मोदी सरकार क्रूर व निगरगट्ट : आ. प्रणिती शिंदे कडाडल्या
सोलापूर शहर व ग्रामीण भागात बंदला संमिश्र प्रतिसाद
सोलापूर (विशेष प्रतिनिधी): मोदी सरकारच्या (Modi Government ) डोक्यात सत्तेची हवा गेली आहे. त्यांना वाटतं , की आमचं कोणी काही बिघडवू शकत नाही. निगरगट्ट, क्रूर व हम करेसो कायदा व शेमलेस अशी त्यांची मानसिकता झाली आहे, अशी जहरी टीका काँग्रसच्या आमदार प्रणिती शिंदे (MLA Praniti Shinde ) यांनी केली.
लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri ) येथे दहा दिवसांपूर्वी घडलेल्या अत्यंत क्रूर घटनेत शेतकऱ्यांना चिरडलं गेलं. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या घटक पक्षांनी सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्यावेळी सोलापूर येथे आ. शिंदे बोलत होत्या.
आ. शिंदे म्हणाल्या की, जेव्हा प्रियांका गांधी वढेरा ( Priyanka Gandhi Vadhera ) व राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी घटनास्थळी भेट दिली तेव्हा त्यांना तेव्हा पोलिसांनी ताब्यात घेतले. सत्तेत आहोत आम्ही काहीही करू शकतो , महिला व दलितांवर अत्याचार केलं तरी आमचं कोणी काही करू शकत नाही , आम्ही शेतकऱ्यांना चिरडलं तरी आम्हाला कोणी हात लावू शकत नाही , अशी मानसिकता मोदी सरकारची झाली आहे . अशा मानसिकतेचा निषेध म्हणून महाराष्ट्र बंद ( Maharashtra Bandh ) पुकारला आहे. मोदी सरकारच्या अहंकाराचा लवकरच अंत होईल , अशी टीका आमदार प्रणिती शिंदे यांनी मोदी सरकारवर केली.
सोलापुरात समिश्र प्रतिसाद
महाविकास आघाडी सरकारच्या घटक पक्षांनी सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्याला सोलापुरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. सांगोला, पंढरपूर, माढा, मंगळवेढा, बार्शी, करमाळा आदी तालुक्यातही बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.