त सहा दिवसांचे असते. यंदाचे शारदीय नवरात्र मात्र आठ दिवसांचे असणार आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात अनेकजण हमखास उपवास करतात. नवरात्र उत्सव संपेपर्यंत हा उपवास चालू असतो.

यंदा आठ दिवसांचा नवरात्र उत्सव
नेहमीप्रमाणे चालणाऱ्या नऊ दिवसांच्या नवरात्र उत्सवा ऐवजी आठ दिवसांचा नवरात्र उत्सव यंदा असणार आहे. गुरुवार, ७ ऑक्टोबर रोजी घटस्थापनेने शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ होईल, तर गुरुवार १४ ऑक्टोबर रोजी या नवरात्र उत्सवाची सांगता होईल. याच दिवशी घटोत्थापन असेल. यातील विशेष बाब म्हणजे घटस्थापना व घटोत्थापन अर्थात घट विसर्जन हे दोन्ही दिवस गुरुवारी याच दिवशी आले आहे, असे प्रसंग फार क्वचित घडतात.

नवरात्र उत्सवाचे महत्व
भारत हा कृषिप्रधान देश आहे. मानवी जीवन कृषीशी निगडित आहे. शेतामध्ये अन्नधान्य पिकले की मानवी जीवन सुकर आणि समृद्ध होते. याच कृषी जीवनाशी संबंधित भारतीय अर्थव्यवस्था असल्याने कृषी जीवनाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. शेती, धर्म, संस्कार, शिक्षण आदी गोष्टींना आपल्या देशात पवित्र समजले जाते. त्यातूनच धर्म, शेती या दोन्ही गोष्टींचा परस्पर मेळ घालून देशातील विविध सणांची रचना झाल्याचे प्रकर्षाने दिसून येते. नवरात्रोत्सव हा सुद्धा असाच शेती व धर्माशी निगडित उत्सव आहे. अश्विन महिन्यातच शेत शिवारामध्ये पिकलेले धान्य घरी येते. याच काळात अन्नधान्याची लागवडही होत असते. असा हा कृषिप्रधान, जीवनाला बळ देणारा व धार्मिक अधिष्ठान निर्माण करून देणारा सण म्हणून घटस्थापनेकडे पाहिले जाते. घटस्थापनेतून आदीशक्ती, निर्मितीशक्तीप्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते.

नऊ दिवस का आहेत महत्त्वाचे?
शारदीय नवरात्र उत्सवात नऊ दिवस पाळण्यामागे वेगळे महत्त्व आहे. फक्त नवरात्रोत्सवातच नऊ दिवस महत्त्वाचे नसून आपल्या रोजच्या जगण्यामध्येसुद्धा नऊ हा आकडा अतिशय महत्त्वाचा आहे. तो कसा? तेही पाहूयात.
नऊ हा अंक इतर सर्व अंकांमध्ये मोठा अंक आहे. निर्मितीशक्ती व नऊ अंक या दोघांमध्ये एक वेगळे नाते आहे. मातीत बीजारोपण झाल्यानंतर नऊ दिवसांनी बीजाचे अंकुरणे सुरू होते. मानवाच्या जीवनातही नऊ दिवस फार महत्वाचे असतात. कारण गर्भधारणा झाल्यापासून नऊ दिवस नऊ महिन्यांनी मूल जन्म घेते. तेथे सुद्धा नऊ हा आकडा अतिशय महत्त्वाच्या आहे.

  • नवरात्र उत्सवाचे यंदाचे रंग
  • गुरुवार 7 ऑक्टोबर : पिवळा रंग
  • शुक्रवार 8 ऑक्टोबर :  हिरवा रंग
  • शनिवार 9 ऑक्टोबर : राखाडी रंग
  • रविवार 10 ऑक्टोबर : केसरी रंग
  • सोमवार 11 ऑक्टोबर : सफेद रंग
  • मंगळवार 12 ऑक्टोबर : लाल रंग
  • बुधवार 13 ऑक्टोबर : निळा रंग
  • गुरुवार 14 ऑक्टोबर : गुलाबी रंग

शारदीय नवरात्रात अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. अश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून, नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेची नऊ दिवस मनोभावे पूजा करणे, म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव.

