मुख्यमंत्र्यांशी बोलून ई-पासबाबत निर्णय घेऊ
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
केंद्र सरकारने देशाला डोळ्यासमोर ठेऊन ई-पास रद्द करण्याचा निर्णय घेतला असला तरी राज्यातील प्रमुखांना स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घ्यावे लागतात. इतर राज्यातील भौगिलिक व कोरोनाची परिस्थितीही वेगळी आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांशी बोलून ई-पासबाबत निर्णय घेऊ, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
पुण्यात जम्बो हॉस्पिटलच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर पवार पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, दाऊदचा पाकिस्तानातील रहिवास असल्याचा मुद्दाही एकादृष्टीने महत्वाचा आहे़ भारतात वेगवेगळ्या अतिरेकी कारवाया, बॉम्बस्फोटमध्ये त्याचा हात आहे़. परंतु आता कोरोनाचे संकट आहे, याबाबतीत केंद्र सरकार व त्यांचे वरिष्ठ अधिकारी पुढील कार्यवाही करीत आहेत़
परदेशात ज्या कंपन्या नावाजलेल्या आहेत अशा कंपन्यांकडून जम्बो हॉस्पिटलकरिता व्हेंटिलेटर बेड व अन्य सुविधा घेण्यात आल्या असून, जम्बो हॉस्पिटल बंद झाल्यावर या सर्व सुविधा आपण शासकीय रूग्णालय, ससून हॉस्पिटल, महापालिकेच्या रूग्णालयात तसेच ग्रामीण भागातील रूग्णालयांमध्ये पाठविण्यात येणार असल्याची माहिती पवार यांनी यावेळी दिली.
जम्बो हॉस्पिटलचा सहा महिन्यांसाठी करार करण्यात आला आहे़ पण यदाकदाचित काही घडले तर बेडची कमतरता पडू नये यासाठी सरकारला खबरदारी घ्यावी लागते, त्यानुसार या हॉस्पिटलची उभारणी केली आहे़ सध्या शिवाजीनगर, मगर मैदान व बाणेर येथे सीएसआर मधून असे एकूण १ हजार ८५० अधिकचे बेडसह खाजगी हॉस्पिटलमधील अधिकचे बेड उपलब्ध झाले आहेत़ त्यामुळे आजमितीला पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये बेड नाही अशी वेळ येत नसल्याचे म्हणाले.
दरम्यान, पुण्याप्रमाणेच नाशिक, कोल्हापूर व अन्य जिल्ह्यात जम्बो हॉस्पिटल उभारण्याऐवजी, मंगल कार्यालयांची मोठी सभागृहे घेऊन तेथे कोविड रूग्णांवर उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ नाशिकमध्ये अशारितीने सेंटर उभे राहिले असल्याचेही पवार यांनी सांगितले़
पार्थ पवार यांच्या विषयी छेडले असता, ज्या विषयावर मी बोलणारच नाही त्या विषयावर विचारून काय उपयोग असे सांगून त्यांनी या प्रश्नावर अधिकचे बोलणे टाळणेच पसंत करून पुढील कार्यक्रमाकडे गेले.