नवरात्री हा सण नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे. पावसाळा बहुतेक संपलेला असतो, शेतांतील पिके तयार होत आलेली असतात, काही तयार झालेली असतात. अशा नैसर्गिक वातावरणात नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते. देव्हाऱ्यात अखंड नंदादीप, दररोज झेंडूच्या फुलांची माळ, देवीपुढे सप्तशतीचा पाठ अशा प्रकारे शारदीय नवरात्री व्रत केले जाते.

नवरात्र हे एक काम्य व्रत आहे. पुष्कळ घराण्यांत या व्रताला कुळाचाराचे स्वरूप असते. अश्विन शुद्ध प्रतिपदेस या व्रताचा प्रारंभ होतो. त्यासाठी घरात पवित्र जागी सोळा हातांचा मंडप उभारतात. तिथे एक वेदी तयार करतात. नंतर स्वस्तिवाचनपूर्वक त्या वेदीवर सिंहारूढ अष्टभुजा देवीची स्थापना करतात. मूर्ती नसल्यास नवार्ण यंत्राची स्थापना करतात. यंत्राशेजारी एक घट स्थापून त्याची व देवीची यथाविधी पूजा करतात. व्रतधारी व्यक्तीने नऊ दिवस उपवास किंवा नक्त भोजन करून व्रतस्थ रहायचे असते. अश्विन शुद्ध नवमीपर्यंत हे व्रत चालते. या व्रतात नऊ दिवस सप्तशतीचा पाठ करतात, अखंड दीप लावतात. घटावर रोज एक किंवा चढत्या क्रमाने माळा बांधतात. क्वचित होमहवन व बलिदानही करतात. नऊ दिवस रोज कुमारीची पूजा करून तिला भोजन घालतात. शेवटी स्थापित घट व देवी यांचे उत्थापन करतात. काही कुटुंबात देवीला कडाकण्या बांधण्याची पद्धतही प्रचलित आहे.

नवरात्र हा परिवर्तनाचा काल
नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काल असतो. यामुळे आपल्या नवीन शक्ती, नवा उत्साह, उमेद निर्माण होत असते. बृहत संहितेनुसार सूर्य तसेच इतर ग्रहांमध्ये होणाऱ्या परिवर्तनाचा प्रभाव मनुष्याच्या आरोग्यावर आणि व्यवहारांवर होत असतो. सृष्टीतील परिवर्तन हा शक्तीचाच खेळ आहे. ब्रह्मचर्य, संयम, उपासना, यज्ञ केल्याने शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते. स्मरणशक्ती चांगली होऊन बौद्धिक विकास होतो. म्हणून नवरात्र हा शारीरिक व आत्मिक शुद्धतेचा काळ आहे असे मानले जाते.

चतुर्थी आणि पंचमी तिथी एकत्र
शारदीय नवरात्री म्हणजे माता दुर्गाचे नऊ पवित्र दिवस. दररोज दुर्गा मातेच्या विविध रूपांची पूजा केल्याने विशेष परिणाम मिळतो. या वर्षी शारदीय नवरात्र आठ दिवसांची आहे. कारण आहे की यावेळी चतुर्थी आणि पंचमी तिथी एकत्र येत आहेत, अशा स्थितीत 7 ऑक्टोबरपासून सुरू होणारी शारदीय नवरात्री 14 ऑक्टोबरपर्यंत चालेल आणि विजयादशमी म्हणजेच दसरा 15 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल.

तुळजापूरात 15 हजार भाविकांनाच मंदिरात प्रवेश
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र उत्सव 7 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून या उत्सव काळात दररोज पहाटे 4 ते रात्री 10 या वेळेत केवळ 15 हजार भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. भाविकांना मंदिरात प्रवेश असेल मात्र त्यांना अभिषेक इतर विधींना परवानगी नाही. देवीचे महंत,सेवेकरी व मानकरी यांच्या उपस्थितीत देवीचे कुलाचार विधी संपन्न होणार आहेत. परराज्यातील ज्या भाविकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे त्यांना जिल्ह्यात प्रवेश करताना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक नाही. मात्र लसीकरण न झालेल्या राज्याबाहेरील भाविकांना उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी 72 तासाच्या आतला आरटीपीसीआर चाचणी अहवाल बंधनकारक करण्यात आली आहे.नवरात्र उत्सवातील कोजागिरी पौर्णिमा रद्द करण्यात आली आहे तर या काळात 18 ते 20 ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यात जिल्हा बंदी तर तुळजापूर शहरात भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही.


टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका